यशोधर्मन् : (इ. स. सहावे शतक). प्राचीन भारतातील औलिकर वंशातील एक पराक्रमी श्रेष्ठ राजा. त्याच्याविषयीची माहिती मुख्यत्वे कोरीव लेखांवरून मिळते. यशोधर्मन् किंवा यशोधर्मा याला विष्णुवर्धन असेही दुसरे नाव होते. औलिकर वंशाचे राज्य उज्जयिनीच्या वायव्येस सु. १२४ किमी.वर असलेल्या प्राचीन दशपुर (सध्याचे मंदसोर) नगरासभोवारच्या प्रदेशावर दीर्घकाळ होते. कोरीव लेखांवरून त्यांची वंशावळ पुढीलप्रमाणे ज्ञात झाली आहे : जयवर्मन्–सिंहवर्मन्–नरवर्मन्–विश्ववर्मन्–बंधुवर्मन्. विश्ववर्मन्पर्यंतच्या राजांनी आपल्या लेखांत गुप्त सम्राटांचे स्वामित्व कबूल केलेले दिसत नाही. बंधुवर्म्याने मात्र प्रथम कुमारगुप्त यांचे आधिपत्य स्वीकारले. तथापि त्याच्या लेखातील कालनिर्देश (४९३) इतर मांडलिकांच्या लेखातल्याप्रमाणे गुप्त संवतात नसून मालव संवतात (म्हणजे विक्रम संवतात) आहे, हे उल्लेखनीय आहे.
या वंशातील आदित्यवर्धनाच्या गौरिनामक मांडलिकाचा मालव संवत् ५४७ चा एक लेख अलीकडे मंदसोर येथे सापडला आहे. त्यावरून इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरीस हूणांच्या आक्रमणामुळे गुप्त साम्राज्य खिळखिळे झाले, तेव्हा आदित्यवर्धनाने उज्जयिनीवर ताबा मिळवून तेथे आपली राजधानी केली आणि दशपुरास आपल्या मांडलिकास नेमले असे दिसते. त्यानंतर वराहमिहिराने अवंतीच्या महाराजाधिराज द्रव्यवर्धनाचा उल्लेख आपल्या बृहत्संहितेत केला आहे. त्यावरून आदित्यवर्धन मालव संवत् ५५६ च्या सुमारास राज्य करीत असावा. यानंतर यशोधर्मन्–विष्णुवर्धनाच्या मांडलिकाचा लेख मंदसोर येथे मालव संवत् ५८९ (सन ५३३) चा सापडला आहे. तेव्हा यशोधर्मन् उज्जयिनी येथे द्रव्यवर्धनाचा उत्तराधिकारी (बहुधा पुत्र) म्हणून राज्य करीत असावा.
यशोधर्म्याने दोन स्तंभ दशपुर येथे उभारले होते. त्यांवरील लेखांत म्हटले आहे की त्याचे राज्य गुप्त आणि हूण राजांच्या राज्यापेक्षा मोठे होते. ते उत्तरेस ब्रह्मपुत्रा नदीपासून कलिंग देशातील महेंद्र पर्वतापर्यंत आणि हिमालय पर्वतापासून पश्चिम सागरापर्यंत पसरले होते. विशेष उल्लेखनीय गोष्ट ही की ज्याने भगवान् शंकराखेरीज इतर कोणापुढेही मान वाकवली नव्हती, त्या हूण नृपती मिहिरकुलानेही त्याच्या पुढे नम्र होऊन आपल्या डोक्यावरील पुष्पहारांनी त्याच्या पायांची पूजा केली होती.
मिहिरकुल हा अत्यंत रागीट व क्रूर होता. कल्हणाने त्याला कृतान्ताची उपमा दिली आहे. तो शिवोपासक असल्याने त्याने कदाचित हिंदू धर्मीयांचा छळ केला नसेल. पण काही कारणाने त्याचा बौद्ध धर्मीयांवर रोष झाल्यामुळे त्याने आपल्या राज्यातील १,६०० स्तूप व विहार जमीनदोस्त केले आणि नऊ कोटी बौद्ध धर्मीयांना कंठस्नान घातले असे ह्यूएन्त्संग सांगतो.
अशा रानटी आणि क्रूर हूणाधिपती मिहिरकुलाचा पराभव यशोधर्म्याने दशपुराजवळ केलेला दिसतो. म्हणून त्याने तेथे आपले जयस्तंभ उभारले असावेत. ही घटना इसवी सन ५३० च्या सुमारास घडली असे दिसते.
यानंतर यशोधर्म्याचे राज्य उज्जयिनीस फार काळ टिकले नसावे कारण इसवी सन ५५० च्या सुमारास कलचुरी कृष्णराजाने तो प्रदेश काबीज केला. त्याची काही नाणी विदिशेस सापडली आहेत. तसेच त्याचा पुत्र शंकरगण याने उज्जयिनीहून दिलेला ताम्रपट प्रसिद्ध आहे.
संदर्भ : १. जोशी, मधुकर रामचंद्र, संपा. विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, नागपूर, १९७९.
२. मिराशी, वा. वि. संशोधनमुक्तावलि, सर ३ रा, नागपूर, १९६६.
मिराशी, वा. वि.