कॉझिन्त्सी, फेरेंट्स :(२७ ऑक्टोबर १७५९–२१ ऑगस्ट १८३१). हंगेरियन साहित्यिक. जन्म एर्सेमल्येन येथे एका खानदानी कुटुंबात. शिक्षण शारशपाटक येथे. जर्मन आणि फ्रेंच ह्या भाषा त्याला अवगत होत्या. पुरोगामी विचारांनी त्याचे मन भारलेले होते. वाङ्मयाविषयी त्याला पहिल्यापासूनच आस्था होती. Magyar Museum (१७८८) आणि Orpheus (१७९०) ही दोन पुरोगामी वाङ्मयीन नियतकालिके त्याने याच आस्थेने काढली. शिक्षणोत्तर तो सरकारी नोकरीत शिरला. पुढे सरकारविरुद्धच्या एका कटाशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला देहान्ताची सजा सांगण्यात आली परंतु नंतर ती रद्द करून त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर (१८०१) त्याने आपले सारे आयुष्य हंगेरियन साहित्याच्या सेवेत घालविले.

 

हंगेरियन भाषेला इतर यूरोपीय भाषांचा दर्जा लाभावा आणि समर्थ वाङ्मयीन अभिव्यक्तीची क्षमता तिच्या ठायी निर्माण व्हावी यासाठी त्याने आमरण धडपड केली. त्यासाठी अनेकांशी वादविवाद केले. समकालीन हंगेरियन लेखकांशी विपुल पत्रव्यवहार केला. उच्च वाङ्मयीन आदर्श प्रस्थापित करण्यासाठी त्याने स्वतःही बरेच लेखन केले. लेसिंग, गटे, क्लोपश्टोक, मोल्येर, शेक्सपिअर, मेतास्ताझ्यो ह्यांचे उत्तमोत्तम साहित्य अनुवादरूपाने त्याने हंगेरियन भाषेत आणले. कविता लिहिल्या. दीर्घकाळ वापरात न आलेले अनेक हंगेरियन शब्द त्याने आपल्या साहित्यातून पुन्हा जिवंत केले. सुनीतासारखा एक महत्त्वपूर्ण काव्यप्रकार हंगेरियन भाषेत रूढ केला. हंगेरियन लेखकांवर चिकित्सक निबंध लिहिले. हे सारे करीत असताना कडव्या विरोधाला त्याला तोंड द्यावे लागले. एकदोनदा त्याचे ग्रंथ हंगेरीत जाहीरपणे जाळण्यात आले होते. तथापि तरुणांचा मोठा अनुयायीवर्ग आपल्या हयातीतच त्याला लाभला. हंगेरियन अकादमीची स्थापना करण्यासाठी नेमलेल्या समितीत त्याचा समावेश करण्यात आला (१८२८) व त्यानंतर त्या अकादमीच्या सदस्य म्हणून त्याची नियुक्तीही करण्यात आली (१८३०). आजच्या मूल्यमापनात कॉझिन्त्सीच्या स्वतःच्या लेखनाची वाङ्मयीन उंची त्याला त्याच्या हयातीत मिळालेल्या मान्यतेच्या मानाने मोठी नसली, तरी हंगेरियन भाषेची जडणघडण आणि तिच्या वाङ्मयीन शैलीचा विकास यांच्या संदर्भात त्याची कामगिरी निःसंशय मोलाची आहे.

 सेफालोम येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.