यारी : जड वजन एका ठिकाणाहून उचलून ते दुसऱ्या ठिकाणी हालविणाऱ्या यंत्राला यारी म्हणतात. साध्या उच्चालक यंत्रात कप्प्या व दोर यांच्या साहाय्याने वस्तू त्याच जागेवर फक्त उचलल्या जातात. यारीच्या साहाय्याने वस्तू प्रथम उचलून नंतर ती जमिनीला हवी तशी समांतर हलवून योग्य ठिकाणी ठेवली जाते म्हणजे वस्तू तीन दिशांतून हलविली जाते.

 लोखंड, पोलाद, मोठी यंत्रे व इतर अवजड सामग्री उत्पादन करणाऱ्या कारखान्यांत जड भागांची हलवाहलव नेहमी करावी लागते. वस्तू तयार झाल्यावर वाहतुकीसाठी त्या मोठे ट्रक व रेल्वे वाघिणी यांवर चढवाव्या वा उतरावाव्या लागतात. जहाजातून ने-आण करण्यात येणाऱ्या वस्तूंची बंदरात चढ-उतार करावी लागते. धरणे, पूल, विद्युत्‌ निर्मिती केंद्रे यांसारख्या मोठ्या बांधकामांकरिता कच्च्या वा पक्क्या रस्त्यावरून जड यंत्रे व नळ इकडून तिकडे न्यावे लागतात आणि ते जोडताना अचूकपणे ठेवावे लागतात. रस्त्यावर वा रेल्वे मार्गावर अपघात झाला, तर मोडतोड झालेल्या वस्तू दूर कराव्या लागतात. या सर्व कामांसाठी जरूरीप्रमाणे वेगवेगळ्या रचनेच्या, आकारमानांच्या व क्षमतेच्या याऱ्या वापरल्या जातात.

 कोणत्याही यारीच्या क्षमतेचा निर्देश करताना तिची जास्तीत जास्त वजन उचलण्याची क्षमता व तिचे कार्यक्षेत्र (म्हणजे उंची, रुंदी व त्रिज्या) यांच्या मर्यादांचा उल्लेख करणे आवश्यक असते. दोन टन वजन उचलणाऱ्या व हाताने चालविल्या जाणाऱ्या लहान यारीपासून ते २०० टन वजन उचलणाऱ्या आणि असे जड वजन अगदी अल्प (१ सेंमी.) अंतरातून उचलणे वा हलविणे इतके सूक्ष्म नियंत्रण असणाऱ्या प्रचंड याऱ्या वापरण्यात आहेत. या सर्व याऱ्यांच्या रचनेत बरेचसे साधर्म्य दिसते.

 सर्व प्रकारच्या याऱ्यांमध्ये वजन जमिनीपासून उचलण्यासाठी सर्वसाधारणपणे पुढील रचना असते. वजन उचलणारा दोर अनेक बारीक पोलादी तारांपासून बनविलेला असतो. या दोराच्या टोकाला वजन अडकविण्याचा आकडा असतो. उचलावयाच्या वस्तूच्या स्वरूपानुसार आकड्याऐवजी चिमटा, झोली, चुंबक वा बादली वापरण्यात येते. दोर एका दंडगोलावर गुंडाळलेला असून त्याच्या आसावर गती कमी करण्यासाठी लहानमोठी दंतचक्रे असतात. यामुळे दंडगोल हवा तितका सावकाश उलटसुलट फिरविता येतो आणि दोर दंडगोलावरून सुटतो वा गुंडाळला जातो व वजन खाली वा वर जाते. दंडगोल फिरविण्यासाठी लागणारी शक्ती मनुष्य, विद्युत्‌ चलित्र (मोटर) वा डीझेल एंजिन यांद्वारे मिळविली जाते. वजनामुळे दंडगोल आपोआप फिरू नये म्हणून रॅचेट [एकाच दिशेने फिरणारे दातेरी चाक ⟶ रॅचेट चाक व खिटी] गतिरोधक बसविलेले असतात. आडव्या तुळईवरून सरकू शकणारा विद्युत्‌ चलित्रयुक्त उच्चालक आ. १ मध्ये दाखविला आहे.

