रोमान्स : एक वाङ्‌मयप्रकार ‘रोमान्स’ हा शब्द सामान्य जनांची भाषा असा अर्थ अभिप्रेत असलेल्या ‘romanz’ या जुन्या फ्रेंच शब्दावरून आला (फ्रेंच प्रॉव्हांसाल, इटालियन, स्पॅनिश आणि रूमानियन या लॅटिनोद्‌भव रोमान्स भाषा होत). नंतर रोमान्स भाषेतील साहित्यकृती असा अर्थ त्याला प्राप्त झाला. जेफ्री ऑफ मॉनमथच्या इस्तोरिया रेगूम ब्रितानि(११३७) या लॅटिन इतिवृत्ताच्या रॉबेअर वासने केलेल्या पद्यमय रूपांतराला रॉमांद ब्र्युत हे नाव देण्यात आले. तर व्हर्जिल या लॅटिन कवीच्या ⇨ईनिड या महाकाव्याच्या रूपांतराला लि रोमांझ देनेयास म्हणून संबोधण्यात आले. अनपेक्षित आणि चमत्कृतीपूर्ण प्रसंगांनी भरलेली मध्ययुगीन गद्यकथा अथवा प्रेमकथा वा नाट्यमय प्रेमगीत या अर्थांनीही हा शब्द वापरला जातो. एक वाङ्‌मयप्रकार म्हणून रोमान्सची काही ठळक लक्षणे अशी : भूतकाळातील उमरावी जीवनावर आधारलेले प्रेम व साहसयुक्त कथानक, प्रणयरम्य प्रसंग, इंद्रियगोचर वर्णने, साधी सरळ पण काही वेळा रूपकात्मक वाटणारी व्यक्तिचित्रणे तसेच विशिष्ट नियम, रीतिरिवाज वा मूल्ये काटेकोरपणे पाळणाऱ्या व्यक्तिरेखा अनपेक्षित, अद्‌भुतरम्य घटना व प्रसंग, अतिमानवी व भयप्रद गोष्टींचा वापर आणि संकटे व दुःखे यांतून आनंदपर्यवसायी शेवट. वाङ्‌मयप्रकार म्हणून रोमान्सचे जनकत्व महाकाव्याकडे जाते. प्रथम रोमान्सचे माध्यम काव्यच होते पण कादंबरीच्या प्रभावाने गद्यात रोमान्स लिहिले गेले. हा खास यूरोपियन वाङ्‌मयप्रकार मानला जातो तथापि प्राचीन भारतीय व ईजिप्शियन काळापासून त्याला परंपरा आहे. बाणभट्टाची कादंबरी, अरेबियन नाइट्स हीदेखील रोमान्सचीच उदाहरणे होत. बाराव्या शतकातील सुरुवातीचे रोमान्स-उदा., रॉमां द तॅब, रॉमां देनेयास आणि रॉमां द त्रुवा यांचे विषय प्राचीन काव्यग्रंथांतून घेतले गेले आहेत. रॉमा दालेक्सांद्र ह्या बाराव्या शतकातील रोमान्समध्ये भारताविषयीची आश्चर्यजनक वर्णने आढळतात. नवयौवन प्राप्त करून देणारे निर्झर, वनात वाढलेल्या पुष्पकन्या, श्वानशीर्षयुक्त मानव इत्यादी. फ्रेंच कवी ⇨ क्रेत्यँ द त्र्वा याने सु. ११६५ ते ११९० या कालावधीत एरेक, क्लिजॅस, लांसलो, इंव्हँ आणि पेर्सेव्हाल हे पाच पद्यरोमान्स लिहून या वाङ्‌मयप्रकाराला नवे रूप दिले. त्याचे हे रोमान्स राजा आर्थर व त्याचे सरदार या विषयावर आधारलेले आहेत. ट्रिस्टान आणि इसोल्ट यांचे शोकात्म उत्कट प्रेम हा देखील कित्येक रोमान्सचा आवडीचा विषय होय. ⇨गोट्फ्रीट फोन स्ट्रासबुर्ग याचे त्याच विषयावरील महाकाव्य एक उत्कृष्ट रोमान्स मानले जाते.

रोमान्स पलायनवादी वाङ्‌मय मानले जात पण मध्ययुगीन रोमान्स व सोळाव्या शतकातील इंग्रजी वाङ्‌मयातील रोमान्स यांचा उद्देश राजपुत्र तसेच सत्ताधारी यांचे शिक्षण हादेखील होता. माणसाच्या मनात एक स्वप्नसृष्टी असते आणि रोमान्स ही तिची अभिव्यक्ती आहे, असे श्लेगेल व कोलरिज म्हणतात. फ्रॉइड व युंग यांच्या मनोविश्लेषण-सिद्धांतांमुळे अर्धसुप्त मनात दडलेले रोमान्सशी निगडित असे अनुभव व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आधुनिक लेखकांना मिळाले. मिथ्य व रूपककथा वापरून त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या हा रोमान्स-परंपरेचाच वारसा आहे. फ्रांट्स काफ्का या जर्मन कादंबरीकाराने आपल्या द कॅसल या कादंबरीत रोमान्सच्या पारंपरिक तंत्राचा अभिनव पद्धतीने उपयोग केला आहे. रोमान्स आणि वास्तव, आदर्शवाद व वस्तुस्थिती यांतील परस्परविरोध सरव्हँटिझ हा स्पॅनिश कादंबरीकाराने आपल्या डॉन क्विक्झोट या कादंबरीत प्रभावीपणे दाखविला आहे. रोमान्सची वैशिष्ट्ये लक्षात घेता, मराठी वाङ्‌मयातील मंजुघोषा ही कादंबरी नसून रोमान्सच आहे, असे म्हटले पाहिजे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पश्चिम यूरोपीय वाङ्‌मयात वाङ्‌मयीन सत्याबद्दलचा वाद गाजत होता त्यामुळे रोमांस हा वाङ्‌मयप्रकार जवळजवळ निषिद्ध ठरला. पण इंग्लंडमध्ये मात्र गॉथिक कादंबरीच्या रूपाने तो अठराव्या शतकातही दिसून येतो. आधुनिक वाङ्‌मयात पारंपरिक व रोमान्स लिहिले जात नाहीत पण रोमान्सचे तंत्र वापरून रूपकात्मक-औपरोधिक कादंबऱ्या लिहिल्या जातात. टोल्कीनची लॉर्ड ऑफ द रिंग्ज ही कादंबरी-मालिका याचे उदाहरण आहे. अमेरिकन ‘वेस्टर्न’ कादंबरी किंवा गुप्तहेर कथा या एक प्रकारे रोमान्सचीच गरज आधुनिक काळात भागवीत आहेत.

सरदेसाय, मनोहरराय कळमकर, य. शं.