रंगून : ब्रह्मदेशाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे व्यापारी, औद्योगिक शहर तसेच प्रमुख बंदर. लोकसंख्या २४,५८,७१२ (१९८३ अंदाज). हे शहर अंदमान समुद्रापासून ४० किमी. अंतरावर असून रंगून या इरावतीच्या पूर्वेकडील एका नदीमुखावर वसले आहे. शहराचे क्षेत्र सु. ५०० चौ. किमी. आहे.
श्वे डागोन पॅगोडा हा कित्येक शतकांपासून महत्त्वाचे यात्रास्थान म्हणून गणला गेला आहे. या पॅगोड्याच्या आसपास जी वस्ती प्रथम झाली, तिला मध्ययुगापासून ‘डागोन’ असे नाव होते. पंधराव्या शतकारंभीच्या कालखंडात मॉन राजांनी या वस्तीचे शहरात रूपांतर केले. अलौंगपेया राजाने १७५५ मध्ये ब्रह्मदेशाचा दक्षिण भाग काबीज करून या शहराचा बंदर म्हणून विकास केला. अलौंगपेयाने बंदराला व शहराला ‘यांगोन’(संघर्षाचा अंत) असे नाव दिले याचेच पुढे ‘रंगून’ असे लिप्यंतरण झाले. मेढेकोट व तीन बाजूंना असलेल्या खाड्या तसेच दक्षिणेकडे नदी यांनी परिवेष्टित अशा रंगूनला तीन बंदर-धक्के होते व स्थानिक साग-उत्पादनवैपुल्यामुळे तेथे जहाजबांधकाम उद्योग भरभराटीत होता. पहिल्या इंग्रज-ब्रह्मी युद्धात (१८२४) ब्रिटिशांनी रंगून हस्तगत केले तथापि दोन वर्षांनी ते पुनश्च मुक्त केले. दुसऱ्या इंग्रज-ब्रह्मी युद्धात (१८५२-५३) ब्रिटिशांनी रंगून पुन्हा काबीज करून तेच ‘ब्रिटिश लोअर ब्रह्मदेशा’चे प्रशासकीय केंद्र केले. रंगून ही स्वातंत्र्यानंतरही देशाची राजधानी करण्यात आली.
ब्रिटिशांकित ब्रह्मदेशात रंगूनमधील सर्वांत महत्त्वाचे उद्योगधंदे म्हणजे स्थानिक कच्च्या मालावर आधारित असे भातसडीच्या व लाकूड कापणीच्या गिरण्या हे होत. जगातील सर्वांत मोठ्या तांदळाच्या बाजारपेठांमध्ये रंगूनचा समावेश होतो. ब्रह्मदेश स्वतंत्र झाल्यापासून औद्योगिकीकरणाने वेग घेतला असून कापडगिरण्या, साबण, रबर, ॲल्युमिनियम, अन्नप्रक्रियित पदार्थ यांचे उत्पादन करणारे कारखाने उभारले जात आहेत. सरकारी मालकीच्या उद्योगांमध्ये औषधे, सुती वस्त्रे, लोखंड-पोलाद यांच्या निर्मितीउद्योगांचा समावेश होतो. रंगूनमध्ये खनिज तेल परिष्करण केंद्रही आहे. याशिवाय येथे ॲल्युमिनियम भांडी व उपकरणे, रबरी पादत्राणे, तंबाखू, दोरखंड, स्टार्च, आगकाड्या इत्यादींचेही उद्योग आहेत. रंगून शहराच्या मध्यवर्ती भागात व्यापारविभाग असून त्यात बँका, व्यापारकार्यालये, व्यापारमंडळे, बाजारपेठा इत्यादींचा अंतर्भाव होतो.
रंगून हे जल, हवाई व खुष्कीच्या मार्गांनी देशाच्या इतर भागांना जोडलेले आहे. ब्रह्मदेशाचा ८०% व्यापार रंगून बंदरामार्फत चालतो. प्रोम व मंडाले या शहरांना जाणारे लोहमार्ग रंगूनमधूनच सुरू होतात. इरावती व सितांग या दोन नद्यांशी त्वांते व पेगू-सितांग या दोन नौवहनयोग्य अशा कालव्यांनी रंगून जोडलेले आहे. रंगूनच्या उत्तरेस १६ किमी.वर मिन्गॅलॅडन हा आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ‘युनियन ऑफ वर्मा एअरवेज’ या ब्रह्मी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनीद्वारा रंगून शहर देशांतर्गत तिसांहून अधिक विमानतळांशी जोडलेले आहे.
रंगून महानगरपालिकेद्वारा (स्था. १८७४) शहराचा कारभार १९७१ मध्ये शहराची १३ प्रदेश व २८ उपप्रदेश यांमध्ये विभागणी करण्यात आली. शहराला ल्हाग्वा सरोवर आणि ग्योब्यू जलाशय यांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो त्यांशिवाय ठिकठिकाणी आर्टेशियन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. १९६० पासून रंगूनला बालू चाऊंग जलविद्युत् प्रकल्पाद्वारा वीजपुरवठा होतो. दुसऱ्या महायुद्धापूर्वी रंगूनमध्ये ‘रंगून जनरल हॉस्पिटल’, स्त्रियांसाठीचे ‘डफरिन हॉस्पिटल’ आणि लहान रुग्णालये होती. सांप्रत शहरात अनेक विशेष रुग्णालये उघडण्यात आली आहेत. रंगूनमध्ये आगी लागण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने केंद्रीय अग्निशामक दलाखेरीज रंगूनच्या उपनगरांत अग्निशामक केंद्रेही आहेत. शहराच्या सर्व भागांत आरोग्य सेवा केंद्रे विखुरलेली असून वैद्यकीय उपचार मोफत असतात.
