राइट, फ्रँक लॉइड : (८ जून १८६९–९ एप्रिल १९५९). विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ. जन्म रिचलँड सेंटर, विस्कॉन्सिन येथे. त्यांच्या जन्मवर्षाबाबत एकवाक्यता नाही. सर्वसाधारणपणे ते १८६९ मानले जात असले तरी, कौटुंबिक कागदपत्रांत ते १८६७ असेही दिलेले आढळते. त्यांचे वडील मूळचे इंग्लिश व आई वेल्श होती परंतु राइट मात्र स्वतःस अमेरिकन मानते होते. त्यांचे शिक्षण विस्कॉन्सिन विद्यापीठात दोन वर्षे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत झाले, तथापि त्या काळात जॉन रस्किन, व्ह्यॉलेलद्यूक यांसारख्या वास्तुतज्ञ लेखकांचे ग्रंथ वाचनात आल्यामुळे राइट वास्तुकला क्षेत्राकडे आकर्षिले गेले. शिकागो येथे त्यांनी प्रथम जे. एल्. सिल्सबी नामक वास्तुकाराकडे काम केले व नंतर १८८८ साली जगप्रसिद्ध वास्तुशिल्पज्ञ ⇨लूइस सलिव्हन यांच्याकडे वास्तुकलेचे प्राथमिक धडे गिरविले.
राइट यांची वास्तुकारकीर्द १८८९ साली बांधलेल्या इलिनॉय येथील स्वतःच्या घराच्या निर्मितीपासून सुरू झाली आणि पुढे सु. ७० वर्षे त्यांनी नवनव्या कल्पनांनी युक्त व विविधांगी असे विपुल वास्तूंचे
सलोह काँक्रीट या वास्तुसाहित्याच्या अनेकविध शक्यतांचा प्रयोग राइटने रसीन येथील ‘जॉन्सन लॅबोरेटरी’ च्या वास्तुसमूहात केलेला आढळतो. यातील कार्यालयीन वास्तूची अंतर्गत रचना, म्हणजे वरून खाली निमुळत्या होत जाणाऱ्या वर्तुळाकार छत्रधारी स्तंभपंक्तींची कलापूर्ण रचना आहे. सलोह काँक्रीटची ही क्रांतिकारक रचना मानण्यात येते. तसेच रसीन येथे १९४९ मध्ये प्रयोगशाळचा मनोरा बांधण्यात आला, त्याच्या रचनेत मध्यस्तंभावर एकस्तंभी पद्धतीने, प्रत्येक मजला वर्तुळाकार बांधला आहे व त्यास सभोवताली संपूर्ण काचेचे आवरण आहे. एकंदरीत हा सर्व वास्तुसमूह राइटच्या प्रतिभेचा एक नितांतसुंदर आविष्कार मानावा लागेल. राइटच्या वास्तुप्रतिभेची आणखी काही उदाहरणे म्हणजे मॉरिस शॉप (१९४७) ओक्लाहोमा येथील ‘प्राइस टॉवर’ (१९५६) न्यूयॉर्क येथील ‘गुगेनहाइम म्यूझियम’ (१९५८) इत्यादी. गुगेनहाइमची रचना फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातील प्रमुख गॅलरी म्हणजे वर्तुळाकार चढणीची रचना आहे. वर जाताना गॅलरीचा आकार वाढत जातो. प्रथम लिफ्टने ३० मी. (९० फूट) उंच जायचे आणि मग वर्तुळाकार उतरणीवरून (रॅम्प) चित्रांचा आस्वाद घेत चालत खाली यायचे, अशी ह्यातील संकल्पना आहे. मध्यभागी असलेल्या नऊ मजली प्रांगणामुळे अंतर्गत अवकाशरचनेचा अनोखा आविष्कार येथे अनुभवास येतो. (पहा : मराठी विश्वकोश : खंड २ चित्रपत्र ११).
राइटने वास्तुसाहित्य, आकार, रेषा, पोत आणि भूरचना या घटकांना एकसंध व जैव रूप दिले. ‘सेंद्रिय वास्तुकला’ (ऑर्गॉनिक आर्किटक्चर) या नावाने ही त्याची तत्त्वप्रणाली ओळखली जाते. त्याने वास्तुकलाविषयक विपुल लेखन केले. त्याची प्रमुख ग्रंथसंपदा अशी : ॲन ऑटोबायॉग्रफी (१९३२ सुधारित व विस्तृत आवृत्त्या १९४३ व १९६२), ॲन ऑरगॅनिक आर्किटेक्चर : द ऑर्किटेक्चर ऑफ डेमॉक्रसी (१९३९), व्हेन डेमॉक्रसी बिल्ड्स (१९४५), अ टेस्टामेंट (१९५७) इत्यादी. एड्गर कोफमन संपादित ॲन अमेरिकन आर्किटेक्चर (१९५५) या ग्रंथात राइटच्या लेखांचे संकलन व वास्तूंची छायाचित्रे आहेत. आपल्या विविध, विपुल व अनन्यसाधारण वास्तुनिर्मितीद्वारे राइटने या क्षेत्रात अनेक यशस्वी क्रांतिकारक प्रयोग केले. त्यामुळे विसाव्या शतकातील वास्तुकलेवर त्याच्या शैलीचा व तत्त्वविचारांचा खूप प्रभाव पडलेला आढळतो. त्याचा मृत्यू त्याच्या टॅलिएसीन वेस्ट (फिनिक्स, ॲरिझोना नजीक) ह्या संकुलात झाला. (चित्रपत्र ३४).
संदर्भ : 1. Hitchcock, Henry Russel, In the Nature of Materials, 1969.
2. Scully, Vincent, Frank Lloyd Wright, London, 1960.
3. Twombly, Robert C. Frank Lloyd Wright: His Life and His Architecture, New York,
1979.
दीक्षित, विजय
“