ब्यूलर, योहानगेओर्ख : (१९ जुलै १८३७ – ६ एप्रिल १८९८). प्राचीन भारतीय लिपींचे व भारतविद्येचे सर्वश्रेष्ठ जर्मन अभ्यासक आणि संशोधक. जन्म जर्मनीत न्यूएनबर्गजवळील बॉर्सेटेल येथे. त्यांचे वडील धर्मगुरू होते. आरंभीचे शिक्षण हॅनोव्हर संस्थानात. १८५५ मध्ये त्यांचे गटिंगेन विद्यापीठात सौपे, कार्टियस इवाल्ड, बेन्फाय या प्रख्यात प्राध्यापकांच्या हाताखाली शिक्षण झाले.
बेन्फाय यांच्या विद्वत्तेबद्दल ब्यूलर यांच्या मनात अत्यंत आदर होता. १८५८ मध्ये ब्यूलर यांनी गटिंगेनमधून पदवी घेतली. त्यानंतर संस्कृत वैदिक वाङमयाच्या हस्तलिखितांच्या प्रती गोळा करण्यासाठी आणि यथादृष्ट प्रती करण्यासाठी ते पॅरिस, लंडन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत गेले. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांची जगद्विख्यात संस्कृत पंडित माक्स म्यूलर यांच्याशी ओळख झाली. संस्कृत वाङमयाचाचा ऐतिहासिक व तौलनिक दृष्ट्या त्यांनी अभ्यास केला.
ब्यूलर यांनी बेन्फाय यांच्याजवळ सर्व संस्कृत वाङमयाचा मूलाधार असलेल्या वेदवाङमयाचा सखोल अभ्यास केला होता पंरतु त्यांनी त्यावर आपले फारसे लिखाण प्रसिद केले नाही. त्यांचा पर्जन्य हा शोधनिबंध बेन्फाम यांच्या ओरिएन्ट अँड ऑक्सिडन्ट (खंड १, पृ. २१४) या नियतकालिकात १८६२ मध्ये प्रसिद्ध झाला. या निबंधासाठी त्यांनी केवळ वेदवाङ्मययाचाच अभ्यास केला नाही, तर इतरही प्राचीन वाङमयांचा व त्यांतील तौलनिक पुराणकथांचा अभ्यासाचा एक नवीन दृष्टिकोण मांडला.
१८६५ मध्ये त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम केले. तेथे त्यांनी उत्कृष्ट अध्यापक म्हणूनही लौकिक मिळविला. नंतर ते शाळा अधीक्षक व परीक्षक म्हणून होते व तेथेही त्यांनी चांगला लौकिक संपादन केला. त्यावेळचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर यांनी तर ब्यूलर यांच्यासारखा उत्कृष्ट विद्वान पाठविल्याबद्दल माक्स म्यूलर यांचे अनेकदा आभार मानले. सर रेमंड वेस्ट यांच्या समवेत डायजेस्ट ऑफ हिंदू लॉज (१८६७) हा अधिकृत ग्रंथ ब्यूलर यांनी प्रसिद्ध केला. ब्यूलर यांनी माक्स म्यूलर यांच्या समवेत सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या मालेमध्ये आपस्तंब, गौतम, वसिष्ठ, बौधायन यांच्या सूत्रवाङमयाचे भाषांतर मूलभूत स्वरूपाचे मानले जाते. ब्यूलर यांनी स्वतः हिंदुस्थानभर हिंडून संस्कृत हस्तलिखिते, शिलाळेख, ताम्रपट गोळा केले. गुप्तपूर्वकाळ आणि गुप्तपूर्वकालीन शिलालेखांचा त्यांनी सखोल अभ्यास केला.⇨ब्राह्मी लिपीचा त्यांच्या इतका तौलनिक व सखोल अभ्यास आतापर्यंत कोणीही केलेला नाही. या लिपीच्या अत्यंत बारीकसारीक फरकांचा अभ्यास करून तसेच सातवाहन, कुशाण, गुप्त आदी राजवंशांच्या शिलालेखांचाही बारकाईने अभ्यास करून त्यामध्ये कालानुरूप आणि प्रादेशिक फरक कसे आहेत, हे त्यांनी आपल्या इंडिशेपॅलिओग्राफी (१८९८) या जर्मन ग्रंथात साधार दाखवून दिले. या दृष्टीने त्यांच्या ‘ऑन द ऑरिजिन ऑफ द इंडियन ब्राह्म अल्फावेट’ (१८९५) ह्या व्याप्तिलेखाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. ह्सतलिखितांच्या बाबतीत त्यांचा अभ्यास अजोड होता. होरियुझी (जपान) येथील बौद्ध मठात इ. स. ६०९ पासून असलेली प्रज्ञापारमिताहृदयसूत्र ही पोथी ताडपत्रांवरील सर्वांत प्राचीन भारतीय पोथी असल्याचे त्यांनी निश्चित केले.
जे. एफ्. प्लीट यांनी ब्यूलर यांच्या इंडिशे पॅलिओग्राफी या ग्रंथाचे इंडियन पॅलिओग्राफी या नावाने इंग्रजीत भाषांतर करून इंडियन अँटिक्वेरी (खंड ३३) मध्ये प्रसिद्ध केले (१९०४). हा ग्रंथ लिपिशास्त्रात मूलाधार ठरला आहे. द इंडियन सेक्ट ऑफ द जैनाञ (इ. भा. जे. बर्जेस-१९०३) हा त्यांचा ग्रंथही महत्त्वपूर्ण आहे.
ब्यूलर यांना हिंदुस्थानातील हवा न मानवल्यामुळे जर्मनीस परत जावे लागले. जर्मनीला गेल्यावर ते परत व्हिएन्ना येथे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यांनी इंडो-आर्यन भाषा विज्ञान कोश तयार करण्याचे मोठे काम हाती घेतले होते. त्यावरून भारतीय वाङमय, इतिहास, भूगोल, गणित, ज्योतिष, न्याय, तत्त्वज्ञान, धर्म, पुराणकथा, संगीत इ. विषयांची मूलभूत माहिती वाचकांना झाली असती परंतु कॉन्सटन्स येथे तलावामध्ये नौकाविहार करीत असताना बुडून त्यांचा अकाली मृत्यु झाला आणि त्यांचे अंगीकृत कार्य अपूर्ण राहिले. भारतीय लिपिशास्त्र त्यांच्या ह्या अकाली मृत्युमुळे पोरके झाले.
संदर्भ : Buhler, Georg Trans, Fleet, J. F. Ed. Chattopadhyaya, Debiprasad, Indian Paleography : Max-Muller’s Obitury Note on G. uhler, Page 1 to 8, Calcutta, 1962.
गोखले, शोभना
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..