बोटा, लूई : (२७ सप्टेंबर १८६२ – २७ ऑगष्ट १९१९). दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचा पहिला पंतप्रधान व बोअर युद्धातील एक बोअर सेनानी. त्याचा जन्म डच शेतकरी कुटुंबात ग्रेटाउन (नाताळ) येथे झाला. लहानपणीच त्याचे कुटुंब ऑरेंज फ्री स्टेट वसाहतीत राहावयास गेले. तिथे त्याने जर्मन मिशन विद्यालयात थोडेसे शिक्षण घेतले. तो बहुतेक वेळ आपल्या शेतावरच घालवीत असे. वयाच्या बाविसाव्या वर्षी तो झूलूलँडमध्ये गेला. झूलू राजा सेटीवेओच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांत यादवीयुद्ध सुरु झाले, तेव्हा दिनू झूलूस याची बाजू बोटाने घेतली आणि त्यास गादीवर बसविण्यास बोअरांची मदत दिली. दिनू झूलूसने याबद्दल सु. १२ लाख हेक्टर जमीन बोअरांना दिली. बोटाने या प्रदेशात नवीन प्रजासत्ताक स्थापले आणि जमीनजुमला घेऊन ॲनी एमिट या आयरिश युवतीशी विवाह केला (१८८६). ब्रिटीशांनी झूलूलँड जिंकल्यानंतर ट्रान्सव्हाल प्रजासत्ताकात हा भाग समाविष्ट झाला (१८८८). तत्पूर्वी स्वाझीलँडमध्ये त्याची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे बोटा सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाला. पुढे तो ट्रान्सव्हालच्या संसदेवर (व्होल्क स्त्राड) निवडून आला (१८९७)( तथापी या सुमारास बोअर (आफ्रिकेतर गोरे-मूळचे फ्रेंच-ह्यूजेनट्स, जर्मन-आयरिश इ.) व ब्रिटीश यांचे संबंध सलोख्याचे नव्हते. शिवाय ब्रिटीशांना आफ्रिकेतरांचे वर्चस्व व प्रदेशविस्तार अमान्य होता. यातून बोअर युद्ध (१८९९-१९०२) पेटले. बोअर सेनापती पेट्रस जकोबस झूबेअरच्या मृत्यूनंतर (१९००) बोटा सरसेनापती झाला. त्याने कोलेन्सो व स्पायन कॉप येथील लढायांत ब्रिटीशांचा पराभव केला. या युद्धातील कैद्यांत विन्स्टन चर्चिलही त्याच्या हाती सापडला होता तथापी ब्रिटीशांच्या मोठ्या सैन्यापुढे त्यास माघार घ्यावी लागली. अखेर गनिमीतंत्राने लढून त्याने काही दिवस शत्रूस बेजार केले. फेरीनिकिंगच्या शांतता तहाने हे युद्ध संपले (१९०२). बोटाने त्यानंतर हेट व्होल्क (जनता) हा बोअरांचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि त्याचा तो अध्यक्ष झाला. या पक्षाने ट्रान्सव्हालमध्ये बहुमत प्रस्थापित केले. तेव्हा ब्रिटीशांनी त्यांना स्वयंशासनाचा हक्क दिला. पहिला पंतप्रधान बोटा झाला (१९०८). पुढे बोटाने स्मटच्या सहकार्याने दक्षिण आफ्रिकेतील चार ब्रिटीश वसाहतींचे एक राष्ट्र करावे, अशी चळवळ सुरु केली. त्यातून युनियन ऑफ साउथ आफ्रिका हे राष्ट्र जन्मास आले. त्याचा बोटा पंतप्रधान झाला. अखेरपर्यंत तो या पदावर होता.
आपल्या पंतप्रधानकीच्या सुमारे १० वर्षांच्या कारकीर्दीत त्याने बोअर व ब्रिटन्स यांमध्ये भूतकाळ विसरून समझोता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि गोऱ्यांचे वर्चस्व दक्षिण आफ्रिकेत वाढविले तथापि त्याच्या या धोरणामुळे त्याच्याच बोअर पक्षातील अनेक निकटवर्ती मित्र नाराज झाले. त्यांनी त्याच्या ब्रिटिश धोरणावर टीकाही केली आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नवीन पक्ष स्थापन केला. त्याच्याविरुद्ध १२,००० बोअरांनी बंड केले महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांनी सत्याग्रहाचे धोरण अवलंबिले. तेव्हा त्याने समझोत्याने भारतीयांचा प्रश्न मिटविला आणि विट्वॉटर्झरॅडमधील खाणीतील गोऱ्यांचा संप मिटविला. या सर्वांकरिता त्यास कधी समझोत्याचा तर कधी बळाचा वापर करावा लागला. जर्मनीच्या नैर्ऋत्य आफ्रिकेतील वसाहती जिंकण्यास त्याने ब्रिटिशांना सर्वतोपरी मदत केली आणि व्हर्सायच्या शांतता तहात दक्षिण आफ्रिकेचा प्रतिनिधी म्हणून तो यान स्मट्सबरोबर उपस्थित होता (१९१९). त्यानंतर लवकरच प्रिटोरिया येथील शेतवाडीवर तो मरण पावला.
दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांचेच स्वामित्व असावे, या मताचा तो कट्टर पुरस्कर्ता होता. यामुळे एतद्देशियांविरुद्ध त्याने नेटिव्ह लँड ॲक्ट संमत केला (१९१३). त्याने ब्रिटीशांबरोबर नेहमीच समझोत्याचे धोरण ठेवले आणि बोअर व ब्रिटीश यातील संघर्ष मिटविण्याचा प्रयत्न केला. तथापी बोअरांना त्याने कमी लेखले नाही. पण यामुळे त्याला अनेक बोअर मित्रांना गमवावे लागले.
संदर्भ : 1. Garson, N. G. Louis Botha or John X Merriman. London, 1969.
देशपांडे, सु. र.