बोरिंग, एडविन गॅरिगूझ : (२३ ऑक्टोबर १८८६ – १ जुलै १९६८). अमेरिकन प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ. जन्म पेनसिल्व्हेनियातील फिलाडेल्फिया येथे. १९०८ मध्ये कार्नेल विद्यापीठातून पदवी घेऊन तेथेच टिचनर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मानसशास्त्रात पीएच्.डी. घेतली (१९१४). १९१८ ते २२ ह्या काळात त्यांनी क्लार्क विद्यापीठात प्रायोगिक मानसशास्त्राचे अध्यापन केले. १९२२ ते ५७ मध्ये ते हार्व्हर्ड विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. १९५७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. १९३४ मध्ये त्यांच्याच सूचनेनुसार हार्व्हर्डमध्ये मानसशास्त्र व तत्त्वज्ञान हे विभाग स्वतंत्र करण्यात आले तसेच १९४५ मध्ये प्रायोगिक व शरीरक्रिया-मानसशास्त्र हे विषय सामाजिक व नैदानिक (क्लिनिकल) मानसशास्त्रापासून वेगळे करण्यात आले. अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजी ह्या नियतकालिकाचे ते एक संपादक (१९२६-४६) होते तसेच कंटेंपोररी सायकॉलॉजी ह्या नियतकालिकाचे ते एक संस्थापक आणि आद्य संपादकही (१९५६-६१) होते. ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’चे अध्यक्ष (१९२८), वॉशिंग्टन (डी. सी.) येथे भरलेल्या ‘इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ सायकॉलॉजी’चे सन्मान्य अध्यक्ष (१९६३), पेनसिल्व्हेनिया व क्लार्क विद्यापीठांकडून अनुक्रमे १९४६ व १९५६ मध्ये सन्मान्य डी.एस्सी. पदव्या, ‘नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस’ तसेच ‘अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी’ यांचे सदस्य, ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल फाउंडेशन’चे सुवर्ण पदक (१९५९) इ. बहुमान व पारितोषिके त्यांना प्राप्त झाली. केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे ते निधन पावले.
त्यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन सुरुवातीस व्हुंट-टिचनर यांच्या प्रभावामुळे रचनालक्षी (स्ट्रक्चरल) व अंतर्निरीक्षणवादी होता पण पुढे त्यांचा हा दृष्टिकोन बदलून ते संपूर्णतया वस्तुनिष्ठतावादी, भौतिकतावादी व क्रियावादी (ऑपरेशनॅलिस्ट) बनले. हा बदल त्यांनी दिलखुलासपणे मान्यही केला. त्यांनी कार्नेल विद्यापीठात असताना वेदन या विषयावर केलेले (कान, डोळे इ. वेदनेंद्रियांवर केलेले संशोधन) प्रायोगिक संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जाते. हार्व्हर्ड विद्यापीठात गेल्यावर तेथील प्रशासकीय व इतर व्यापांमुळे प्रयोगशाळेशी असलेला त्यांचा प्रत्यक्ष संबंध बराच कमी झाला हे खरे असले, तरी त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांमार्फत योग्य दिशेने संशोधनकार्य चालूच ठेवले. संवेदन, भ्रम, बोधन इ. ज्ञानप्रक्रियांवरही त्यांनी मौलिक संशोधन केले. शरीरक्रिया-मानसशास्त्रावरही त्यांनी प्रायोगिक संशोधन केले. त्यांचा प्रायोगिक मानसशास्त्राचा इतिहास हा प्रमाणभूत व दर्जेदार ग्रंथ अनेक विद्यापीठांतून दीर्घकाल अधिकृतपणे पुरस्कृत करण्यात आला.
त्यांची महत्त्वाची ग्रंथरचना पुढीलप्रमाणे : अ हिस्टरी ऑफ एस्क्पेरिमेंटल सायकॉलॉजी (१९२९), द फिजिकल डायमेन्शन्स ऑफ कॉन्शसनेस (१९३३). सायकॉलॉजी : अ फॅक्चुअल टेक्स्टबुक (इतरांसमवेत संपा. १९३५), सेन्सेशन्स अँड पर्सेप्शन्स इन द हिस्टरी ऑफ एक्स्पेरिमेंटल सायकॉलॉजी (१९४२), फाउंडेशन्स ऑफ सायकॉलॉजी (इतरांसमवेत संपा. १९४८), सायकॉलॉजिस्ट ॲट लार्ज (१९६१), हिस्टरी, सायकॉलॉजी अँड सायन्स : सिलेक्टेड पेपर्स (१९६३), अ सोअर्स बुक इन द हिस्टरी ऑफ सायकॉलॉजी (इतरांसमवेत संपा. १९६५) इत्यादी.
काळे, श्री. वा.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..