आ. १. विद्युत् चलित्रयुक्त उच्चालक : (१) विद्युत् चलित्र, (२) दोर गुंडाळण्याचा दंडगोल, (३) नियंत्रण बटणे, (४) वजन अडकविण्यासाठी आकडा. प्रेरक शक्ती : यारीच्या साहाय्याने वजनाची हालचाल करण्यासाठी लागणाऱ्या शक्तीकरिता पुढील साधने वापरली जातात.

आ. १. विद्युत् चलित्रयुक्त उच्चालक : (१) विद्युत् चलित्र, (२) दोर गुंडाळण्याचा दंडगोल, (३) नियंत्रण बटणे, (४) वजन अडकविण्यासाठी आकडा.(१) मनुष्यबळ : जेथे यारीचा उपयोग क्वचित होतो तेथे मर्यादित वजन (२ ते २० टन) सावकाश उचलण्यासाठी मनुष्यबळाचा उपयोग केला जातो. कारण यासाठी भांडवली खर्च कमी लागतो. (२) वाफ : वीज सर्वत्र उपलब्ध नव्हती तेव्हा (विशेषतः रेल्वेच्या कामासाठी) कोळशावर वाफ निर्माण करून त्या शक्तीचा यारीच्या चालनासाठी उपयोग होत असे. (३) दाबाखालील पाणी : बंदरात अनेक याऱ्या एकाच वेळी काम करीत असतात. त्यांना शक्ती पुरविण्यासाठी मध्यवर्ती केंद्रात पंपाच्या साहाय्याने पाण्याचा दाब वाढवून ते प्रत्येक यारीपर्यंत पोहोचविलेले असते. (४) विद्युत्‌ चलित्र : वरील (२) व (३) हे प्रकार मागे पडले असून मर्यादित जागेत काम करणाऱ्या सर्व याऱ्यांना आता विद्युत्‌ चलित्रे बसविलेली असतात. चलित्राची गती पाहिजे तशी नियंत्रित करता यावी म्हणून पूर्वी एकदिश विद्युत्‌ प्रवाहाचा उपयोग होत असे. प्रत्यावर्ती (मूल्य व दिशा वारंवार उलटसुलट होणाऱ्या) विद्युत्‌ प्रवाहावर चालणाऱ्या चलित्रांचे वेग नियंत्रण करणे जास्त सुलभ झाल्यामुळे आता यारीतील सर्व गतींसाठी ही चलित्रे वापरली जातात. (५) डीझेल एंजिन : प्रवासी यारीचा कोठेही उपयोग करावयाचा असल्यामुळे वीज उपलब्ध नसते तेव्हा डीझेल एंजिन यारीचे वाहन चालविण्यासाठी, तसेच वजन उचलण्याच्या दोराचा दंडगोल फिरविण्यासाठी व यारीच्या इतर गतींसाठी वापरले जाते. एंजिनाचा वेग कमीजास्त करून व क्लचचा उपयोग करून वजन उचलणे व फिरविणे या गतींचे नियंत्रण केले जाते. (६) दाबाखालील तेल : सिलिंडर व दट्ट्या यांत दाबाखालील तेल वापरून दट्ट्या मागे-पुढे करण्याच्या गतीचा उपयोगही यारीमध्ये वाढत आहे. 


