भारतीय मानक संस्था : जनतेला व्यावहारात लागणाऱ्या नानाविध वस्तू आणि उत्पादकांना लागणारा विविध कच्चा माल यथायोग्य गुणवत्तेचा ठरावा म्हणून आणि उत्पादित पदार्थ वापरण्यास समाधानकारक व्हावेत या दृष्टीने त्यांमध्ये कोणते गुणधर्म आवश्यक आहेत व ते किती प्रमाणात असले पाहिजेत ते ठरविणारी आणि या गुणधर्माचे मूल्यमापन करण्याच्या कसोट्या निश्चित करणारी केंद्रशासित भारतीय संस्था.

ही संस्था १९४७ मध्ये उद्योगपती, वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि ग्राहक यांच्या पाठिंब्याने केंद्र सरकारने स्थापन केली व १९६२ मध्ये ‘इंडियन स्टँडर्डस इन्स्टिट्यूशन ॲक्ट’ या कायद्याने तिला कायदेशीर मान्यता प्राप्त झाली. केंद्रीय उद्योग मंत्री या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेमध्ये केंद्र व राज्य सरकारे, औद्योगिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक संस्था यांचे आणि संस्थेच्या विभागीय समित्यांचे व वर्गणीदारांचे प्रतिनिधी असतात. संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्ली येते आहे. याखेरीज संस्थेची विभागीय कार्यालये मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे असून शाखा कार्यालये अहमदाबाद, बंगलोर, भुवनेश्वर, चंढीगढ, हैदराबाद, कानपूर, पाटणा, त्रिवेंद्रम व जयपूर येथे आहेत. आरंभी संस्थेच्या खर्चाचा ९० टक्क्यांहून जास्त भार केंद्र शासन उचलीत असे परंतु अलीकडे संस्थेच्या सु. ४ कोटी रुपयांच्या वार्षिक अर्थसंकल्पाचा फक्त २० – ४० टक्के अंश शासकीय अनुदानाने व बाकीचा सर्व बोधचिन्हांच्या परवाना शुल्कातून आणि मानक विनिर्देश संहितांच्या विक्रीतून भागविला जातो. त्यामुळे ही संस्था स्वायत्त स्वरूपाची आहे. 

संस्थेमध्ये भारतीय परिस्थितीचा विचार करून व्यवहारोपयोगी वस्तूंमध्ये त्या यथायोग्य व्हाव्या म्हणून कोणते गुणधर्म असणे आवश्यक आहे व ते किती प्रमाणात असले पाहिजेत आणि त्यांचे मूल्यमापन कोणत्या कसोट्या वापरून करावे हे ठरविण्यासंबंधीचे कार्य चालते. त्यासाठी तज्ञ समित्या असून त्यांमध्ये त्या त्या विभागातील तज्ञ आणि उद्योगपती व ग्राहक यांचे प्रतिनिधी असतात. अशा दहा समित्या १९८२ मध्ये अस्तित्वात असून त्यांच्या कार्यक्षेत्रात कृषी व अन्न पदार्थ, रसायने, स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये लागणारे साहित्य, सामान्य उपभोग्य वस्तू व वैद्यकीय उपकरणे, विद्युत् तांत्रिक सामग्री, इलेक्ट्रॉनीय व दूरसंदेशवाहन सामग्री, सागरी व अन्य प्रकारची मालाची वाहतूक व मालाची आवेष्टने, यांत्रिक अभियांत्रिकीय सामग्री, संरचनात्मक सामग्री व धातू, वस्त्रे, खनिज तेलजन्य पदार्थ आणि तत्संबंधित उत्पादने इत्यादींचा समावेश आहे.

