ब्रॅग, सर विल्यम हेन्री: (२ जुलै १८६२ – १२ मार्च १९४२). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. स्फटिकांच्या आंतरिक संरचनेचे (स्फटिकांतील अणूंच्या मांडणीचे) क्ष किरणांच्या (राँटगेन किरणांच्या) साहाय्याने विश्लेषण करण्याची पद्धत ⇨ सर (विल्यम) लॉरेन्स ब्रॅग या त्यांच्या मुलाबरोबर विकसित करण्याबद्दल ब्रॅग पितापुत्रांना १९१५ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

ब्रॅग यांचा जन्म वेस्टवर्ड (कंबर्लंड, इंग्लंड) येथे झाला. सुरुवातील ऑइल ऑफ मॅन येथील किंग विल्यम्स कॉलेजात शिक्षण घेतल्यावर त्यांना केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती मिळून १८८५ साली ते गणिताची ट्रायपॉस परीक्षा उत्तीर्ण झाले. काही काळ कॅव्हेंडिश लॅबोरेटरीमध्ये भौतिकीचा अभ्यास केल्यानंतर १८८५ च्या अखेरीस दक्षिण ऑस्ट्रेलियातील ॲडिलेड विद्यापीठात गणित व भौतिकी या विषयांच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. १९०९ मध्ये इंग्लंडला परतल्यावर त्यांनी लीड्स येथे भौतिकीचे कव्हेंडिश प्राध्यापक (१९०९-१५), लंडन येथे युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये कवेन प्राध्यापक (१९१५-२३) आणि १९२३ पासून मृत्यूपावेतो रॉयल इन्सिट्यूशनमधील रसायनशास्त्राचे फुलेरीयन प्राध्यापक व इन्स्टिट्यूशनचे संचालक म्हणून काम केले. पहिल्या महायुद्धात पाणबुड्यांचे स्थान निर्धारित करण्यासाठी पाण्यातील ध्वनीचे मापन आणि अभिज्ञान (अस्तित्व ओळखणे) करण्यासंबंधीच्या संशोधनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले.

ॲडिलेड विद्यापीठात असताना १९०४ मध्ये त्यांनी आर्. डी. क्लिमन यांच्या सहकार्याने द्रव्यातून जाणाऱ्या आल्फा किरणांच्या [→ किरणोत्सर्ग] मार्गासंबंधीचे नियम प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांनी बीटा व गॅमा किरणांसंबंधीही संशोधन केले. १९१२ साली जर्मन भौतिकीविज्ञ माक्स फोन लौए यांनी स्फटिकांतून जाताना क्ष किरणांच्या होणाऱ्या विवर्तन क्रियेची [क्ष किरण विखुरले जाणे व त्यांच्या तीव्रतेत बदल होणे या क्रियेची→ क्ष किरण] छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. लॉरेन्स ब्रॅग यांनी या छायाचित्रांतील विवर्तित बिंदूंचे वितरण स्फटिकांतील अणूंच्या मांडणीनुसार होते व त्यावरून स्फटिकांतील अणूंची मांडणी निर्धारित करता येईल, असे प्रतिपादन केले. या कल्पनेवरून त्यांनी काही स्फटिकांचे विश्लेषण करून स्फटिकांतील आणवीय प्रतलांपासून आरशा प्रमाणे क्ष किरणांचे परावर्तन होते, असे दाखविले. विल्यम ब्रॅग यांनी लीड्स विद्यापीठात काम करीत असताना या शोधाच्या आधारे क्ष किरण वर्णपटमापक (किंवा विवर्तनमापक) या उपकरणाची रचना करून त्याच्या साहाय्याने अनेक मूलद्रव्यांचे क्ष किरण वर्णपट मिळविले. प्रथमतः त्यांना मुख्यत्वे क्षकिरणांविषयीच्या अभ्यासातच गोडी होती तथापि लवकरच क्ष किरण वर्णपटमापक हे स्फटिकांच्या विश्लेषणाचे एक अतिशय प्रभावी साधन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या मुलाबरोबर अनेक स्फटिकीय पदार्थांचे या उपकरणाच्या साहाय्याने विश्लेषण करून क्ष किरण स्फटिकविज्ञान या नवीन विज्ञान शाखेचा पाया घातला [→ स्फटिकविज्ञान]. पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये क्ष किरण स्फटिक विज्ञानाचे एक संशोधन केंद्र स्थापन केले. १९२३ मध्ये ब्रॅग रॉयल इन्स्टिट्यूशनचे प्रमुख झाल्यावर हे संशोधन केंद्र तेथील डेव्ही फॅराडे रिसर्च लॅबोरेटरीत पुनःस्थापित करण्यात आले.

लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९०७ मध्ये त्यांची निवड झाली व ते सोसायटीचे १९३५-४० या काळात अध्यक्ष होते. अनेक प्रमुख परदेशी वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य होते. त्यांना सोळा विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिलेल्या होत्या. त्यांना रॉयल सोसायटीने रम्फर्ड पदकाचा (१९१६) व कॉप्ली पदकाचा (१९३०) सन्मान दिला. ब्रिटिश सरकारने त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना सी. बी. ई. (१९१७), नाइट (१९२०) व ऑर्डर ऑफ मेरिट (१९३१) हे किताब बहाल केले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते व त्यांपैकी स्टडिज इन रेडिओ ॲक्टिव्हिटी (१९१२), एक्स रेज अँड क्रिस्टल स्ट्रक्चर (मुलाबरोबर १९१५) द वर्ल्ड ऑफ साउंड (१९२०), कन्सर्निंग नेचर ऑफ थिंग्ज (१९२५), ओल्ड ट्रेड्स अँड न्यू नॉलेज (१९२६), ॲन इन्ट्रोडक्शन टू क्रिस्टल ॲनॅलिसिस (१९२९) आणि द युनिव्हर्स ऑफ लाइट (१९३३) हे विशेष उल्लेखनीय आहेत. ते लंडन येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.