 आ. २. स्तंभ यारी : (१) खीळ, (२) दोर गुंडाळण्याचा दंडगोल, (३) जिब, (४) वजन उचलण्याचा दोर, (५) ताण घेणारा दोर, (६) स्तंभ, (७) स्तंभ आसाभोवती फिरण्यासाठी योजना.स्तंभ यारी : (आ. २). या यारीत मध्यभागी एक उभा बळकट स्तंभ असतो. या स्तंभाच्या तळाशी जिबचे (म्हणजे यारीवर येणारे वजन पेलणाऱ्या भक्कम बहालाचे) खालचे टोक खिळीने जोडलेले असते. जिबचे वरील टोक ताण घेणाऱ्या दोराने स्तंभाला बांधलेले असते. यामुळे जिब वजन पेलू शकतो. वजन उचलण्याचा दोर गुंडाळण्याचा दंडगोल जिबवर बसविलेला असून तो यांत्रिक रहाटाच्या साहाय्याने हाताने फिरविता येतो. दंडगोलावरचा दोर जिबच्या वरील टोकाशी असलेल्या कप्पीवरून खाली आलेला असतो आणि त्याच्या टोकाला वजन अडकविण्याचा आकडा असतो. स्तंभ हा तळाशी असलेल्या फिरत्या मंचावर बसविलेला असल्यामुळे स्तंभ, जिब व उचललेले वजनही फिरू शकते. ताणाच्या दोराची लांबी बदलून जिबचा कोन बदलण्याची सोय यारीत असू शकते व त्यासाठी ताणाचा दोर वेगळ्या दंडगोलावर गुंडाळलेला असतो. जिबचा कोन बदलून व जिब आसाभोवती फिरवून वजन एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या इच्छित स्थळी ठेवता येते. या प्रकारच्या यारीचा उपयोग रेल्वे धक्क्यावरील माल वाघिणीत चढविणे यांसारख्या कामासाठी होतो. अशा यारीची वजनाची क्षमता २ ते २० टन कमाल त्रिज्या ४ ते ६ मी. असते.

आ. ३. भिंतीवरील जिब यारी : (१) खीळ, (२) बहाल, (३) खीळ, (४) ताण.

भिंतीवरील जिब यारी : (आ. ३). या प्रकारची यारी यंत्रशाळा, मालाची गुदामे अशा ठिकाणी वापरली जाते. यातील जिब म्हणजे जमिनीला समांतर असा एक बहाल असतो आणि त्याची भिंतीकडील आधाराची बाजू खिळीवर बसविलेली असते. जिबच्या टोकाला एक ताण असतो आणि त्याचीही भिंतीकडील बाजू खिळीवर बसविलेली असते. यामुळे जिब २७०° कोनातून फिरू शकतो. वजन उचलण्याचा दंडगोल (उच्चालक) जिबवर सरकणाऱ्या चाकावर बसविलेला असतो. उच्चालक जिबवर मागे-पुढे हलवून व जिबचा भिंतीशी होणारा कोन बदलून वजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मर्यादित जागेत हलविता येते.

 आ. ४. सेतू यारी : (१) दोर गुंडाळण्याचा दंडगोल (उच्चालक), (२) चाके असलेला सेतू, (३) रूळ, (४) लोखंडी तुळ्या, (५) उभे लोखंडी खांब.

वरील दोन रचनाच्या याऱ्यांत जिबच्या दुसऱ्या टोकाला जमिनीचा आधार नसतो. त्यामुळे आ. ३ मध्ये क अंतरावर जिब जेवढे जास्तीत जास्त वजन पेलू शकेल त्यापेक्षा ख अंतरावर कमी वजन पेलू शकेल म्हणून या प्रकारच्या यारीची क्षमता सांगताना वजन उचलण्याची कमीत कमी त्रिज्या व जास्तीत जास्त वजन आणि जास्तीत जस्त त्रिज्या व जास्तीत जास्त सुरक्षित वजन ही माहिती अवश्य द्यावी लागते.

सेतू यारी : मोठ्या यंत्रशाळेतील व तिला जोडून असलेल्या सामान ठेवण्याच्या मोकळ्या जागेतील जड भागांची हलवाहलव करण्यासाठी या पद्धतीची यारी मुख्यतः वापरली जाते. आ. ४ मध्ये दाखविलेली यारी हलक्या वजनासाठी (वजन २ ते २० टन रुंदी ७ ते १५ मी.) आहे.

