राव, कल्यमपुडी राधाकृष्ण : (१० सप्टेंबर १९२० –). भारतीय सांख्यिकीविज्ञ. गणितीय सांख्यिकीच्या (संख्याशास्त्राच्या) विविध शाखांत त्यांनी मूलभूत संशोधन केलेले आहे.विशेषतः आकलन सिद्धांत [⟶ सांख्यिकीय अनुमानशास्त्र], ⇨बहुचरात्मक विश्लेषण, ⇨प्रयोगांचा अभिकल्प, ⇨संभाव्यता सिद्धांतातील वंटनाच्या [⟶ वंटन सिद्धांत] गुणलक्षणांच्या निश्चितीसंबंधीचे प्रश्न, ⇨समचयात्मक विश्लेषण व आव्यूह बीजगणित [⟶ आव्यूह सिद्धांत] या शाखांतील त्यांचे कार्य महत्त्वाचे मानण्यात येते.
राव यांचा जन्म कर्नाटकातील हदगळी येथे झाला. त्यांनी आंध्र विद्यापीठाची गणितातील एम्. ए. पदवी प्रथम क्रमांकाने (१९४०) व कलकत्ता विद्यापीठाची सांख्यिकीतील एम्. ए. पदवी सुवर्णपदकासह पहिल्या क्रमांकाने (१९४३) संपादन केली. ‘जैव वर्गीकरणातील सांख्यिकीय समस्या’ या विषयावर प्रबंध लिहून १९४८ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविली. पुढे सांख्यिकी विषयातील प्रसिद्ध झालेल्या एकूण संशोधन कार्याच्या आधारावर त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची एस्सी.डी. ही पदवी १९६५ मध्ये संपादन केली. कलकत्ता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या संस्थेत ते प्रथम सांख्यिकीविज्ञ (१९४४ –४८) आणि पुढे संस्थेच्या संशोधन व प्रशिक्षण शाळेत प्राध्यापक व प्रमुख (१९४९ –६३) आणि नंतर संचालक (१९६४–७२) होते. १९७२ –७६ या काळात ते संस्थेचे सचिव व संचालक होते. त्यानंतर या संस्थेत त्यांनी जवाहरलाल नेहरू प्राध्यापकपदावर १९७६ – ८४ या काळात काम केले. याखेरीज त्यांनी अमेरिकेची संयुक्त संस्थाने (इलिनॉय, कॅलिफोर्निया, जॉन हॉपकिन्स, इंडियाना, पिट्सबर्ग इ.), ब्रिटन, कॅनडा, रशिया, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांतील विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक वा अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमासाठी व्याख्याते म्हणूनही काम केले.
राव यांनी ⇨सर रॉनल्ड एल्मर फिशर यांच्या आकलन सिद्धांतात व विवेचन सिद्धांतात महत्त्वाची भर घातली. राव यांच्या नावाशी निगडित असलेल्या विविध संकल्पना व सिद्धांत पुढीलप्रमाणे आहेत. आकलन सिद्धांत : क्रामर –राव असमा, राव –ब्लॅकवेलीकरण (कार्यक्षम आकलक शोधण्याची एक प्रक्रिया), फिशर – राव प्रमेये, दुसऱ्या कोटीची कार्यक्षमता, रेखीय आकलनाचा एकीकृत सिद्धांत, विचरण घटकांसंबंधीचा सिद्धांत.
समचयात्मक विश्लेषण : राव यांचे जात्य रचनाव्यूह, हॅमिंग-राव बंध, परिमित भूमितीतील अधिप्रतलांचे चक्रीय जनन, घटकात्मक अभिकल्पांची साधी रचना.
गुणलक्षण निश्चितीचे प्रश्न : कागन-लिनिक-राव प्रमेय, राव यांचे विनाश प्रतिमान.
बहुचरात्मक विश्लेषण : राव यांची U कसोटी, अपस्करण व गुच्छीकरण विश्लेषण, संलग्न काटच्छेदीय अभ्यास, राव यांची अंतर संकल्पना.
आव्यूह बीजगणित : आव्यूहाचा g-व्यस्त आणि g-व्यस्तांचे वर्गीकरण, उप अवकाशातील प्रक्षेपणकारक, आव्यूहांच्या एकमात्री मूल्याच्या विलगीकरणाची प्रमेये व आव्यूह आसन्नीकरण. राव यांनी केलेल्या या मूलभूत कार्याचा आनुवंशिकी, जीव सांख्यिकी, मानवमिती, संदेशवहन वगैरे अनेक क्षेत्रांत उपयोग करण्यात आलेला आहे.
