यूइंग, सर जेम्स ॲल्फ्रेड : (२७ मार्च १८५५ – ७ जानेवारी १९३५). ब्रिटिश भौतिकीविज्ञ व अभियंते. चुंबकत्वासंबंधी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. चुंबकीय प्रेरणेतील बदलाला चुंबकीय पदार्थाच्या होणाऱ्या रोधाचा त्यांनी शोध लावला व त्याला हिस्टेरिसिस (मंदायन) हे नाव दिले [⟶  चुंबकत्व].

यूइंग यांचा जन्म डंडी (स्कॉटलंड) येथे झाला. एडिंबरो विद्यापीठात त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. १८७८ – ८३ मध्ये टोकिओ विद्यापीठात यांत्रिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर ते इंग्लंडला परतले. त्यानंतर ते १८८३ – ९० मध्ये डंडी विद्यापीठात अभियांत्रिकीचे प्राध्यापक व १८९० – १९०३ मध्ये केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजात यंत्रणा आणि अनुप्रयुक्त यामिकी (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया आणि त्यामुळे निर्माण होणारी गती यांच्या अभ्यासाच्या व्यावहारिक उपयोगांचे शास्त्र) या विषयांचे प्राध्यापक होते. १९०३ – १६ या काळात ते ब्रिटिश नाविक विभागात नाविक शिक्षणाचे संचालक होते. १९१६ – २९ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाचे प्राचार्य व उपकुलगुरू म्हणून काम केले. ब्रिटनमध्ये अभियांत्रिकीय शिक्षण प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. १९१४ – १७ या काळात ते नाविक विभागातील गुप्तलिपीशी संबंधित असलेल्या उपविभागाचे प्रमुख होते.

टोकिओ येथे असताना त्यांनी भूकंपांचा अभ्यास करून त्यांची नोंद व मापन करणारी उपकरणे तयार केली.लोह, पोलाद व इतर धातूंच्या चुंबकीय गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांनी डब्ल्यू. ई. वेबर यांच्या प्रवर्तित चुंबकत्वासंबंधीच्या सिद्धांतात सुधारणा केली आणि तिला योग्य अशा चुंबकीय पदार्थाच्या परिकल्पित प्रतिकृतीची रचनाही केली. १८९० मध्ये प्रत्यावर्ती (ज्याचे मूल्य व दिशा वारंवार उलटसुलट बदलते असा) विद्युत्‌ प्रवाह उपयोगात आणणाऱ्या विद्युत्‌ चुंबकाच्या बाबतीत धातूचे चुंबकीकरण प्रवाहातील बदलाच्या मागे राहते, असे यूइंग यांना आढळून आले. सर्व रेणू हे अतिशय लहान चुंबकासारखे असतात असे अनुमान मांडून चुंबकीय प्रेरणेच्या नवीन दिशेत संरेखित होण्यास या रेणूंचा होणारा रोध म्हणजे मंदायन असे स्पष्टीकरण त्यांनी मांडले. त्यांनी धातूंचे तापविद्युतीय गुणधर्म [⟶ विद्युत्‌], प्रतिबल (वस्तूची परिमाणे बदलण्याची प्रवृत्ती असणारी प्रेरणा) व चुंबकीकरण यांचा लोहावर होणारा परिणाम, धातूंची स्फटिकीय संरचना व भूकंपविज्ञान या विषयांवर कित्येक संशोधनपर निबंध लिहिले. त्यांनी प्रसरणमापक (धातूच्या लांबीत होणाऱ्या सूक्ष्म वाढी मोजणारी प्रयुक्ती), मंदायन परीक्षक व चुंबकीय गुणधर्मांच्या परीक्षणासाठी इतर काही उपकरणे तयार केली.

रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १८८७ मध्ये त्यांची निवड झाली आणि चुंबकत्वावरील संशोधनाकरिता त्यांना सोसायटीच्या रॉयल पदकाचा १८९५ मध्ये बहुमान मिळाला. १९११ मध्ये त्यांना नाइट हा किताब मिळाला. ते केंब्रिज येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.