ब्लीकर, स्टीअन स्टीअन्सन : (११ ऑक्टोबर १७८२ – २६ मार्च १८४८). डॅनिश कथाकार आणि कवी. जटलंडमधील व्हीअम येथे जन्मला. कोपनहेगन विद्यापीठातून ईश्वरशास्त्राची पदवी त्याने घेतली आणि तो धर्मोपदेशक (कंट्री पार्सन) झाला. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि विस्कटलेले वैवाहिक जीवन ह्यांमुळे ब्लीकर सतत दुःखी असे. नेहमी भ्रमंती करणे, ग्रामीण भागांतील विविध लोकांशी गप्पागोष्टी करणे आणि मद्यपान ह्यांतून त्याने विरंगुळा शोधला. जटलंडच्या बोलभाषेवर त्याचे उत्तम प्रभुत्व होते आणि तेथील जीवनाचे सूक्ष्म निरीक्षणही त्याने केले होते. त्याच्या कथांतून ह्याचा प्रत्यय येतो. आपल्या कथालेखनासाठी डेन्मार्कच्या पारंपारिक कथासंचिताचाही त्याने उपयोग करून घेतला. ब्लीकरच्या प्रतिभास्पर्शाने ह्या कथांना नवे, काव्यात्म रूप प्राप्त झाले. ‘द जर्नल ऑफ ए व्हिलेज पारिश क्लार्क’, ‘द निटिंग ईव्हनिंग’, आणि ‘द पेड्लर’ (सर्व इं. शी.) ह्या त्याचा काही निर्देशनीय कथा होत. उत्तम निवेदनशैली आणि प्रभावी व्यक्तिरेखन ह्यांचा प्रत्यय त्यांतून येतो. त्याच्या काही कथांत त्याने अस्सल डॅनिश विनोदही फुलविला आहे. डॅनिश भाषेतील प्रादेशिक कथेचा ब्लीकर हा जनक मानला जातो.
‘बर्ड्स ऑफ पॅसेज’(१८३८, इं. शा.) हा त्याचा काव्यसंग्रह उल्लेखनीय आहे. खोल औदासिन्याची छाया त्यातील कवितांवर दिसून येते. ब्लीकरचे साहित्य ३३ खंडांत संकलित करण्यात आले आहे (१९२०—३४). त्याच्या काही कथांचा इंग्रजी अनुवादही झालेला आहे (ट्वेल्व्ह स्टोरीज बाय ब्लीकर, १९४५). जटलंडमधील स्पेंट्रस येथे तो निधन पावला.
यानसेन, विलेस्कॉव्ह एफ्. जे (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)