मेंडेलेव्ह, दमित्री इव्हानव्ह्यिच : (७ फेब्रुवारी १८३४–२ फेब्रुवारी १९०७). रशियन रसायनशास्त्रज्ञ. सर्व रासायनिक मूलद्रव्ये एकाच क्रमबद्ध प्रणालीचे परस्पर संबंधित घटक आहेत असे सिद्ध करून त्यांनी त्या काळी ज्ञात असलेली सर्व मूलद्रव्ये त्यांच्या अणुभारानुसार चढत्या क्रमाने मांडून त्यांची ⇨ आवर्त सारणी या नावाने ओळखण्यास येणारी कोष्टकरूप रचना तयार केली. या त्यांच्या कार्यामुळे ⇨ आंत्वान लव्हॉयझर आणि ⇨ जॉन डाल्टन या सुप्रसिद्ध रसायनिशास्त्रज्ञांच्या इतकेच मेंडेलेव्ह यांचे रसायनशास्त्राच्या इतिहासातील स्थान महत्त्वाचे ठरले आहे.
मेंडेलेव्ह यांचा जन्म सायबीरियातील टबॉल्स्क येथे झाला. मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग (आताचे लेनिनग्राड) येथील विद्यापीठांत प्रवेश मिळविण्याचे प्रयत्न विफल ठरल्यानंरत महत्प्रयासाने त्यांना १८५० मध्ये सेंट पीटर्झबर्ग येथील शिक्षणशास्त्र संस्थेत प्रवेश मिळाला. १८५५ मध्ये सुवर्ण पदक मिळवून ते शिक्षकी पेशासाठी पात्र झाले. क्रिमियामधील ओडेसा येथे त्यांची नेमणूक झाली व तेथे रसायनशास्त्राचा अभ्यास त्यांनी चालू ठेवला. १८५६ साली रसायनशास्त्राची उच्च पदवी मिळविण्यासाठी ते सेंट पीटर्झबर्गला परतले. १८५७ मध्ये तेथील विद्यापीठात त्यांची नेमणूक झाली. पुढे १८५९ साली सरकारने हायडलबर्ग विद्यापीठात अभ्यासाकरिता त्यांना पाठविले. तेथे अनेक प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञांशी त्यांचा परिचय झाला. १८६१ मध्ये ते सेंट पीटर्झबर्गला परतले परंतु विद्यापीठात स्थायी स्वरूपाचे पद न मिळाल्याने ते संपादन व वैज्ञानिक लेखनाकडे वळले. १८६४ साली ते टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये व पुढे तीन वर्षांनी विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १८९० मध्ये ते विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले व १८९१ मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येणाऱ्या रसायनांवर आयात कर बसविण्याची नवीन पद्धत विकसित करण्यासाठी त्यांची सरकारतर्फे नेमणूक झाली. १८९३ साली वजने व मापे विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली व मृत्यू पावेतो त्यांनी या पदावर काम केले.
विद्यापीठात शिकविण्यासाठी त्यांनी १८६८–७० या काळात प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री हे पाठ्यपुस्तक लिहिले व या पुस्तकाच्या पुढे अनेक आवृत्त्या निघाल्या व त्याची अनेक भाषांत रूपांतर झाली. या पुस्तकाचे लेखन करीत असतानाच त्यांनी मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी त्यांच्या गुणधर्मांतील परस्पर संबंधांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुभारांची आवर्ती फलने (पुनरावृत्ती दर्शविणारे परस्पर संबंध) असतात हा आवर्त नियम सिद्ध केला आणि त्यानुसार मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. या नव्या वर्गीकरण पद्धतीचा प्रथमतः व्यापक प्रमाणावर स्वीकार झाला नाही परंतु कालांतराने तिची सप्रमाणता प्रस्थापित झाली. या सारणीत काही मोकळ्या जागा होत्या पण त्या अद्याप अज्ञात असलेल्या मूलद्रव्यांनी भरल्या जातील, असे मेंडेलेव्ह यांनी भाकीत केले आणि पुढील २० वर्षांत त्यांपैकी तीन मूलद्रव्यांचा शोध लागला व त्यांचे गुणधर्म मेंडेलेव्ह यांच्या भाकिताप्रमाणे आढळले [→ आवर्त सारणी].
सैद्धांतिक कार्याबरोबरच मेंडेलेव्ह यांनी १८६५ मध्ये मॉस्कोजवळील एका शेतात खतासंबंधी प्रयोग करून व आपल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून पिकांची गुणवत्ता व उत्पादन यशस्वीपणे वाढवून दाखविले. १८६७ मध्ये पॅरिस येथील प्रदर्शनात रशियाचे दालन आयोजित करण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले. तेथे फ्रेंच रसायन उद्योगाचा अभ्यास करून नंतर त्यांनी रशियाच्या सोडा उद्योगात सुधारणा केल्या. पुढे रशियन खनिज तेल उद्योगाच्या समस्यासंबंधीही त्यांनी काम केले. १८७६ मध्ये त्यांनी अमेरिकेला जाऊन तेथील खनिज तेल उद्योगाचा अभ्यास केला व रशियन सरकारला देशातील खनिज तेल उद्योगाचा विकास करण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूचना केल्या.
लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना १८८२ मध्ये डेव्ही पदक व १९०५ मध्ये कॉप्ली पदक देऊन त्यांचा गौरव केला. राजकीय विचारांमुळे त्यांनारशियाच्या इंपीरियल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व मिळू शकले नाही. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ १०१ क्रमांकाच्या मानवनिर्मित मूलद्रव्याला मेंडेलेव्हियम असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे कार्य २५ खंडांत प्रसिद्ध झालेले आहे (१९३४–५२). ते सेंट पीटर्झबर्ग येथे मृत्यू पावले.
मिठारी, भू. चिं.
“