बोगदा : मुख्यतः जमिनीखाली असलेल्या मानवनिर्मित अथवा निसर्गनिर्मित आडव्या मार्गाला बोगदा म्हणतात. बोगद्यांचा वापर खाणकाम, वाहनांची रहदारी, रेल्वेवाहतूक, शेतीसाठी आणि इतर कामांकरिता लागणारा पाणीपुरवठा, वाहितमल वाहून नेणारी भुयारी गटारे इ. अनेक कारणांसाठी होतो.
इतिहास : पहिला बोगदा खणण्याच्या स्वरुपाचे काम कदाचित इतिहासपूर्व कालीन मानवाने त्याच्या गुहा मोठ्या करण्यासाठी केलेले असावे. बहुतेक प्रमुख प्राचीन संस्कृतीमध्ये बोगदा खणण्याच्या पद्धती काही प्रमाणात विकसित झालेल्या होत्या, असे आढळून येते. बॅबिलोनियामध्ये सिंचाईकरिता बोगद्यांचा उपयोग करीत असत. इ. स. पू. सु. २१८० ते २१६० या काळात तेथील राजवाडा एका मंदिराला जोडणारा आणि पादचाऱ्यांना ये-जा करता येईल असा ९०० मी. लांबीचा आणि विटांचे अस्तर केलेला मार्ग युफ्रेटीस नदीखालून बांधण्यात आलेला होता. याकरिता कोरड्या ऋतूत नदी वळविण्यात आलेली होती. ईजिप्शियन लोकांनी अपघर्षक (घासून व खरबडून पृष्ठभाग गुळगुळीत करणाऱ्या) पदार्थांनी वेष्टिलेल्या तांब्याच्या करवतींनी व पोकळ वेताच्या छिद्रकांनी मृदू खडक कापण्याचे तंत्र विकसित केलेले होते. नाईल नदीजवळील अबू सिंबेल मंदिर वालुकाश्मात खोदण्यासाठी याच तंत्राचा वापर करण्यात आला होता. यापेक्षा अधिक महत्प्रयत्नांनी खोदलेली मंदिरे इथिओपियात व भारतात आढळतात. भारतात पुरातन काळापासून भूपृष्ठांतर्गत बांधकामे झालेली असून त्यांमध्ये मोठ्या गुंफा व लेणी (उदा., अजिंठा व वेरूळ), पाणीपुरवठ्यासाठी बांधलेले नळ, जुन्या भुयारी चोरवाटा अथवा गुप्तमार्ग इत्यादींचा समावेश होतो.
ग्रीक व रोमन लोकांनी दलदलीमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी व पाणीपुरवठ्यासाठी बोगद्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला. रोमन काळातील जलवाहक बोगदे आजही चांगल्या स्थितीत आढळतात [⟶ जलवाहिनी]. प्राचीन काळातील सर्वांत मोठा बोगदा कदाचित इ. स. पू. ३६ मध्ये नेपल्स व पोतत्स्वॉली यांच्या दरम्यानच्या रस्त्यावर बांधलेला बोगदा (१,५०० मी. लांब, ८ मी. रुंद, ९ मी. उंच ) हा असावा. त्या काळी जवळजवळ खोदलेल्या कूपकांच्या मालिकेने बोगद्यांत वायुवीजनाची (हवा खेळती ठेवण्याची) व्यवस्था करण्यात येई. बोगद्यांना अस्तर लावण्याचे टाळण्यासाठी प्राचीन काळातील बहुतांश बोगदे योग्य अशा मजबूत खडकांत खोदण्यात येत. असा खडक फोडण्यासाठी तो प्रथम तापवीत व मग एकदम पाण्याने थंड करीत. त्या काळी वायुवीजनाच्या पद्धती अगदीच प्राथमिक स्वरुपाच्या असल्याने बोगदा खणण्यासाठी लावलेले हजारो गुलाम मृत्युमुखी पडत. इ.स. ४१ च्या सुमारास रोमन अमदानीत फूचीनॉ सरोवरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सहा किमी. लांबीचा बोगदा खणण्याकरिता ३०,००० गुलामांचा दहा वर्षे वापर करण्यात आला होता. गुलामगिरीची पद्धत कमी झाल्यावर मात्र वायुवीजन व सुरक्षा उपायांकडे पुष्कळच अधिक लक्ष पुरविण्यात येऊ लागले.
