रनो, ल्वी : (२१ मे १८४३–८ फेब्रुवारी १९१८). फ्रेंच विधिज्ञ आणि जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी.

त्याचा जन्म ओतूं, फ्रान्स येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. विश्वविद्यालयीन शिक्षण घेऊन त्याने कायद्याची उच्च पदवी घेतली (१८६७). त्याची दीझाँ व पॅरिस विद्यापीठांत व्याख्याता-प्राध्यापक (१८७४–८१) म्हणून नियुक्त्ती झाली. पुढे पॅरिस विद्यापीठात याने आंतरराष्ट्रीय विधी हा विषय सुरू करून प्राध्यापक म्हणून या पदावर तो अखेरपर्यंत म्हणजे निवृत्तीपर्यंत होता. त्यामुळे ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल लॉ’ या प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्षपद त्यास देण्यात आले. फ्रान्सच्या परराष्ट्रीय खात्यात १८९० मध्ये त्याची सल्लागार सहाय्यक म्हणून नियुक्त्ती करण्यात आली. अनेक जागतिक कायदेविषयक परिषदांत त्याने फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले.

द हेग येथे भरलेल्या १९०७ च्या शांतता परिषदेस तो फ्रेंच प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता. द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाचा एक निःपक्षपाती सदस्य म्हणून त्याने नावलौकिक मिळविला होता. त्याचा अनेक जागतिक वादग्रस्त प्रकरणात सल्ला घेतला जात असे. स्वतंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या राजकीय आश्रयाविषयीच्या विवाद्य प्रकरणात न्याय चौकशीच्या वेळी त्याने सावरकरांविरुद्ध ब्रिटनच्या बाजूने निकाल दिला (फेब्रुवारी १९११). या निकालासंबंधी तत्कालीन वृत्तपत्रांनी विशेषतः द मॉर्निंग पोस्ट, द डेली न्यूज (इंग्लंड), पोस्ट (जर्मनी), द टाइम्स (इंग्लंड) इत्यादींनी टीका केली. रनोने आपले उर्वरित आयुष्य कायद्याचा अभ्यास आणि जागतिक शांतता व निःशस्त्रीकरण यांसाठी व्यतीत केले. याशिवाय द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवाद मंडळाचा तो सभासद असताना त्याने वरील बाबींचे काटेकोरपणे पालन व्हावे, म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याच्या या शांतता कार्याबद्दल त्याला १९०७ मध्ये ⇨ एर्नेस्तो मोनेअताबरोबर शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

फ्रान्सच्या सक्रिय राजकारणात रनो कधीच सहभागी झाला नाही. आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाच्या निकालात शक्यतो एकवाक्यता असावी, असे त्याचे स्पष्ट मत होते.

त्याने आंतरराष्ट्रीय कायदा व व्यापार यांवर विपुल लेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकी इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल लॉ (इं. भा. १८७९), कॉम्पेन्डियम ऑन कमर्शिअल लॉ (सहलेखक-इं. भा. १८८४-८५) इ. ग्रंथ मान्यवर आहेत. तो बार्विझाँ येथे मरण पावला.

शेख, रुक्साना