वस्तूंचे शासकीय परीक्षण करण्यासाठी संस्थेची मुख्य प्रयोगशाळा दिल्ली येथे असून ती आधुनिक परीक्षण सामग्री आणि संदर्भ ग्रंथ यांनी सुसज्ज आहे (येथील ग्रंथालयात १९८१ मध्ये ९०,७०० मानक व तांत्रिक प्रकाशने आणि ६०० नियतकालिके होती). मुंबई, मद्रास व कलकत्ता येथील प्रादेशिक कार्यालयांतही लहान प्रयोगशाळा आहेत. संस्थेने आतापर्यंत १०,००० पेक्षा जास्त मानक विनिर्देश (आवश्यक प्रमाणभूत गुणधर्म) सिद्ध केले असून नवीन सिद्ध करण्याचे व जुन्यामध्ये सुधारणा करण्याचे कार्य सतत चालू असते. या सर्व मानक विनिर्देशांची विषयावर सूची दर वर्षी प्रसिद्ध करण्यात येते. १९८०-८१ मध्ये संस्थेने ४४८ नवे विनिर्देश तयार केले व ३५२ विनिर्देशांत सुधारणा केल्या. मानकांचे विनिर्देश आणि त्यांच्या विषयावर सूची प्रसिद्ध केल्या जातात. संस्थेन हँडबुक ऑफ फूड ॲनॅलिसिस या निदेशग्रंथाच्या संकल्पित १५ भागांपैकी पहिला भाग आणि डिझाइन अँड एड्स फॉर रिइन्फोर्सड काँक्रीट टू आय् एस् ४५६-१९७८ हे निदेशग्रंथ १९८०-८१ मध्ये प्रसिद्ध केले.

मानकातील कसोट्यांना उतरेल अशा गुणवत्तेचा माल तयार करणाऱ्या उत्पादकास त्याच्या मालावर ISI  हे बोधचिन्ह लावण्याचा सशुल्क परवाना संस्था देते. परवाना देण्यापूर्वी संस्थेचे तंत्रज्ञ अर्जदार कारखान्याला भेट देऊन तेथील साधनसामग्री प्रमाणित दर्जाचा माल तयार करण्यास योग्य आहे आणि उत्पादनात प्रमाणित प्रक्रिया वापरल्या जातात याची खात्री करून घेतात. त्यानंतर परवाना दिल्यावरही संस्थेचे तज्ञ कारखान्यास आकस्मिक भेटी देऊन उत्पादनावर देखरेख ठेवतात. त्याचबरोबर परवानाधारकाने विक्रीस ठेवलेली वस्तू परस्पर खरेदी करून संस्था अधूनमधून तिची नमुनाचाचणी करते. खरेदी केलेली बोदचिन्हांकित वस्तू सदोष आहे अशी ग्राहकाची तक्रार आल्यास संस्था तिची तपासणी करते आणि दोष आढळल्यास कारखानदारास त्या ग्राहकाला निर्दोष वस्तू आणखी मूल्य न घेता पुरवावयास लावते.

या तरतुदीमुळे दर्जेदार मालाचे उत्पादन करण्याची जबाबदारी परवानाधारक कारखान्यावर पडते. बोधचिन्हांकित वस्तू ठराविक गुणवत्तेची असणारच अशी ग्राहकाची खात्री पटण्याबरोबर उत्पादकाचा नाव लौकिक वाढून खप जास्त होण्यास मदतही होते. १९८२ मध्ये अशा परवानाधारकांची संख्या सु. १०,००० होती बोधचिन्हांकित वस्तूंमध्ये पशुखाद्ये, दूध भुकटी, कॉफी, गोंद, शाई, रंग, साबण, वस्तऱ्याची पाती, ब्रश, रबरी वस्तू, काचेच्या वस्तू, लोखंडी वस्तू, वितळजोड कामाची (वेल्डिंगची) साधने, तागाच्या पिशव्या, विजेचे दिवे, विविध घरगुती उपकरणे, अन्न शिजविण्याची दाबपात्रे (प्रेशर कुकर), मिश्रक, द्रवीकृत खनिज तेल वायू (एल. पी. गॅस) सिलिंडर, खाणीत वापरण्याची पादत्राणे इ. नानाविध वस्तूंचा समावेश आहे. 


