योकाई, माउरूस : (१८ फेब्रुवारी १८२५ – ५ मे १९०४). श्रेष्ठ हंगेरिअन कादंबरीकार. जन्म कोमारॉम येथे. १८४६ साली त्याने कायद्याची पदवी घेतली पण वकिलीचा व्यवसाय फारसा केला नाही साहित्य आणि राजकारण ह्या क्षेत्रांतच राहिला. १८४८ साली हंगेरीत झालेल्या क्रांतिकारक चळवळीत तो सहभागी होता. हंगेरिअन संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून त्याने काही काळ काम केले. १८९७ मध्ये हंगेरिअन संसदेच्या वरिष्ठ गृहाचा आजीव सदस्य म्हणून त्याची निवड झाली.
योकाईने नाट्यलेखन आणि कथालेखनही केलेले असले, तरी त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या कादंबरीलेखनावर. ‘वीकडेज’ (१८४६, इं. शी.) ही त्याची पहिली कादंबरी. त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्यांत (सर्व इं. भा.) द गोल्डन एज इन ट्रान्सिल्व्हेनिया (१८५२), द डे ऑफ रॉथ (१८५६), द बॅरन्स सन्स (१८६९) आणि ब्लॅक डायमंड्स (१८७०) ह्यांचा समावेश होतो.
जोमदार शैली, विनोदाचा परिणामकारक वापर आणि गतिमान कथानके ही त्याच्या कादंबरीची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत.
बूडापेस्ट येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.