राव, बेनेगल नरसिंह : (२६ फेब्रुवारी १८८७ –३० नोव्हेंबर १९५३). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कायदेपंडित व राजनीतिज्ञ. जन्म मंगलोर येथे एका सुशिक्षित कुटुंबात. प्रेसिडेन्सी महाविद्यालय (मद्रास) व ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज) यांतून प्रथम श्रेणीत पदवी घेतल्यानंतर १९१० साली ते आय्.सी.एस्. परीक्षेत उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी भारतीय मुलकी सेवेत प्रवेश केला. त्यांची मुर्शिदाबाद (१९१९-२०), सिल्हेट व काचार (१९२० –२५) या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. १९३५ च्या भारतीय अधिनियमामुळे त्यावेळच्या केंद्रीय आणि प्रांतिक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली होती. राव यांनी ते काम केवळ १८ महिन्यांत पूर्ण केले. तत्पूर्वी आसाम विधिमंडळात त्यांनी सचिवाचे काम केले (१९२५ – ३३). १९४४ साली राव यांच्या अध्यक्षतेखाली हिंदु विधिसंहितेचा मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीने मे १९४४ मध्ये हिंदु-संहितेचा एक कच्चा आराखडा तयार केला. पाणीवाटपाबद्दल पंजाब-सिंध-प्रांत तसेच बिकानेर, बहावलपूर आणि इतर संस्थाने यांमध्ये तंटा सुरू झाला होता. तेव्हा सरकारने राव यांच्या अध्यक्षतेखाली सिंधू पाणीवाटप आयोग नेमला (१९४१-४२). या आयोगाचा अहवाल (१९४५) त्यातील तांत्रिक आणि कायदेशीर अचूकतेमुळे जगातही आदर्श मानला जातो.
सेवानिवृत्तीनंतर (१९४४) त्यांनी जम्मू-काश्मीर संस्थानात पंतप्रधान म्हणून काम केले. तथापि तात्त्विक मतभेदामुळे त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला (१९४५). आझाद हिंद सेनेतील स्वातंत्र्यवीरांविरुद्धच्या खटल्यात त्यांनी भुलाभाई देसाई यांना बचावाचे मुद्दे काढून दिले होते. स्वतंत्र ब्रह्मदेशाचे संविधान तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
भारताच्या संविधानाच्या संदर्भात राव यांचे कार्य फार मोलाचे मानले जाते. बेनेगल हे संविधान समितीचे संविधानविषयक सल्लागार होते.
राव यांनी संयुक्त राष्ट्रे या संघटनेत १९४८ पासून तीन वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले. सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष असताना (१९५०) त्यांनी कोरियन युद्धाच्या वेळी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांनी जागतिक शांततेसाठी अणुशक्तीचा शांततामय उपयोग करण्याचा जोरदार पुरस्कार केला. सुरुवातीस आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर सदस्य म्हणून व त्यानंतर १९५२ मध्ये द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले. या पदावर ते अखेरपर्यंत होते. झुरिक (स्वित्झर्लंड) येथे त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या संशोधनात्मक शोधनिबंधांचा संदर्भ घेऊन पुढे इंडियाज कॉन्स्टिट्युशन इन द मेकिंग हा मौलिक ग्रंथ प्रकाशित करण्यात आला (१९६०).
राव यांनी शासकीय सेवेत अनेक उच्च पदे भूषविली. ब्रिटिश शासनाने त्यांना ‘सर’ हा किताब देऊन बहुमान केला (१९३८). त्यांचा व्यासंग हा प्रामुख्याने विधिविषयक तपशीलांचा होता. संविधानात्मक कायद्याचे ते तज्ञ होते.
राव, सुनीती