येरावा : दक्षिण भारतातील एक अत्यंत वन्य व मागासलेली जमात. ती केरळ राज्यात वायनाड विभागात प्रामुख्याने होती. तिथून ही कर्नाटक राज्यातील कुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागात आली व स्थिर झाली. पोन्नामेट व श्रीमंगलम् भागातल्या सर्व खेड्यात त्यांची वसती आहे. त्यांची लोकसंख्या १३,७४३ होती (१९७१). सर्व वन्य जमातींमध्ये अत्यंत विपन्न अशी येरावांची स्थिती असून बेट्टा, कुरुबा या जमातींचे दास्य येरावा पुरातन कालापासून करीत आले आहेत. कुरुबा जमातीशी त्यांचे शारीरिक दृष्ट्या बरेच साम्य आहे.
हे मुख्यत्वे शेतमजुरी करतात. सांप्रत बरेच जण कॉफीच्या मळ्यात मजुरी करतात. पूर्वी हे शिकार व जंगलातील कंदमुळे, फळे गोळा करीत.
यांच्यात चार कुळी आहेत : पंजिरी, पनिया, बडवा आणि काजी. आतेमामे भावंडांत लग्न होते. ज्ञातिप्रमुखाला ‘कनलदी’ म्हणतात, लग्न तोच जुळवतो. नवऱ्या मुलाचा व नवऱ्या मुलीचा ‘कनलदी’ वेगळा असतो. ज्ञातिप्रमुख हा वस्तुतः त्या त्या कुळीचा परंपरेने प्रमुख असतो. लग्नात मुलीचे देज द्यावे लागते. लग्नाच्या वेळी गंगापूजन करतात. कालीची पूजा येरावांत रूढ आहे. त्यांची दुसरी देवता करिंगिळी अथवा कुट्टथम्मा असून तिचे प्रतीक एक दगड असतो. त्याशिवाय गूलिगन, कुट्टिच्छियन ही दैवतेही त्यांच्यात आहेत. ते गोमांस भक्षण करीत नाहीत.
मूल जन्माला आले की ४० दिवस सोयर पाळतात.
मृताला पुरतात. सुतक पाच दिवस असते. श्राद्धाच्या दिवशी काकबली (काकपिली) करतात.
संदर्भ : 1. Iyer, L. A. Krishna, The Coorg Tribes and Castes, Madras, 1948.
2. Sherring, M. A. Hindu Tribes and Castes, Vol. II, Delhi, 1974.
भागवत, दुर्गा