युनुस  एमरे : ( ?  –१३२०). मध्ययुगीन तुर्की कवी आणि संत. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात तो ॲनातोलिया (तुर्कस्तान) येथे रहात असावा आणि सिरिया, कॉकेशस या भागांत प्रवास करून त्याने प्रसिद्ध गूढवादी कवी जलाल-अल्‌-दिन रूमी आणि हाजी बेक्ताश यांचीही भेट घेतली असावी, असे दिसते.

त्याची कबर आपल्याच भूमीत आहे असे सांगणारी, सातांहून अधिक खेडी ॲनातोलियात आहेत पण साकार्या नदीजवळच्या सारीकॉम ह्याच खेड्यात बहुतेक त्याची कबर असावी, असे पुराव्यावरून दिसते. ॲनातोलियातील गूढवादी चळवळीचा युनुस एक मान्यवर प्रतिनिधी होता. त्याच्या कवितेत भावनाप्रधानता आणि धार्मिक उत्कटता यांचे उत्तम मिश्रण दिसून येते. मानवी प्रारब्ध आणि मृत्यू हे विषय प्रामुख्याने त्याच्या काव्यात दिसून येतात. साधी, अनलंकृत भाषाशैली आणि तुर्की परंपरेतील साधी अक्षरवृत्ते ही त्याच्या काव्याची वैशिष्ट्ये होती. तुर्की साहित्यात विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या काळात युनुस एमरेची कविता स्फूर्तिदायक ठरली. नंतरच्या पिढीतील गूढवादी कवींवरदेखील त्याचा फार मोठा प्रभाव पडला. 

कळमकर, य. शं.