हालिद झिया : (? १८६५–२७ मार्च १९४५). तुर्की कथा-कादंबरीकार. कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) येथे जन्म. इझमिर येथीलएका फ्रेंच शाळेत त्याचे शिक्षण झाले. तेथेच एकोणिसाव्या शतकातील नामांकित फ्रेंच कादंबरीकारांच्या कादंबऱ्यांनी तो प्रभावित झाला. त्याने सुरू केलेल्या हिझमेत वृत्तपत्रात त्याच्या लेखनाची माहिती मिळते.फ्रान्सला त्याने दिलेल्या भेटीतून यूरोपीय संस्कृतीशी त्याचा परिचयझाला. त्या प्रभावस्रोतांचा त्याच्यावर आणि त्याच्या लेखनावर खोल परिणाम झाला. ‘जर्नी ऑफ ए डेड मॅन’ (१८८९, इं. शी.), ‘फेर्दीअँड कंपनी’ (१८९४, इं. शी.) ह्या त्याच्या आरंभीच्या कादंबऱ्यांतूनहा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. १८९६ मध्ये हालिद झिया हा ‘द वेल्थऑफ नॉलेज’ (इं. शी.) ह्या प्रागतिक विचारांच्या नियतकालिकाशी जोडला गेला. यूरोपीय, विशेषतः फ्रेंच सांस्कृतिक आणि बौद्धिक चळवळींचा परिचय तुर्की वाचकांना करून देण्यासाठी त्याने आणिइतर समविचारी व्यक्तींनी हे नियतकालिक सुरू केले होते. माइ वे सियाह (१८९७, इं. शी. ‘द ब्ल्यू अँड द ब्लॅक) ह्या त्याच्यासर्वश्रेष्ठ कादंबरीचा नायक तुर्की साहित्यातील या नवप्रवाहांचा प्रतिनिधी म्हणता येईल. अशके मामनु (१९००, इं. शी. ‘द फॉरबिडन् लव्ह) ही त्याची आणखी एक उत्कृष्ट कादंबरी. त्याने त्यानंतर अनेक कादंबऱ्या आणि कथा लिहिल्या. त्याच्या कथा-कादंबऱ्यांची संविधानके आणि त्यांतील व्यक्तिरेखा पश्चिमी संस्कृतीने संस्कारित असलेल्या उच्चवर्गीय वर्तुळांपुरत्याच मर्यादित असल्या, तरी त्याच्या व्यक्तिगत अनुभवांतूनत्यांनी आकार घेतलेला आहे. १९०८ मध्ये तरुण तुर्कांनी केलेल्या बंडानंतर हालिद झिया इस्तंबूल विद्यापीठात यूरोपीय साहित्याचे अध्यापन करू लागला.

इस्तंबूल येथे तो निधन पावला.

 

कुलकर्णी, अ. र.