यंत्रशाळेच्या लांबीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उभ्या खांबांवर आडव्या लोखंडी तुळ्या असतात आणि त्यांवर रूळ बसविलेले असतात. या यारीतील मुख्य वजन पेलणारा भाग म्हणजे सेतू. दोन लोखंडी बहाल जोडून केलेल्या सेतूला चाके असतात व त्यामुळे हा सेतू यंत्रशाळेच्या लांबीवर कोठेही हलविता येतो. सेतूवर रूळ असतात व त्यावर उच्चालक आडवा कोठेही सरकविता येतो. म्हणजे या प्रकारच्या यारीला तीन निरनिराळ्या गती लागतात आणि त्यांसाठी विद्युत्‌ चलित्रांचा वा मनुष्यबळाचा उपयोग केला जातो. उच्चालकाचे चलित्र दोराचा दंडगोल फिरवून वजन उचलते, दुसऱ्या चलित्राच्या साहाय्याने उच्चालक सेतूवर आडवा सरकतो, तिसरे चलित्र दंतचक्रांच्या साहाय्याने सेतूच्या रुळावरील चाकांना गती देते. ही चलित्रे सुरू करण्याची नियंत्रक बटणे यारीपासून लोंबणाऱ्या विजेच्या तारांच्या टोकांशी असतात आणि यंत्रशाळेच्या जमिनीवर उभा असलेला कामगार बटणांच्या साहाय्याने कोणतेही चलित्र सुरू वा बंद करून वजन उचलणे, आडव्या दिशेने हलविणे अथवा यंत्रशाळेच्या लांबीवर नेणे या सर्व क्रिया करू शकतो. ज्या यंत्रशाळेतअशा यारीचा उपयोग सतत उत्पादनासाठी लागत नाही, तेथे माणसाला या क्रिया साखळी ओढून करता येतात.

यापेक्षा जड वजन सतत हलविण्याची आवश्यकता असेल, तर यारीचा सेतू लोखंडी पत्रे, कोनी छेद अशा घटकांपासून वितळजोडकामाने बनविलेला असतो. याला पेटी-बहाल म्हणतात. यारीच्या हालचालीने नियंत्रण करण्यासाठी सेतूच्या खाली छोटी खोली असते आणि तेथे नियंत्रणाची सर्व यंत्रसामग्री बसविलेली असते. या खोलीत बसलेला नियंत्रक कामगार सर्वत्र पाहू शकतो आणि जरूरीप्रमाणे तीन चलित्रांचे नियंत्रण करून वजन उचलणे, आडवे वा लांब हलविणे, योग्य ठिकाणी ठेवणे या सर्व क्रिया करू शकतो. अशा यारीचा उपयोग धातूच्या ओतकामासारख्या सततच्या कामासाठी करावयाचा असल्यास चलित्रे व त्यांची नियंत्रण सामग्री मुद्दाम जास्त टिकाऊ बनविलेली असते.


 आ. ५. गँट्री यारी : (१) सरकणार उच्चालक, (२) उच्चालकाचा बहाल, (३) गँट्री, (४) चाके, (५) जमिनीवरील रूळ.गँट्री यारी : मोकळ्या जागेतील सामानाची हलवाहलव करण्यासाठी वापरण्यात येणारी ही यारी आ. ५ मध्ये दाखविली आहे. मोकळ्या जागेच्या लांबीच्या दोन्ही बाजूंवर जमिनीवर रूळ असतात आणि त्यांवर हलणारी चार चाके असलेली गँट्री (आधार चौकट) उभी असते. या गँट्रीच्या वरच्या बाजूला एक बहाल असतो व त्यावर चाकांनी सरकणारा उच्चालक असतो. या यारीच्या साहाय्याने सामानाची हलवाहलव करता येण्याखेरीज गँट्रीच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनावरही ते ठेवता येते.

बंदरातील याऱ्या : जहाजावरील माल चढविणे व उतरविणे हे बंदरातील मुख्य काम असते. यासाठी बंदरातील धक्क्यावर तसेच प्रत्येक जहाजावर याऱ्या असतात. बंदरातील धक्क्यावर नेहमी आढळणारी पोर्टल यारी :  आ. ६ मध्ये दाखविली आहे.

आ. ६. पोर्टल यारी : (१) जहाज, (२) बंदरावरील धक्का, (३) रूळ, (४) पोर्टल, (५) फिरणारा मंच, (६) मुख्य जिबा, (७) आउटर रिगर.

