ब्रेल लिपि: अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी. ह्या लिपीचा जनक ल्वी ब्रेल हा फ्रेंच अंधशिक्षक होय. या लिपीद्वारे अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठावटिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकते. अठराव्या शतकात व्हॅलेंटाइन हॉई ह्या फ्रेंच अंधशिक्षकास उठावदार लिपीतील अक्षरे अंधांना वाचता येतील, ही गोष्ट आढळून आली.
चार्ल्स बार्बिआ या फ्रेंच सैनिकी अधिकाऱ्याने उठावदार टिंबे आणि रेघा यांच्या आधारे रणांगणावरील रात्रीच्या संदेश वहनासाठी एक लेखन पद्धती तयार केली होती. ल्वी ब्रेल याला त्याने या पद्धतीच्या आधारे अंधांना वाचन करता येईल, अशी एक लिपी किंवा लेखनपद्धती (सोनोग्राफी) स्पष्ट करून सांगितली. तिचेच परिष्करण करून ब्रेलने अंधांसाठी स्वतंत्र लिपी तयार केली (१८२४). रॉबर्ट मून यांनी तयार केलेल्या लिपीत उठावदार ओळी वापरतात. नीलकंठराव छत्रपती यांनी देवनागरी लिपीवर आधारित ब्रेल पद्धत तयार करण्याचे कार्य केले. या लिपीत सहा उठावटिंबांचा एक सट (सेट) वापरला जातो. त्यात तीन बिंदू असलेल्या उभ्या दोन रांगांमध्ये सहा बिंदूंची रचना केली जाते. प्रत्येक बिंदूचे स्थान पुढीलप्रमाणे सूचित केले जाते. पुढील पानावरील तक्त्यात ‘इ’ व ‘९’ यांची चिन्हे चुकून २, ५ अशी दाखवली आहेत. ती २, ४ अशी समजावीत.
१ • • ४
२ • • ५
३ • • ६
याप्रमाणे डाव्या व उजव्या बाजूंच्या ओळींतील बिंदूंचा अनुक्रम १, २ व ३ तसेच ४, ५ व ६ यांचा बिंदुक्रमांक म्हणून निर्देश केला जातो. या बिंदूंच्या स्थानसापेक्ष उपयोगातून किंवा त्यांच्या रिक्त स्थानानुसार ६३ संकेतचिन्हे तयार होतात. बोटांच्या पहिल्या पेराने एका सटात कोणत्या ओळीत किती बिंदू आहेत व कोणते स्थान रिक्त आहे, हे जाणून वाचन केले जाते.
यूनेस्कोने १९४८ साली जागतिक ब्रेल संकेतांचा समन्वय केला. या संदर्भात भारताने पुढाकार घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली. भारतातील १४ प्रमुख भाषांसाठी एक समन्वित ब्रेल पद्धती तयार करण्यात आली आहे. रोमन ब्रेल लिपीवरून भारतीय ब्रेल लिपी बनविण्याचे श्रेय अंधकल्याण संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते एक संस्थापक अल्पाईवाला यांना देणे आवश्यक आहे. ही लिपी अंधकल्याण संघातर्फे मुंबई येथे प्रसिद्ध करण्यात आली. या लिपीत अक्षरलेखन, अंकलेखन यांबरोबरच गणित, विविध प्रकारची विज्ञाने यांतील वेगवेगळ्या प्रकारची चिन्हेही दर्शविता येतात. ब्रेल लेखनासाठी विशिष्ट प्रकारची पाटी, टोचा (स्टायलस) आणि कागद इ. साधने वापरली जातात. टंकलेखन यंत्रासारखी यंत्रेही ब्रेल-टंकलेखनासाठी उपलब्ध आहेत.
अलीकडे विकसित झालेल्या टंकलेखन यंत्रासारख्या ब्रेल यंत्रांच्या साहाय्याने ब्रेल लिपीत लेखन केले जाते. १९६१ मध्ये अंधांच्या एका अमेरिकन मुद्रणप्रकाशन संस्थेने वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडिया हा विश्वकोश ब्रेल लिपीत आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचे १४५ खंड असून वजन सु. ३२० किग्रॅ. व उंची ११३ मी. आहे.
दातरंगे, सुभाष भिडे, मा. य. मिसार, म. व्यं.
“