मुतझिला : एक इस्लामी धर्मपंथ. ‘मुतझिल’ ह्याचा अर्थ ‘फुटिरतावादी’ असा होतो. बसरा ही मुतझिलांची जन्म व कर्मभूमी होती. तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून आपल्या विचारांना व्यक्त करणारा मुतझिला हा इस्लाममधील आद्य पंथ आहे. या पंथाचे मूळ इस्लामी राजकारणात आहे. अली व त्यांचे विरोधक यांच्या झगड्यात जे तटस्थ (इतझिला) राहिले ते मुतझिला म्हणून ओळखले जाऊ लागले. या पंथाच्या लोकांना ‘मुतझिलिया’ म्हणण्याचे आणखी एक कारण असे दिले जाते. की ते सत्यापासून फुटून निघून दूर चालते झाले. परिणामी इस्लामी तत्त्वे व धर्मनिष्ठा यांचा ते त्याग करुन बसले.

मुतझिला पंथाचे संस्थापक वासिल बिन अता (सु. ६९९ – सु.७४९) आणि अमर बिन उबैद (मृ. ७६२) हे होत. ते इसन अल्-बसरी (६४२–७२८) यांच्या पंथापासून फुटून निघाले. ते मोमिन (श्रद्धावान) व मुसलमान (इस्लामचे अनुयायी) या दोघांपासूनही वेगळे झाले. महापापी माणूस हा काफिरही (अश्रद्ध) नसतो किंवा मोमिनही नसतो अशा तटस्थ भूमिकेमुळे त्यांना ‘मुतझिला’ (तटस्थवादी) ह्या नावाने संबोधण्यात येऊ लागले आणि तेव्हापासून ह्या पंथांचे हेच नाव रूढ झाले.

मुतझिलिया हे वासिल बिन अता व अमर बिन उबैदचे अनुयायी आहेत. एकदा हसन अल्-बसरी हे अमर बिन उबैदवर चिडले. कारण ते म्हणाले, की ‘मी स्वप्नात त्याला सूर्याला नमस्कार करताना पाहिले’.

या पंथाला कद्रिया असेही म्हणतात. कारण त्यांचा असा विश्वास आहे, की परमेश्वराच्या इच्छेने नियत झालेल्या प्रारब्धाशी (तकदीराशी) माणसांच्या पातकांचा काडीमात्रही संबंध नाही. म्हणजेच माणसांची पातके परमेश्वराने नियत केलेल्या प्रारब्धानुसार घडत नसून ती त्यांच्याच दुष्ट इच्छेनुसारच घडतात. कर्माचा संबंध व्यक्तीशी निगडीत असतो परमेश्वराच्या इच्छेचा त्यात काहीचा हस्तक्षेप नसतो. परमेश्वराच्या ठिकाणी असलेले दैवी गुण त्यांनी (मुतझिलांनी) नाकारल्यामुळे मुतझिला, जबहीरिया व कद्रिया हे सर्व पंथ या दृष्टीने सारखेच आहेत.

मुतझिलियांच्या सहा प्रमुख शाखा आहेत : (१) हुजलिया, (२) नजामिया, (३) मामरिया, (४) काबिया, (५) जुबाइया व बहुशमिया. ह्या सर्व शाखा परमेश्वराचे दैवी गुण नाकारणाऱ्या आहेत. त्यांचे प्रतिपादन असे आहे, की माणसांच्या कर्माचा निर्माता परमेश्वर नसून स्वतः माणूसच आहे. परमेश्वर आपल्या अनुयायांना निषिद्ध नसलेल्या मार्गानेच आवश्यक अशी जीवनशक्ती पोहोचवत असतो. परमेश्वराची एकता तसेच न्याय यांचे मुतझिला पुरस्कर्ते होत.

मुतझिला पंथाचे सिद्धांत असे : (१) जीवास कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे. (२) परमेश्वर फक्त चांगुलपणाचा निर्माता आहे. (३) परमेश्वर निर्गुण आहे. (४) परमेश्वराची सर्वशक्तिमानता सीमित आहे. (५) परमेश्वरी चमत्कार वा दैवी चमत्कार ही चुकीची संकल्पना आहे. (६) जगत् अनादी नसून आदियुक्त आहे. (७) परमेश्वराप्रमाणेच कुराणास अनादी समजण्यास कल्पनेस मुतझिलिया द्वैतवाद व मूर्तिपूजेइतकेच दुष्कर्म मानतात. बगदादचे मुतझिली मताचे अब्बासी खलिफा कुराणास अनादी मानण्याच्या सिद्धांतास ‘कुफ’ (अश्रद्ध) समजत व अशा व्यक्तींना शिक्षाही करत. अब्बासींचा या पंथास आश्रय होता. तात्पर्य मुतझिली यांचा भर ग्रंथोक्त धर्मापेक्षा निसर्गसिद्ध धर्मावर अधिक आहे. वासिल बिन अता, अमर बिन उबैद, अबु-अल्-हुदायल, अल्-नझ्झाम इ. ह्या पंथाचे प्रमुख विचारवंत होत.

आजम, मुहंमद