बंदरातील धक्क्याला लागून जहाज उभे असते, त्यामुळे यारी हवी तेथे नेता यावी यासाठी धक्क्यावर दोन रूळ असतात व त्यांवर चार लोखंडी पाय असलेले पोर्टल (आधार देणारी संरचना) उभे असते. या पोर्टलवर बसविलेला मंच दंतचक्रांच्या वेगवेगळ्या ३६०° कोनातून फिरू शकतो. मंचावर जिब, यंत्रसामग्री, नियंत्रणाची व्यवस्था व यारी चालविणारा नियंत्रक अशा सर्व गोष्टी असतात. मुख्य जिबच्या टोकाला असलेल्या लहान भागाचा (आउटर रिगरचा) कोनही वेगळ्या दोराच्या साहाय्याने बदलता येतो. मुख्य जिब व रिगर या दोहोंचे कोन बदलून यारीच्या कामाची कक्षा जहाजाच्या रुंदीपर्यंत पोहोचते. वजन हलविण्यासाठी प्रथम ते वजनाच्या दोराचा दंडगोल फिरवून उचलले जाते, जिब व रिगर याचे कोन बदलून समांतर हलविले जाते आणि यारीचा मंच फिरवून धक्क्याच्या बाजूस आणून उतरविले जाते. या याऱ्यांची उचलण्याची क्षमता १० टनांपर्यंत असते. कामाच्या जरूरीप्रमाणे याऱ्यांच्या तपशिलात बदल झाले, तरी मूलतः भाग सारखेच असतात. कोळशाची चढउतार करण्यासाठी यारीच्या वजन उचलण्याच्या दोराला उघडझाप होणारी मोठी बादली बसविलेली असते. पाण्यातील बांधकामासाठी अगर जड सामानाची चढउतार करण्यासाठी यारी एका तरंगत्या तराफ्यावर बसविलेली असते आणि तिची उचलण्याची क्षमता १५० टनांपर्यंत असते. ही यारी बंदरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाण्यातून नेता येते.

आ. ७. मनोरा यारी : (१) सरकणारे वजन, (२) जिब, (३) मनोरा.बांधकामाची मनोरा यारी : दहा-वीस मजली इमारतींचे बांधकाम करताना काँक्रीट व इतर माल सतत चढवावा लागतो. त्यासाठी आ. ७ मध्ये दाखविलेल्या मनोरा यारीचा उपयोग होतो. या यारीचा उंच मनोरा जेथे बांधकाम चालू असेल तेथे पक्का उभा केला जातो. मनोऱ्याच्या डोक्यावर फिरणारा जिब बसविलेला असतो व त्याचा लांब भाग बांधकामाच्या बाजूला असतो. या भागाच्या खालील रुळावर वजन उचलणारा उच्चालक सरकतो. जिबच्या लहान भागाच्या खालील बाजूस एक वजन असते आणि ते उचलल्या जाणाऱ्या वजनाचा तोल सांभाळला जावा व मनोरा एका बाजूला वाकू नये अशा तऱ्हेने सरकते. या याऱ्यांची उंची ३० मी. व वजनाची क्षमता ३० टनांपर्यंत असते. यापेक्षा जास्त उंच बांधकामासाठी मनोरा हा बांधकामाचाच एक भाग केला जातो.


आ. ८. साखळीपट्‌ट्यांच्या वाहनावरील यारी : साखळीपट्‌ट्याचा ट्रॅक्टर, (२) फिरता मंच, (३) जिब, (४) वजन उचलण्याचा दोर, (५) जिब वरखाली करण्याचा दोर, (६) फिरणारी यारीची यंत्रसामग्री.प्रवासी यारी : मोठी बांधकामे सुरू असताना जड नळ, यंत्रसामग्रीचे भाग इ. पक्क्या व कच्च्या रस्त्यावरून सतत हलवावे लागतात. अशा कामासाठी उपयोगात येणाऱ्या तीन प्रकारच्या याऱ्या आ. ८, ९ व १० मध्ये दाखविल्या आहेत. आ. ८ मधील यारी साखळीपट्‌ट्यांच्या वाहनावर असलेल्या फिरत्या मंचावर बसविली आहे. या मंचावर जिब, वजन उचलणाऱ्या दोरीचा दंडगोल, जिबचा कोन बदलणाऱ्या दोराचा दंडगोल, मंच गोल फिरविण्याची यंत्रणा आणि या सर्वांना गती देणारे डीझेल एंजिन या सर्वच गोष्टी असतात. साखळीपट्‌ट्यांचे वाहन वाटेल तेथे नेता येते आणि जिबच्या साहाय्याने वजन उचलून व फिरवून पाहिजे तेथे ठेवता येते. यारीने वजन हलवताना कोणत्या त्रिज्येवर किती जड वजन सुरक्षितपणे उचलले जाऊ शकते याची दक्षता नियंत्रण करणाऱ्या माणसाला सतत घ्यावी लागते. नाहीतर फार जड वजन लांब त्रिज्येवर लावल्यामुळे वाहन उलटण्याची शक्यता असते.

