रेंदाळकर, एकनाथ पांडुरंग: (१ जुलै १८८७–२२ नोव्हेंबर १९२०). मराठी कवी. जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ ह्या गावचा. शिक्षण रेंदाळ आणि कागल येथे त्या काळातील इंग्रजी चौथीपर्यंत.सांगली येथील पाठशाळेत काव्यव्युत्पत्तीचा अभ्यास केला कोल्हापूरात बाळशास्त्री हुपरीकर ह्यांच्याकडे सिध्दांत कौमुदीचे अध्यपन केले. धर्म-विचार, मासिक मनोरंजन, करमणूक ह्या नियतकालिकांतून त्यांनी संपादकीय पदांवर काम केले. हिंगणे येथे ते काही काळ शिक्षक होते. हालअपेष्टांचे जीवन त्यांच्या वाट्याला आले. क्षयाच्या विकाराने रेंदाळ ह्या त्यांच्या जन्मग्रामीच त्यांचे निधन झाले.
आपल्या आरंभीच्या कविता रेंदाळकरांनी ‘मंदार’ ह्या टोपण नावाने लिहिल्या. मंदारमञ्जरी (१९१०) ह्या काव्यसंग्रहात त्या समाविष्ट आहेत. मोहिनी (खंडकाव्य, १९१३), अन्योक्तिमुक्तांजंलि (दोन भाग, १९१११९१५), विरहिणी राधा (१९१६) आणि बुध्दीनीति (१९१६) ह्या त्यांच्या अन्य काही काव्यकृती. रेंदाळकरांची कविता (दोन भाग, १९२४ १९२८) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. रेंदाळकरांची स्फुट काव्यरचना तीनशेवर असून त्याशिवाय ‘यमुना गीत’, ‘मोहिनी’, ‘सारजा’ सारखी त्यांची दीर्घ काव्यरचनाही पुष्कळच आहे.
रेंदाळकरांनी स्वतःला केशवसुतांचे निष्ठांवत अनुयायी मानले. संस्कृतप्रचुर, प्रौढ, प्रसादपूर्ण आणि सहज अशी त्यांची काव्यरचना आहे. तथापि ह्या काव्यरचनेपैकी फारच थोडी वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल. अशरीर (प्लेटॉनिक) प्रेमाचा आपल्या काव्यातून त्यांनी पुरस्कार केला आणि हे त्यांचे आशयदृष्ट्या वैशिष्ट्ये होते. रचनेच्या दृष्टीने विचार करता, संस्कृतप्रमाणे मराठी कविताही निर्यमक लिहिण्याचा जोरदार, सक्रिय पुरस्कार त्यांनी केला. त्यामुळे निर्यमक कवितेविषयी बराच वादही निर्माण झाला होता.
रेंदाळकरांनी आंग्ल कवी टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’ काव्याने ‘सारजा’ ह्या नावाने रूपांतर केले. इंग्रजीबरोबर काही संस्कृत बंगाली, क्वचित गुजराती काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या.
जोग, रा. श्री.