रॅमी : (इं. रॅमी, चायना ग्रास, रीआ लॅ. बोहमेरिया निविया कुल-आर्टिकेसी). सुमारे १ ते २·२ मी. उंचीचे हे केसाळ झुडूप मूळचे मलेशिया, चीन व जपान येथील असून सध्या ते मुख्यत्वेकरून चीन, जपान, फिलीपीन्स बेटे व अमेरिका या देशांत वाखासाठी लागवडीत आहे. यांशिवाय आफ्रिका, आशिया व यूरोप रॅमी (बोहमेरिया निविया) : पानेखंडांतील काही देश, रशिया, ब्राझील, मेक्सिको व वेस्ट इंडीज बेटे या प्रदेशांत वाखाचे थोड्या प्रमाणात उत्पादन होते. भारतात आसाम व प. बंगालमध्ये या पिकाची लागवड होते. याचे मूलक्षोड (जमिनीखालील आडवे खोड) बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असून पाने मोठी, साधी, हृदयाकृती, दंतुर (दातेरी) खालील बाजूला पांढरी व केसाळ आणि वरून खरखरीत असतात. फुले एकलिंगी, फार लहान व हिरवी असून पुं-पुष्पे खालच्या पानांच्या बगलेत परिमंजरीवर व स्त्री पुष्पे वरच्या पानांच्या बगलेत असतात. पुं-पुष्पात ४ संदले व केसरदले ३−५ स्त्री पुष्पात ४ परिदलांचे चंबूसारखे मंडल किंजपुट ऊर्ध्वस्थ व किंजले सात [⟶ फूल]. कृत्स्नफळ (शुष्क, एकजीवी व न तडकणारे फळ) चापट, दीर्घवर्तुळाकार व केसाळ असते.

हे झाड फार मजबूत धाग्यासाठी प्रसिद्ध असून झाडाच्या सालीपासून काढलेल्या वाखालाही रॅमी हेच नाव आहे.

बोहमेरिया निविया जातीमध्ये भौगोलिक दृष्ट्या रीआ व रॅमी असे दोन प्रकार आढळून येतात. रीआची पाने वरील बाजूला हिरवी आणि खालील बाजूला पांढरट असतात. रॅमी प्रकारची पाने दोन्ही बाजूंना हिरवीच असतात. सर्वसाधारणपणे दोन्ही प्रकार रॅमी या नावानेच ओळखले जातात.

ही वनस्पती पू. आशियात फार पुरातन काळापासून लागवडीत आहे. सुमारे ४,००० वर्षांपूर्वीच्या चिनी वाङ्‌मयात या वनस्पतीचा उल्लेख आढळतो. प्राचीन ईजिप्तमध्ये तिची लागवड होत असे व धाग्यापासून विणलेल्या कापडाचा उपयोग त्याच्या टिकाऊपणामुळे ‘ममी’ भोवती गुंडाळण्यासाठी करण्यात येत असे.

हवामान व जमीन : रॅमीच्या झाडाच्या वाढीसाठी उबदार व आर्द्र हवामान फार पोषक असते. चांगल्या निचऱ्याच्या सकस गाळवटी जमिनीत खताचा योग्य पुरवठा केल्यास झाडाची वाढ चांगली होते. हे पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणावर खताचा अंश शोषून घेते.

अभिवृद्धी व कापणी : झाडाची अभिवृद्धी बियांपासून करता येते परंतु छाट कलमे अथवा मूलक्षोडाचे तुकडे लावून अभिवृद्धी करणे जास्त पसंत करतात. लागणीपासून सु. १० महिन्यांनंतर पीक कापणीसाठी तयार होते. पुढे वर्षांतून २-३ वेळा कापण्या करतात. पीक ६-७ वर्षे टिकते.

खोडाचा तळाकडील भागाचा हिरवा रंग बदलून त्याऐवजी करडा रंग झाल्यास पीक कापणीयोग्य झाले असे समजतात. खोडे (धाटे) फार जून होण्यापूर्वी आणि त्यांना फुले येण्याअगोदर कापणी करणे आवश्यक असते. धाटांची वाढीची अवस्था व त्यांची उंची यांवर वाखाची प्रत अवलंबून असते. सुमारे ६० सेंमी. उंचीच्या धाटांपासून सर्वांत चांगला वाख मिळतो परंतु उत्पन्न कमी मिळते. १०० ते १२० सेंमी. उंचीच्या घाटांपासून योग्य प्रतीचा धागा मिळून उत्पन्नही समाधानकारक मिळते. तयार झालेली धाटे हाताने कापतात. अमेरिकेत यासाठी यंत्राचा वापर होऊ लागला आहे.

