राजकोट संस्थान : गुजरात राज्यातील काठेवाडमधील ब्रिटिशांकित एक जुने संस्थान. क्षेत्रफळ ७२१·९२ चौ.किमी. लोकसंख्या सु. पाउण लाख (१९४१) व वार्षिक उत्पन्न सु. १० लाख, पूर्वेस नवानगर, दक्षिणेस गोंडल व कोटडा-सांगाणी, पश्चिखमेस ध्रोल, उत्तरेस बांकानेर ही संस्थाने यांनी सीमित. संस्थानात ४ खेडी असून नवानगरच्या जाडेजा राजपुतां पैकी जाम रावळचा खापरपणतू विमाजी याने सतराव्या शतकाच्या सुरूवातीस बापाकडून मिळालेली जागीर आणखी प्रदेश जिंकून वाढवली आणि स्वंतत्र राज्य निर्माण केले. १८०७ मध्ये संस्थान इंग्रजाच्या मांडलिकीत आले. १८६२–७६ व १८९०–१९०७ या काळात ठाकोरसाहेब अल्पवयी असल्याने कारभार इंग्रजां चाच होता. ठाकोरसाहेब लाखाधिराज (कार. १९०७–३०) यांनी शिक्षण, प्रौढविवाह इ. सामाजिक सुधारणांबरोबर कृषी क्षेत्रातही सुधारणा केल्या व प्रजावत्सल म्हणुन लौकिक मिळवला. ते नरेंद्रमंडळातही भाग घेत. म. गांधीजीशी त्यांचे चांगले संबधं होते. त्यांच्यानंतर ठाकोर धमेंद्रसिं हजी (कार. १९३०–४०) यांचा दिवाण वीरावालाचा कारभार जुलमी होता. त्यामुळे १९३८ मध्ये संस्थानात आंदोलन झाले. तेव्हा म. गांधीजीनी उपवास केला. अखेर लाखाधिराजांच्या कारकीर्दीत स्थापन झालेल्या प्रजा प्रतिनिधिमंडळांच्या द्वारा (६० सदस्य) जबाबदार राज्यपध्दती सुरू झाली. काठेवाडातील संस्थानात राजकोट दुसऱ्या श्रेणीतले होते. विसाव्या शतकात रेल्वे, पक्क्या सडका, छोट्या गिरण्या, नगरपालिका, दवाखाने, छापखाने, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था अनेक सोयी येथे झाल्या. ब्रिटिशांना रू. १८,९९१ व जुनागढला रू. २,३३० खंडणी संस्थानला द्यावी लागे. १९४८ मध्ये संस्थान सौराष्ट्र संघात विलीन झाले.
कुलकर्णी, ना. ह.