ब्लॅकेट, पॅट्रिक मेनार्ड स्ट्यूअर्ड : (१८ नोव्हेंबर १८९७ – १३ जुलै १९७४). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. मूलकणांचे अस्तित्व ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सी. टी. आर्. विल्सन यांच्या बाष्पकोठी पद्धतीचा [⟶ कण अभिज्ञातक] विकास करून तिच्या साहाय्याने अणुकेंद्रीय भौतिकी व विश्व प्रारण (बाह्य अवकाशातून येणारी अतिशय भेदक तरंगरूपी ऊर्जा) यांच्यासंबंधी लावलेले शोध या कार्याबद्दल ब्लॅकेट यांना १९४८ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
ब्लॅकेट यांचा जन्म लंडन येथे झाला. ऑझ्बर्न व डार्टमथ येथील नाविक महाविद्यालयांत त्यांनी शिक्षण घेतले आणि पहिल्या महायुद्धात फॉकलंड बेटे व जटलंड येथील नाविक युद्धात भाग घेतला. महायुद्धानंतर १९१९ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या मॅग्डालीन कॉलेजात प्रवेश केला आणि १९२१ मध्ये बी. ए. व १९२४ मध्ये एम्. ए. या पदव्या संपादन केल्या. किंग्ज कॉलेजाचे अधिछात्र म्हणून त्यांनी केंब्रिज येथील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत लॉर्ड रदरफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली १९३३ पर्यंत संशोधन केले. लंडन विद्यापीठाच्या बर्बेक कॉलेजात भौतिकीचे प्राध्यापक म्हणून १९३३ मध्ये त्यांची नेमणूक झाली. १९३७ – ५३ या काळात ते मँचेस्टर विद्यापीठात भौतिकीचे लँगवर्दी प्राध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धकाळात ते ब्रिटिश नौदलाच्या रडार आणि पाणबुडीरोधन यांविषयींच्या ⇨ संक्रियात्मक अन्वेषणाचे संचालक होते. १९५३ मध्ये ते लंडन येथील इंपिरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. या पदावरून १९६३ मध्ये सेवानिवृत्त झाले तथापि त्यानंतरही भौतिकीचे प्राध्यापक म्हणून तेथे त्यांनी काम केले.
केंब्रिज येथे लॉर्ड रदरफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली १९२१ मध्ये बाष्पकोठीसंबंधीच्या संशोधनास त्यांनी प्रारंभ केला आणि १९२४ मध्ये बाष्पकोठी तंत्रात सुधारणा करून नायट्रोजनाचे O17 या ऑक्सिजनाच्या समस्थानिकात (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारात) होणारे रूपांतरण दर्शविणारे पहिले छायाचित्र मिळविले. या त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे एका प्रारूपिक (नमुनेदार) अणुकेंद्रीय रूपांतरण प्रक्रियेचे पहिले छायाचित्रीय निदर्शन व तपशीलवार ज्ञान उपलब्ध झाले. १९२४-२५ मध्ये त्यांनी जेम्स फ्रांक यांच्याबरोबर जर्मनीतील गटिंगेन येथे संशोधन केले व नंतर पुढील संशोधनासाठी ते केंब्रिज येथे परतले. जी. पी. एस्. ओखिॲलिनी या इटालियन शास्त्रज्ञाबरोबर ब्लॅकेट यांनी १९३२ मध्ये विश्वकिरणांचे छायाचित्रण आपोआप होईल अशा प्रकारची प्रतिनियंत्रित बाष्पकोठी मोठ्या कल्पकतेने तयार केली. या कोठीत उभ्या विल्सन कोठीच्या वरच्या व खालच्या बाजूंस ठेवलेल्या दोन्ही गायगर-म्यूलर गणित्रांतून [→ कण अभिज्ञातक] एखादा विद्युत् भारित कण गेल्यामुळे एकाच वेळी स्पंद निर्माण झालाच तर कोठी कार्यान्वित व्हावी अशी योजना केलेली होती. १९३३ मध्ये ब्लॅकेट व ओखिॲलिनी यांनी सी. डी. अँडरसन यांच्या धन विद्युत् भारित इलेक्ट्रॉनाच्या (पॉझिट्रॉनाच्या) शोधाला प्रायोगिक निर्णायक पुष्टी देण्याबरोबरच विश्वकिरणांमुळे निर्माण होणार्या व संख्येने जवळजवळ सारख्याच असलेल्या घन व ऋण विद्युत् भारित इलेक्ट्रॉनांच्या ‘वर्षावां’ चे अस्तित्व दाखवून दिले. या वर्षावांचे अस्तित्व आणि पॉझिट्रॉन पृथ्वीवरील सामान्य द्रव्याचे घटक म्हणून आढळत नाहीत. यावरून त्यांनी गॅमा किरणांचे (अतिशय लघू तरंगलांबीच्या क्ष किरणांचे) रूपांतरण दोन द्रव्यरूप कणांत (पॉझिट्रॉन व इलेक्ट्रॉन यांत) व काही अंशी गतिज ऊर्जेत होते, ही संकल्पना मांडली (हा आविष्कार ‘युग्म निर्मिती’ या नावाने ओळखला जातो). यावरून उच्च ऊर्जायुक्त विश्वकिरणांमुळे ही प्रक्रिया आरंभित होते, असा निष्कर्ष त्यांनी काढला. द्रव्यमानरहित गॅमा किरणांपासून होणारी ही युग्म निर्मिती आइन्स्टाइन यांच्या द्रव्यमान ऊर्जा रूपांतरण संबंधाशी जुळणारी अशी असल्याचेही आढळून आले. याउलट होणाऱ्या प्रक्रियेचाही म्हणजे पॉझइट्रॉन व इलेक्ट्रॉन यांच्या परस्पर आघातामुळे त्यांचे रूपांतर गॅमा प्रारणात (नष्टीकरण प्रारणात) होण्याच्या प्रक्रियेचाही पडताळा प्रायोगिक रीत्या पाहण्यात आला. या प्रयोगांचे अर्थबोधन मांडण्यासाठी ब्लॅकेट व ओखिॲलिनी यांना पी. ए. एम्. डिरॅक यांच्या इलेक्ट्रॉन सिद्धांतांची [→ पुंज सिद्धांत] मदत झाली. पुढे ओखिॲलिनी व जेम्स चॅडविक यांच्याबरोबर संशोधन करीत असताना ब्लॅकेट यांना असेही आढळून आले की, उच्च ऊर्जायुक्त गॅमा किरण जड अणूंनी शोषले गेल्यास इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन जोडी निर्माण होते. लंडन येथील बर्बेक कॉलेजात, पुढे मँचेस्टर विद्यापीठात व दुसऱ्या महायुद्धानंतरही ब्लॅकेट यांनी विश्वकिरणांसंबंधीचे संशोधन चालू ठेवून अनेक संशोधकांना मार्गदर्शन केले. या संशोधनात त्यांची प्रतिनियंत्रित बाष्पकोठी अतिशय उपुयक्त ठरली. मँचेस्टर विद्यापीठातील त्यांच्या कार्यामुळे जॉड्रेल बँक येथील रेडिओ ज्योतिषशास्त्रीय प्रायोगिक केंद्राची स्थापना होण्यास चालना मिळाली.
ब्लॅकेट यांनी १९४८ नंतर खडकांच्या चुंबकत्वासंबंधी प्रदीर्घ संशोधन केले. या संशोधनाचा हेतू पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या, तसेच भूखंडाच्या परस्पर सापेक्ष व भौगोलिक ध्रुवांच्या सापेक्ष असणाऱ्या गतीच्या इतिहासाचा भूवैज्ञानिक कालाच्या प्रारंभापासून मागोवा घेणे, हा होता [→ खंड विप्लव पुराचुंबकत्व]. या विषयावरील त्यांचा लेक्चर्स ऑन रॉक मॅग्नेटिझम (१९५६) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे रॉयल पदक (१९४०) व कॉप्ली पदक (१९५६), तसेच दुसऱ्या महायुद्धातील कामगिरीबद्दल अमेरिकेचे मेरिट पदक (१९४६) हे बहुमान मिळाले. दिल्ली विद्यापीठाने त्यांना १९४७ मध्ये डी. एससी. पदवी सन्मानपूर्वक दिली. रॉयल सोसायटीचे १९६५ – ७० या काळात ते अध्यक्ष होते. ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स (१९५७ – ५८) व ॲसोसिएशन ऑफ सायंटिफिक वर्कर्स या संस्थांचेही ते अध्यक्ष होते. बंगलोरच्या इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सचे ते सन्माननीय सदस्य होते. ब्रिटिश अणुऊर्जा सल्लागार मंडळाचे, तसेच विज्ञान व संरक्षण यांसंबंधीच्या अनेक समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. १९६९ मध्ये त्यांना ब्रिटिश पार्लमेंटच्या लॉडर्स गृहाचे आजन्म सदस्य (पिअर) करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धातील संक्रियात्मक अन्वेषणासंबंधी त्यांनी केलेले कार्य मूलभूत ठरले. या विषयावर त्यांनी लिहिलेला द मेथडॉलॉजी ऑफ ऑपरेशन रिसर्च (१९४६) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. याखेरीज ब्लॅकेट यांनी अणुऊर्जेच्या राजकीय महत्वासंबंधीचा आपला दृष्टिकोन व लष्करी दृष्ट्या केलेला अभ्यास मिलिटरी अँड पोलिटिकल कॉन्सिकेन्सेस ऑफ ॲटॉमिक एनर्जी (१९४८), ॲटॉमिक वेपन्स अँड ईस्ट वेस्ट रिलेशन्स (१९५६) आणि स्टडीज ऑफ वॉर (१९६२) या ग्रंथाद्वारे मांडला. ते लंडन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.