 आ. ९. रबरी टायरच्या चाकांवरील बाहनावर बसविलेली यारी : (१) सिलिंडर, (२) जिबचा कोन बदलणारे दट्टे, (३) जिब.रबरी टायरच्या चाकांवरील वाहनावर बसविलेली यारी आ. ९ मध्ये दाखविली आहे. यातील जिबचा जमिनीशी होणारा कोन बदलण्यासाठी दोन सिलिंडर-दट्‌ट्यांची यंत्रणा वापरली आहे. यासाठी दाबाखालील तेल पुरविले जाते. हे वाहन वाटेल तेथे जाऊ व वळू शकते. याचा जिब स्वतंत्रपणे फिरत नाही. रबरी टायरच्या चाकांवरील फिरत्या यारीची एक रचना आ. १० मध्ये दिली आहे. वजन उचलताना वाहनाचे दोन टेकू जमिनीवर आणले जातात. यामुळे यारीला वजन सुलभपणे पेलता येते. ही यारी जागेवरच वजन उचलून जिब फिरवून व कोन बदलून वजन दुसऱ्या ठिकाणी ठेवते. वजन उचलून ही यारी हलवाहलव करू शकत नाही.

 आ. १०. रबरी टायरच्या चाकांवरील फिरत्या यारीची एक रचना : (१) जमिनीवरील टेकू.प्रवासी यारीचा आणखी एक प्रकार म्हणजे रेल्वेच्या कामासाठी उघड्या वाघिणीवर बसविलेली यारी. ही यारी अपघात स्थळी रूळमार्गावरून नेता येते. हिचे सर्व चालन डीझेल एंजिनावर वीज निर्माण करून होते.

याऱ्यांच्या वरील प्रकारांखेरीज आणखी काही प्रकारच्या याऱ्यांचे वर्णन ‘मालवाहू यंत्रे व वाहक साधने’ या नोंदीत दिलेले आहे.

यारीची सुरक्षितता : अवजड वजन उचलणे हे यारीचे काम असते आणि हे करताना अपघात होऊ नये म्हणून काही दक्षता घ्यावी लागते. यारीचा यांत्रिक आराखडा करताना याचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो. यारीतील दोर व वजन अडकविण्याचा आकडा यांची सतत झीज होत असते. यारी चालविताना कामाच्या त्रिज्येप्रमाणे उचलावयाच्या वजनावर मर्यादा असते व ती अनवधानाने ओलांडण्याची शक्यता असते. यामुळे यारीच्या महत्त्वाच्या भागांवर येणारे ताण वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदक प्रयुक्तींनी मोजून ते वरच्या मर्यादेपर्यंत पोहोचण्याच्या आधी नियंत्रकाला सूचना देण्याची व्यवस्था आता यारीत केली जाते. यारीची ठराविक कालानंतर योग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेणे कायद्यानुसार आवश्यक असते.

संदर्भ : 1. Alexandrov, M. P. Trans, Sapunov, O. K. Materials Handling Equipment, Moscow, 1981.

    2. Baumeister, T. Ed., Standard Handbook for Mechanical Engineers, New York, 1967.

    3. Dickie, D. E. Crane Handbook.

 

रेगे, शं. ज. दीक्षित, चं. ग. कुलकर्णी, प्रि. खं.