वस्तू बोधचिन्हांकित असल्याने ग्राहकांची सोय होते इतकेच नव्हे, तर कित्येक संभाव्य अपघातही टळतात. उदा., घरगुती विद्युत् उपकरणांमद्ये जोडणी सदोष असेल, तर विजेचा धक्का बसण्याचा संभव असतो. म्हणून १९७६ पासून विजेच्या घरगुती उपकरणांना बोधचिन्हांकन सक्तीचे करण्यात आले आहे. द्रवीकृत खनिज तेल वायू भरलेल्या सिलिंडरांच्या बाबतीत सुद्धा असेच बंधन आहे. संस्थेचे बोदचिन्ह धारण करणाऱ्या वस्तूंची निर्यात करताना भारत सरकार त्याची पूर्वतपासणी करीत नाही कारण त्याची आश्यकताच नसते.

भारतातील कारखान्यात संघटित रीत्या निर्मितिस्थळीच मानके विकसित व प्रस्थापित करण्यासाठी संस्थेतर्फे प्रशिक्षण व सर्वेक्षण कार्यक्रम, विचारविनीमय आणि कारखान्यांना प्रत्यक्ष भेटी यांद्वारे मदत करण्यात येते. कंपनीच्या अथाव कारखान्याच्या पातळीपर्यंत मानकीकरणाचा प्रसार करण्यासाठी संस्था विस्तारसेवाही देऊ करते. संस्थेच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमान्वये आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका येथील विकसनशील देशांतील मानक अभियंत्यांना मानकीकरणाची तत्त्वे, प्रक्रिया, कार्यपद्धती व संघटन यांसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येते. तांत्रिक शिक्षणात मानकीकरण हा विषय अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने तांत्रिक शिक्षकांना संस्थेच्या कार्याची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. बोधचिन्ह परवानाधारक कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना उत्पादित वस्तूंचे परीक्षण व सांख्यिकीय गुणवत्ता नियंत्रण [⟶ गुणवत्ता नियंत्रण] यांसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येते. भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध घटकांत मानकीकरणाची योग्य जाणीव निर्माण करण्यासाठी भारतातील निरनिराळ्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिवर्षी अधिवेशने भरविण्यात येतात. निरनिराळ्या उद्योगांत मानकीकरण आणि गुणवत्ता नियंत्रण यांच्या बाबतीत उद्‌भवणाऱ्या प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यासाठी उद्योगांनुसार विशिष्ट विषयावरील परिषदा व चर्चासत्रे अयोजित करण्यात येतात. मानकीकरणाचे महत्त्व पटविण्यासाठी संस्थेतर्फे मानकदूत हे हिंदी भाषेतील त्रैमासिक १९८१ पासून प्रसिद्ध करण्यात येत आहे. नवनवीन भारतीय आणि परदेशी मानकांसंबंधी वर्गीकरण केलेली माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘माहितीपेढी’ची स्थापना करण्यात आलेली असून या माहितीचा प्रसार करण्यासाठी स्टँडर्डस वर्ल्ड ओव्हर-मंथली ॲडिशन्स हे मासिक माहितीपत्रक प्रसिद्ध केले जाते. तसेच करंट पब्लिश्ड इन्फर्मेशन ऑन स्टँडर्डायझेशन हे नियतकालिक प्रसिद्ध केले जाते. यांखेरीज मानकीकरणाच्या प्रसारासाठी वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या माध्यमांचाही उपयोग केला जातो. 

ही संस्था आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची सभासद असल्याने संस्थेच्या प्रमाणपत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मान्यता मिळते. आतापर्यंत आशिया, आफ्रिकी व लॅटिन अमेरिका यांतील २५ विकसनशील देशांनी या संस्थेची मानके स्वीकारली असून अनेक देशांकडून त्यासंबंधात विचारणा केली जात आहे. मानके सिद्ध करण्याच्या कामात संस्थेने बांगला देश, इराण, इराक, इंडोनेशिया, जॉर्डन, मलेशिया, फिलिपीन्स, सिरिया, थायलंड, व्हिएटनाम, घाना, इथिओपिया, मॉरिशस, सायप्रस इ. देशांना मार्गदर्शन केले आहे.

केळकर, गो. रा. देशमुख, य. वि.