मुंटश्शेरि, जोसेफ : (१७ जुलै १९०३–? १९७७). आधुनिक मलयाळम्‌मधील अष्टपैलू लेखक व श्रेष्ठ समीक्षक. जन्म त्रिचूर जवळील कंटश्शांकटक या गावी. मद्रास विद्यापीठातून संस्कृत व मल्याळम् घेऊन एम. ए. झाल्यावर ते त्रिचूर येथील सेंट टॉमस महाविद्यालयात १९५२ पर्यंत भाषा विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख होते. संस्कृत व पाश्चिमात्य साहित्यशास्त्रांचा त्यांचा तुलनात्मक व सखोल व्यासंग होता आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या समीक्षग्रंथांत पडलेले दिसते. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या केरळच्या पहिल्या कम्युनिस्ट मंत्रिमंडळात ते शिक्षणंमंत्री म्हणून होते (१९५६–५९). त्रिचूर येथील सहकारी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. आयुष्याच्या अखेरीअखेरीस ते कोचीन विद्यापीठाचे कुलगुरूही होते (१९७१–७५). नवजीवन ह्या दैनिकाचे तसेच केरळम्, मंगोळदयम् इ. नियतकालिकांची संपादकपदेही त्यांनी भूषविली. केरळ साहित्य अकादमीचे तसेच कंद्रीय साहित्य अकादमीचे ते सदस्य होते. केरळ सरकारच्या योजना मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. (१९६८–७०). केरळमधील प्रगतिशील लेखक संघटनेचे अध्यक्ष तसेच केरळमधील सहकारी चळवळीचे एक सक्रिय संघटक म्हणूनही त्यांनी मह तहत्त्वाची कामगिरी बजावली. भारताचा तसेच चीन व यूरोपचा त्यांनी विपुल प्रवास करून ह्या प्रवासावर सुंदर प्रवासवर्णने लिहिली.

त्यांनी मलयाळम् साहित्यात कविता, कथा-कादंबरी, निबंध, बालवाङ्‌मय, साहित्यसमीक्षा, चरित्र-आत्मचरित्र, प्रवासवर्णन, अनुवाद ह्या प्रकारांत, तसेच शिक्षण, राजकारण, धर्म, समाजशास्त्र इ. विषयांवर विपुल लेखन करून मोलाची भर घातली. त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या चाळीसावर भरते. त्यांनी विविध साहित्यप्रकारांत लेखन केले असले, तरी एक मौलिक आणि साक्षेपी साहित्यसमीक्षक म्हणूनच त्यांची मलयाळम् साहित्यात ठळक व चिरंतन प्रतिमा आहे. त्यांचे विशेष उल्लेखनीय समीक्षाग्रंथ असे : काव्यपीठिक (१९४५), मानदंडम् (१९४६), मनुष्य कथानुगायिकळ (१९४९), रूपभद्रत (१९५१), राजराजन्ते माट्टोलि (१९६१), नाटकान्तम कवित्वम् (१९६२), पाश्चात्त्य साहित्य समीक्षा (१९६७), प्रभाषणावलि (१९६७) इत्यादी. मुंटश्शेरी हे स्वतंत्र प्रज्ञेचे आणि प्रगतिशील विचारांचे श्रेष्ठ समीक्षक होते. त्यांच्या समीक्षेस पाश्चात्त्य आणि भारतीय साहित्यशास्त्रांच्या सखोल व्यासंगाचा भक्कम आधार प्राप्त झाला. तकळी, केशवदेव, पोट्‌टेकट्ट, बशीर ह्या त्यांच्या काळीतील मलयाळम् कादंबरीकारांच्या कादंबऱ्या त्यांनी आपल्या समीक्षेने उचलून धरल्या व त्यामुळे ह्या कादंबरीकारांना उत्तेजन मिळून मलयाळम् गद्याच्या विकासास खूपच मदत झाली. एक वाङ्‌मयप्रकार म्हणून पद्यास यापुढे काहीही भवितव्य नाही आणि हा वाङ्‌मयप्रकार नष्ट होण्याच्याच वाटेवर आहे, असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते काव्यदेखील नाटकाच्याच तंत्राने लिहिले जावे म्हणजे त्यात नाटकाप्रमाणेच दृश्य रूप घेऊ शकेल असा भरपूर संघर्ष व नाट्यपूर्ण प्रसंगाचे चित्रण असावे. मुटश्शेरी यांनी केलेल्या काही कवींच्या समीक्षेत ते आपली मूळ भूमिका कायम ठेऊ शकले नाहीत. उदा., कुमारन आशान व वळ्‌ळत्तोळ यांच्यावरील त्यांच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या समीक्षेत त्यांची मूळ भूमिका पुन्हा एकवेळ बदलल्याचे दिसते. असे असले, तरी मल्याळममधील एक श्रेष्ठ समीक्षक म्हणून त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

सन्मानम् (१९४४) हा त्यांचा कथासंग्रह असून प्रोफेसर (१९४७) आणि कोंडयिल निन्नु कुरिशिलेक्कु (१९५३, म, शी. गुलाबवाटिका ते क्रूस) ह्या त्यांच्या कादंबऱ्या होत. त्यांच्या कादंबऱ्यांत वास्तवतेचे उत्कृष्ट दर्शन घडते. कोंडयिल …. ही त्यांची अस्तित्ववादी प्रकारची कॅथलिक ख्रिस्ती समाजावरील महत्त्वाची कादंबरी होय.

चिंता माधुरी (१९३७, काव्यसंग्रह) प्रबंधदीपिक (१९३६), प्रमाणम् (१९४७), केरळीकटाक्षम् हे निबंधग्रंथ मॅक्झिम गॉर्की (१९५२, चरित्र) चीन मुन्नोट्टु (१९५३, प्रवासवर्णन) कोळिंज इलकळ (२ खंडात, आत्मचरित्र) इ. त्यांचे इतर उल्लेखनीय ग्रंथ आहेत.

भास्करन्, टी. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)