वाख काढणे : रॅमीचा वाख तागाप्रमाणे धाटे पाण्यात कुजवून काढता येत नाही. त्यामुळे वाख काढणे हे कष्टाचे व खर्चाचे काम आहे. अतिपूर्वेकडील देशांतील शेतात धाटे तपासून फक्त कापणीयोग्य झालेली धाटे एक एक याप्रमाणे कापतात. नंतर हाताने त्यांवरूल साल खरवडून आतील धागे सोलून खोडापासून मोकळे करतात. कच्च्या धाग्यावर चिकट पदार्थाचा थर असतो व तो काढल्याशिवाय त्यापासून विणण्यालायक सूत तयार करता येत नाही. हा थर काढण्यासाठी साबण अथवा चुन्याचा उपयोग करतात. वाख काढण्यामागील समस्यांमुळे रॅमीचे उत्पादन इतर नैसर्गिक धाग्यांच्या मानाने फार कमी आहे.

अलीकडील काळात अमेरिकेत रॅमीचा वाख काढण्यासाठी नवीन पद्धतीची यंत्रे व प्रक्रियांचा शोध लागल्यामुळे वाख काढणे पूर्वीपेक्षा सोपे व कमी खर्चाचे झाले आहे. त्याचबरोबर लागवडीच्या पद्धतीत संशोधनामुळे सुधारणा झाल्यामुळे व इतर अनेक बाबतींतील संशोधनामुळे रॅमीचा वाख त्या देशात व्यापारी प्रमाणावर उपलब्ध होऊ लागला आहे.

धाग्याचे गुणधर्म : वनस्पतिज तंतूमध्ये रॅमीचे तंतू (धागे) सर्वांत जास्त लांब (४० ते २०० मिमी.) असून ते चिवट व मऊ असतात. रॅमीचा धागा कापसाच्या धाग्यापेक्षा आठपट मजबूत असतो. तो दीर्घकाळ टिकणारा असून बुरशी व इतर सूक्ष्मजीवांचा त्यावर परिणाम होत नाही. प्रकाशात दीर्घ काळ ठेवल्यामुळे त्याचा रंग बदलत नाही. तो स्वच्छ पांढरा व तेजदार असून त्याला हवा तो रंग देता येतो. जवस, अंबाडी अथवा तागाच्या धाग्यापेक्षा तो पुष्कळ बाबतींत श्रेष्ठ आहे. या धाग्यांपासून तयार केलेले कापड धुण्यास सोपे असून ते धुण्यात आटत नाही अगर कपड्याचा आकार वेडावाकडा होत नाही. ओला कपडा वाळलेल्या कपड्यापेक्षा जास्त मजबूत असतो तो लवकर वाळतो व प्रत्येक धुण्याबरोबर जास्त गुळगुळीत व चमकदार बनतो. रॅमीच्या धाग्यात काही दोषही आहेत. लोकरीच्या अथवा रेशमाच्या धाग्यासारखा तो स्थितिस्थापक (दिलेला ताण काढून घेतल्यावर मूळ स्थितीत परत येण्याचा गुणधर्म) नसतो व कापसाच्या धाग्याप्रमाणे लवचिक नसतो. धाग्यापासून काढलेले सूत केसाळ असते. मर्सरायझेशन [⟶ कापडावरील अंतिम संस्करण] पद्धतीने रॅमीच्या सुतातील केसाळपणा व ठिसूळपणा हे दोष काढून टाकता येतात. रॅमीच्या धाग्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म त्यातील पुष्कळ प्रमाणातील सेल्युलोजमुळे (सु. ६६%) असतात.

उपयोग : धान्याच्या पिशव्या, शिडाचे कापड, यंत्राचे पट्टे, मासे पकडण्याची जाळी, कॅनव्हास, गाळणी-कापड, औद्योगिक वापरासाठी दोरा, जहाजासाठी दोरखंड, गॅसबत्तीची वायुजाळी व कागद बनविण्यासाठी रॅमीचा उपयोग करतात. रॅमीच्या धाग्यापासून स्वतंत्रपणे कापड विणले जात नाही. लोकर, रेशीम, कापूस अथवा रेयॉन यांच्या धाग्यात रॅमीचा धागा मिसळून कापड विणतात. चमकदार व सुरकुत्या न पडणाऱ्या कापडनिर्मितीसाठी या धाग्याचा विशेष वापर होऊ लागला आहे.

संदर्भ : 1. C. S. l. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, Delhi, 1948.

2. Hill, A. F. Economic Botany, New York, 1952.

ज्ञानसागर, वि. रा. चौधरी, रा. मो. गोखले, वा. पु.