राव हे सांख्यिकी व संबंधित विषयांशी निगडित असलेल्या आंतरराष्ट्रीय, भारतीय व इतर देशांतील अनेक संस्थांचे सदस्य आहेत. त्यांत इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (हेग, नेदर्लंड्स निर्वाचित अध्यक्ष १९७५ –७७, अध्यक्ष १९७७ –७९), इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स (अमेरिका निर्वाचित अध्यक्ष १९७५-७६, अध्यक्ष १९७६-७७), रॉयल सोसायटी (लंडन, १९६७) रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी (लंडन), अमेरिकन स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशन, इकॉनॉमेट्रिक सोसायटी (आंतरराष्ट्रीय), इंटरनॅशनल बायोमेट्रिक सोसायटी (अध्यक्ष, १९७४-७५), अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस अँड सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी (उपाध्यक्ष, १९७३), इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन इकॉनॉमेट्रिक सोसायटी (अध्यक्ष, १९७१ –७६), इंडियन सोसायटी ऑफ ह्यूमन जेनेटिक्स वगैरे संस्थांचा समावेश आहे. यांखेरीज ते केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजाचे सन्माननीय अधिछात्र आहेत (१९७६). भारतीय विज्ञान परिषदेच्या सांख्यिकी विभागाचे १९५९-६० मध्ये ते अध्यक्ष होते. सांख्यिकीविषयक राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष (१९६२ –६९), जनांकिकी व संदेशवहन क्रिया संशोधन समितीचे अध्यक्ष (१९६८-६९), भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविद्या समितीचे सदस्य (१९६९ – ७१) वगैरे अनेक पदांवर त्यांनी काम केलेले आहे.
राव यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९६३), रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीचे गाय रौप्य पदक (१९६५), भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार (१९६८), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे मेघनाद साहा सुवर्णपदक (१९६९), जगदीशचंद्र बोस सुवर्णपदक, पॅट्रिस लमुंबा विद्यापीठाचे स्मृती पदक (१९७५) हे बहुमान तसेच आंध्र, अथेन्स, दिल्ली, लेनिनग्राड, उस्मानिया, ओहायओ राज्य व फिलिपीन्स या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या मिळालेल्या आहेत.
राव यांची पुढील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत : लिनियर स्टॅटिस्टिकल इन्फरन्स अँड इट्स ॲप्लिकशन्स (१९६५ रशियन, जर्मन, जपानी व चेक या भाषांत भाषांतरित), ॲडव्हान्स्ड स्टॅटिस्टिकल मेथड्स इन बायोमेट्रिक रिसर्च (१९५२), जनरलाइज्ड इनव्हर्स ऑफ मॅट्रायसेस अँड इट्स ॲप्लिकेशन्स (एस्. के. मित्रा यांच्यासमवेत, १९७१ जपानीमध्ये भाषांतरित), कॅरॅक्टरायझेशन प्रॉब्लेम्स ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स (ए. कागन व वाय्. व्ही. लिनिक यांच्या समवेत रशियन आवृत्ती १९७२, इंग्रजी भाषांतर १९७३), कॉम्प्युटर्स अँड द फ्युचर ह्यूमन सोसायटी (१९७०), एन्शंट इनहॅबिटंट्स ऑफ जेबेल मोया (आर्. के. मुकर्जी आणि जे. सी. ट्रेव्हर यांच्यासमवेत १९५५), ॲथ्रॉपॉमेट्रिक सर्व्हे ऑफ द युनायटेड प्रॉव्हिन्सेस, १९४१, ए स्टॅटिस्टिकल स्टडी (पी. सी. महालनोबीस व डी. एन्. मुजुमदार यांच्या समवेत १९४९) रेस एलिमेंट्स ऑफ बेंगॉल, ए क्वांटिटेटिव्ह स्टडी (डी. एन्. मुजुमदार यांच्या समवेत १९५८) आणि फॉर्म्युली अँड टेबल्स फॉर स्टॅटिस्टिकल वर्क (ए. मथाई व एस्. के. मित्रा यांच्या समवेत १९६६). यांखेरीज त्यांचे गणितीय सांख्यिकीवरील १५० हून अधिक संशोधन निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या संख्या या नियतकालिकाचे ते १९६४-७२ मध्ये सहसंपादक होते व १९७२ पासून संपादक आहेत. याशिवाय ते जर्नल ऑफ मल्टिव्हेरिएट ॲनॅलिसिस (अमेरिका), कम्युनिकेशन्स इन स्टॅटिस्टिक्स (अमेरिका), थिअरी अँड डिसिजन (प. जर्मनी), यूटिलिटास मॅथेमॅटिका (कॅनडा), Mathematishe Operations for schurg and Statistik (प. जर्मनी), स्टॅटिस्टिकल थिअरी अँड मेथड्स ॲबस्ट्रॅक्टस (हेग, नेदर्लंड्स) व एन्सायक्लोपिडिया ऑफ ॲप्लिकेबल मॅथेमॅटिक्स (अमेरिका) यांच्या संपादक मंडळाचे सदस्य आहेत.
फाळके, धै. शं.
“