याल्टा : यूरोपीय रशियातील युक्रेन सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिकच्या क्रिमिया ओब्लास्टमधील काळ्या समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर आणि सुप्रसिद्ध आरोग्यस्थान. लोकसंख्या ८४,००० (१९८३ अंदाज). हे सेव्हॅस्टोपोलच्या पूर्वेस ५५ किमी.वर असून क्रिमियन पर्वतराजी व काळा समुद्र यांदरम्यान एक नैसर्गिक रंगमंडलसदृश द्रोणीत वसलेले आहे.

सोव्हिएट रिव्हिएरास्थित व भूमध्य समुद्रीय हवामानसंपन्न याल्टा हे १४८० पासनू आरोग्यस्थान म्हणून विख्यात होते. सांप्रत ते कामगारांचे आरोग्यकेंद्र म्हणूनही ओळखले जाते. १८३८ मध्ये याल्टाला शहराचा दर्जा मिळाला.

अनुकूल हवामान, सौम्य हिवाळे व समुद्र आणि पर्वतराजी यांदरम्यानचे रमणीय निसर्गसौंदर्य यांमुळे याल्टा हे रशियातील सर्वाधिक लोकप्रिय विश्रामस्थान व आरोग्यस्थान बनले असून येथे अनेक हॉटेले व आरोग्यधामे आहेत अंतॉन चेकॉव्ह (१८६०–१९०४) या विख्यात रशियन कथाकार-नाटककाराच्या सूचनेवरून १९०० साली बांधण्यात आलेले आरोग्यधामही येथेच आहे. याशिवाय शहरात रंगमंदिर, संग्रहालये, विशेष शैक्षणिक व संशोधनविषयक संस्था तसेच महाविद्यालये आहेत. येथे मद्यनिर्मिती, फळे डबाबंदीकरण, तंबाखू-प्रक्रिया इत्यादींचे उद्योग चालतात. काळ्या समुद्रावरील बंदरांतून जाणाऱ्या प्रवासी जहाजांना तर याल्टा हे इंधन व अन्य आवश्यक माल भरण्याचे, दुरुस्तीचे तसेच माल उतरविण्याचे-चढविण्याचे महत्त्वाचे थांब्याचे बंदर म्हणून जवळचे वाटते. याल्टामधून मद्य, तंबाखू, द्राक्षे व फळफळावळ यांची निर्यात केली जाते. सींफ्यिरॉपल शहराशी याल्टा हे सडकेने जोडलेले आहे.

दुसऱ्या महायुद्धाकाळात दोस्त राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद या शहरात भरली होती [⟶ याल्टा परिषद].

गद्रे, वि. रा.