रांगणेकर, मोतीराम गजानन : (१० एप्रिल १९०७ – ). मराठी नाटककार आणि पत्रकार. जन्म ठाण्याचा. शिक्षण मॅट्रिकपर्यंत. रंगभूमीकडे वळण्यापूर्वी अरुण (१९२४) आणि मराठीतील अग्रगण्य वाङ्मयीन नियतकालिक म्हणून पुढे ख्याती पावलेल्या सत्यकथा (१९३३) ह्या मासिकांचे ते संपादक होते. अरुण हे मुख्यतः उदयोन्मुख लेखकांसाठी होते आणि त्यात कथा–कादंबऱ्या, नाटकांची संक्षिप्त कथानके, कविता इ. साहित्य प्रसिद्ध होई. काल्पनिक लघुकथांपेक्षा प्रत्यक्ष आयुष्यात घडलेल्या बऱ्यावाईट घटनांवर आधारलेल्या लघुकथा – म्हणजेच सत्य कथा–प्रसिद्ध करणे हा सत्यकथेचा उद्देश होता. आयुष्यात खरोखरी घडलेल्या घटनांवरील गोष्टी, की ज्या सहसा मासिकांतून प्रसिद्ध करण्यास इतर संपादक धजणार नाहीत, अशा सत्य कथा आरंभी सत्यकथेत प्रसिद्ध केल्या जात. आशा, चित्रा, तुतारी, वसुंधरा ह्यांसारख्या साप्ताहिकांचेही ते संपादक होते. खुसखुशीत, विनोदी आणि कल्पकतेची साक्ष देणारे सदरे हे ह्या साप्ताहिकांचे वैशिष्ट्य असल्यामुळे ती लोकप्रिय झाली होती.
रांगणेकरांनी कादंबरीलेखनही केले. सीमोल्लंघन (१९३४) आणि मृगजल (१९३७) ह्या त्यांनी लिहिलेल्या दोन सामाजिक कादंबऱ्या. तथापि त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य रंगभूमीच्या क्षेत्रातले आहे. चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि मराठी नाट्यक्षेत्रातील नामवंत नाट्यसंस्थांचा ऱ्हास झाल्यामुळे १९३३ नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला उतरती कळा आली होती. अशा परिस्थितीत १९४१ साली, रांगणेकरांनी नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली व ती तीस वर्षे उत्तम प्रकारे चालविली. ह्या नाट्यसंस्थेसाठी त्यांनी स्वतः वीस-बावीस नाटके लिहून ती सादर केली. आशीर्वाद (१९४१) हे त्यांनी लिहिलेले पहिले नाटक. त्यानंतर कुलवधु (१९४२), कन्यादान (१९४३), अलंकार (१९४४), माझे घर (१९४५), वहिनी (१९४६), एक होता म्हातारा(१९४८), कोणे एके काळी (१९५०), रंभा(१९५२), भटाला दिली ओसरी (१९५६) इ. नाटके त्यांनी लिहिली. त्यांपैकी कुलवधु ह्या नाटकाला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. नाट्यलेखनाबद्दल रांगणेकर यांना दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९८२) आणि राम गणेश गडकरी पारितोषिक (१९८७) मिळाले. आपल्या नाटकांचे दिग्दर्शन रांगणेकर स्वतः करीत असत.
रांगणेकरांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीबद्दल प्रेक्षकांच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण केला. एकांकी, एकप्रवेशी तंत्राने लिहिलेल्या आपल्या नाटकांतून मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रचलित प्रश्न रांगणेकरांनी सुटसुटीतपणे मांडले. स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनी करण्यावर तसेच नेपथ्य वास्तववादी ठेवण्यावर त्यांचा कटाक्ष होता. संगीताचा उपयोगही त्यांनी चातुर्याने केला, ते त्यांनी माफक ठेवले.
त्यांनी काही एकांकिकाही लिहिल्या आहेत. १९६७ साली म्हापसे (गोवा) येथे भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ग्रामोपाध्ये, गं. ब.