रांगोळी : भारतातील हिंदू समाजात रूढ असलेला एक पारंपारिक कलाप्रकार, पांढरी भुकटी किंवा पूड यांचा उपयोग करून जमिनीवर हाताने काढलेला आकृतिबंध म्हणजे रांगोळी होय. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. ती राजस्थानात ‘मांडणा’ ‘सौराष्ट्रात’ ‘सथ्या’, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ‘चौकपूरना’ किंवा ‘सोनारख्ना’, आंध्र प्रदेशात ‘मुग्गू’, बिहारमध्ये ‘अरिपण’ अथवा ‘अयपन’, तमिळनाडूमध्ये ‘कोलम’, केरळात ‘पुविडल’, ओरिसात ‘झुंटी’, बंगालमध्ये ‘अलिपना’ आणि गुजरातमध्ये ‘साथिया’, कर्नाटकात ‘रंगोली’ व महाराष्ट्रात ‘रांगोळी’ या नावांनी ओळखली जाते. रांगोळी मुख्यतः स्त्रियाच काढतात. शिरगोळ्याचे चूर्ण किंवा भाताची फोलपटे जाळून केलेली पांढरी पूड ही रांगोळीची माध्यमे. याबरोबरच हळदकुंकू वा विविध प्रकारचे रंगही रांगोळीत वापरले जातात. टिंब, रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांचे विविध प्रतीकात्मक आकृतिबंध स्त्रिया हाताने काढतात. अलीकडे मात्र कागदाचे वा पत्र्याचे विविध छाप वापरूनही रांगोळी काढली जाते. रांगोळी ही शुभप्रद आणि अशुभनिवारक मानली जाते. म्हणून ती साधारणपणे दारापुढचे घराचे अंगण, देवघर, देवालये, तुळशीवृन्दावनासारखी पवित्र स्थाने तसेच पाटाभोवती, ताटाभोवती इ. विविध ठिकाणी काढली जाते. भोजनसमारंभ, धार्मिक विधी, सणसमारंभ व मंगलप्रसंगीही रांगोळी काढण्याची प्रथा आहे. घरासमोर दररोज सकाळी रांगोळी काढणारी कुटुंबे आढळतात. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट प्रकारची रांगोळी काढण्याची पद्धत आहे.
रांगोळीची कला केव्हा उदयास आली, हे निश्चितपणे सांगता येत नाही तथापि ही कला सु. दोन हजार वर्षांपूर्वीपासून प्रचलित असावी, असे दिसते. संस्कृतमध्ये ‘रंगवल्ली’ अशी संज्ञा आढळते. वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांच्या यादीत रांगोळीचा उल्लेख आहे. प्राचीन मराठी वाङ्मयातही रांगोळीचे अनेक ठिकाणी निर्देश आलेले आहेत. नलचंपूमध्ये (इ. स. दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचा उल्लेख आहे. गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे. मानसोल्लासात (बारावे शतक) सोमेश्वराने धुलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.
रांगोळी काढण्यासाठी कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नसते. रांगोळीची पूड सामान्यपणे भरभरीत असते. त्यामुळे चिमटीतून ती सहजपणे सुटते. रांगोळीतील आकृतिबंध धार्मिक प्रतीकांचे निदर्शक असतात. सरळ रेषेपेक्षा वक्ररेषा ही अधिक कलात्मक मानली जाते. अशा वक्ररेषा आणि बिंदू, त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांतून विविध नक्षीदार आकृतिबंध साधले जातात. त्यांत स्वस्तिक, सूर्य, चंद्र, अष्टकोन, कमळ, त्याचप्रमाणे ‘सुस्वागतम्’ सारखे शद्ब यांचा समावेश होतो. यांशिवाय ठिपक्यांच्या रांगोळीतून मोर, कासव, कमळ इत्यादिंच्या प्रतिमा रेखाटल्या जातात. ठिपक्यांची रांगोळी आकर्षक असते. रांगोळीचे आकृतिप्रधान व वल्लरीप्रधान असे दोन मुख्य भेद आहेत. आकृतिप्रधान रांगोळी राजस्थान, महाराष्ट्र, द. भारत आणि उ. प्रदेश या प्रदेशांत आढळते. वल्लरीप्रधान रांगोळी भारताच्या पूर्व भागात आढळते. तिच्यात फुलपत्री, वृक्षवल्ली व पशुपक्षी इत्यादींच्या रेखाटनास प्राधान्य असते.
हिंदू, जैन व पारशी इ. धर्मात रांगोळी ही मंगलकारक व अशुभनिवारक मानलेली आहे. अलीकडे रांगोळीमध्ये व्यक्तिचित्रे तसेच प्रसंगचित्रेही काढली जातात. रांगोळ्यांची प्रदर्शने भरविण्याचीही पद्धत रुढ होत आहे. पाण्यावरील गालिचे म्हणजे रांगोळींचा एक प्रकार होय. अलीकडे फेव्हिकॉलमध्ये रंग मिसळून दारात कायम स्वरुपाची रंगीत रांगोळी काढतात.
संदर्भ : Smithsonian Institution Press, Aditi The Living Arts of India, Washington, 1987.
बोराटे, सुधीर
“