शहरात सु. १०० उच्च माध्यमिक विद्यालये, दोन तांत्रिक विद्यालये आणि अनेक प्राथमिक व माध्यमिक विद्यालये आहेत. रंगून विद्यापीठाची (स्था. १९२०) १९६४ मध्ये विविध विद्याशाखांसहित पुनर्रचना करण्यात आली. याशिवाय शहरात अनेक विभागीय महाविद्यालये, शिक्षक-प्रशिक्षणसंस्था व तंत्रसंस्था आहेत.
रंगूनमध्ये नृत्य-नाट्यादी कलांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असून प्राचीन ब्रह्मी नृत्य व संगीत यांचे जतन करण्याच्या दृष्टीने एक सांस्कृतिक कलापथक कार्यशील असते. जुन्या अश्वशर्यत मैदानाजवळील खुले नाट्यगृह व पूर्वीचा जूबिली हॉल ही रंगमंदिरे म्हणून ओळखली जातात. शहरात सु. २० चित्रपटगृहे आहेत. रंगूनमध्ये अनेक संग्रहालये असून त्यांपैकी ‘राष्ट्रीय कला व पुरातत्त्वविद्या संग्रहालय’ व ‘बॉग्योक आँग सान संग्रहालय’ ही विख्यात आहेत. ग्रंथालयांमध्ये ‘राष्ट्रीय ग्रंथालय’, ‘विद्यापीठ ग्रंथालय’, ‘सार्पे बेकमन सार्वजनिक ग्रंथालय’ इ. प्रसिद्ध आहेत. शहरात ग्रंथ, मासिके, नियतकालिके इत्यादींची छपाई करणारे अनेक छापखाने आहेत. ब्रह्मी व इंग्रजी भाषांमध्ये अनेक दैनिक वृत्तपत्रे येथून प्रकाशित होतात. शासकीय रेडिओ प्रक्षेपण केंद्राद्वारे ब्रह्मी, इंग्रजी व इतर अनेक भाषांतून विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात. दूरचित्रवाणीसेवा मर्यादितच आहेत.
रंगूनमध्ये सु. १६ उद्याने असून त्यांपैकी ‘महा बंदूला उद्यान’ व ‘क्रांति-उद्यान’ ही दोन सर्वांत मोठी आहेत. यांशिवाय शहरात वनस्पतिउद्याने आणि प्राणिसंग्रहोद्याने आहेत. लॅनमाडॉजवळील अश्वशर्यत मैदानातील एन्व्हॉय हॉल येथे प्रदर्शने भरविण्यात येत असून जुने क्वायकासान अश्वशर्यत मैदान प्रदर्शने व राष्ट्रीय महत्त्वाचे समारंभ यांसाठी वापरण्यात येते. मिन्गॅलॅडन व इन्सेन येथे प्रत्येकी एक गोल्फ मैदान आहे. यांशिवाय शहरात अनेक क्रीडागारे असून ‘आँग सान क्रीडागार’ हे सर्वांत मोठे (सु. ५०,००० प्रेक्षक बसू शकतील एवढे) व प्रेक्षणीय आहे.
रंगूनमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांमध्ये बौद्ध पॅगोडे, मठ इत्यादींचा समावेश होतो. श्वे डागोन हा सर्वांत जुना पॅगोडा (सु. २,००० वर्षांपूर्वीचा) एका उंच टेकाडावर उभारलेला असून त्याचा सोनेरी मुलाम्याने मढविलेला मनोरा ९९ मी. उंच आहे. बौद्ध पर्यटकांत ह्या पॅगोड्याविषयी विलक्षण आदर व श्रद्धा आहे कारण त्यांच्या मते या पॅगोड्यात भगवान बुद्धाचे अवशेष आहेत. १९५२ मध्ये गौतम बुद्धाच्या महानिर्वाणाला २,५०० वर्षे पूर्ण झाली, त्यास्मरणार्थ श्वे डागोन पॅगोड्याच्या उत्तरेला विश्वशांती पॅगोडा बांधण्यात आला. शहरातील अन्य धार्मिक वास्तुशिल्पांमध्ये सूले पॅगोडा, बोटाताऊंग पॅगोडा हे महत्त्वाचे मानण्यात येतात.
रंगूनमधील लाल विटांमध्ये बांधलेल्या जुन्या वसाहतकालीन वास्तूंपैकी जुने सचिवालय, न्यायमंदिरे, रंगून सार्वजनिक रुग्णालय, सीमाशुल्क कार्यालय, शासकीय कार्यालय इ. प्रसिद्ध आहेत. नव्या व आधुनिक वास्तुशैली प्रतिबिंबित करणाऱ्या वास्तू म्हणजे नवे सचिवालय, श्वे डागोन पॅगोडा मार्गावरील विभागीय भांडारे, तंत्रनिकेतन, ब्रह्मी रेडिओ प्रक्षेपण केंद्र, वैद्यय संस्था, रंगून तंत्रविद्या संस्था ह्या होत.
गद्रे, वि. रा.