मध्ययुगात बोगदा खोदाईचे काम प्रामुख्याने खाणकाम व लष्करी अभियांत्रिकी यांपुरतेच मर्यादित होते. सतराव्या शतकात यूरोपातील वाहतुकीच्या गरजा वाढू लागल्याने बोगदा खोदाईच्या तंत्रात प्रगती होऊ लागली. आधुनिक बोगद्यांच्या रचनेचा प्रारंभ जेव्हा पूर्वीचे अनेक कालवे मधल्या टेकड्यांतून बोगदे खणून जोडण्यात येऊ लागले, तेव्हा झाला. त्या काळातील अनेक मोठ्या कालवा-बोगद्यांपैकी बांधण्यात आलेला पहिला बोगदा म्हणजे भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या कालव्याचा एक भाग म्हणून १६६६-८१ मध्ये फ्रान्समध्ये बांधलेला १५० मी. लांब, ७ मी. रुंद व ८ मी. उंच असा कानाल द्यू मीदी (लांग्वेदो) हा बोगदा होय. हा बोगदा खणताना प्रथमच मोठ्या प्रमाणावर स्फोटक द्रव्यांचा उपयोग करण्यात आला. अठराव्या शतकात व एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी यूरोपात व उत्तर अमेरिकेत अनेक बोगदे खणण्यात आले. तथापी १८३० च्या सुमारास रेल्वेमार्गाचा प्रसार सुरु झाल्यावर यांपैकी अनेक बोगदे उपयोगातून गेले. रेल्वेमार्गाचा जगभर प्रसार होण्यास प्रारंभ झाल्यावर सु.१०० वर्षांपर्यंत रेल्वेमार्गावरील बोगद्यांच्या खोदाईला प्रचंड चालना मिळाली. रेल्वेमार्गावरील बोगदा खोदाईची आद्य तंत्रे इंग्लंडमध्ये विकसित झाली. महाराष्ट्रातील बोर व थळ (कसारा-इगतपुरी) या घाटांतील बोगदे, तसेच कल्याण व मुंबई यांच्या दरम्यानचा पारसीक बोगदा हे रेल्वेमार्गावरील बोगदे सुप्रसिद्ध आहेत. अमेरिकेच्या मॅसॅचूसेट्स संस्थानातील २१ वर्षे बांधकाम चालू असलेल्या व १८७६ मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या हूसाक बोगद्याच्या खोदाईत वापरण्यात आलेल्या तंत्रामुळे बोगदा खोदाईकामात मोठी लक्षणीय प्रगती झाली. या बोगद्याकरिता प्रथमच डायनामाइट वापरण्यात आले स्फोटकद्रव्यांचा स्फोट घडवून आणण्यासाठी विजेचा वापर करण्यात आला, तसेच प्रारंभी वाफेवर व नंतर संपीडित (दाबाखालील) हवेवर चालणारे छिद्रक वापरले गेले. याच सुमारास आल्प्स पर्वतात अधिक भव्य असे रेल्वेमार्गावरील बोगदे खोदण्यास सुरुवात झाली. यांपैकी माँ सनी या पहिल्या बोगद्याला १४ वर्षे लागली (१८५७-७१). या बोगद्याचे अभियंते झेरमॅ सॉमल्ये यांनी अनेक मूलभूत तंत्रे प्रचारात आणली. यांत रुळावर बसविलेली छिद्रक गाडी, पाणदट्ट्यावर चालणारे वायू संपीडक आणि दुरुस्ती कर्मशाळेसह कामगारांकरिता निवासस्थाने, रुग्णालय, शाळा इ. सोयीनी युक्त अशा वसाहती वसविणे इत्यादींचा समावेश होतो.
सॉमल्ये यांनी दर दिवशी ४.५ मी. खोदाई करु शकणारा व संपीडित हवेवर चालणारा एक छिद्रकही तयार केला होता आणि तो नंतर यूरोपात अनेक बोगद्यांकरिता वापरण्यात आला. तथापी नंतर हूसाक बोगद्याकरिता सायमन इंगरसॉल व इतरांनी विकसित केलेल्या अधिक टिकाऊ छिद्रकांनी त्याची जागा घेतली. त्यानंतर आल्प्समध्ये सेंट गॉथर्ड (१४ किमी. लांब १८७२-८२), सिंप्लॉन (१९ किमी. लांब १८९८-१९०६) आणि लचबेर्ख (१४ किमी. लांब १९०६-११) हे सुप्रसिद्ध बोगदे खोदण्यात आले. बऱ्याचशा दीर्घ अंतराच्या व खडकात खोदलेल्या बोगद्यांच्या बाबतीत त्यांतील पाणी बाहेर काढून टाकण्याच्या समस्येवर विविध उपाय योजावे लागले.
प्रकार : बोगद्यांच्या उपयोगानुसार त्यांचे मुख्यतः चार प्रकार पडतात. यांमध्ये (१) जलवाहक बोगदे, (२) दळणवळणाचे बोगदे, (३) वायुवीजन बोगदे व (४) भूमिगत योजनांतर्गत येणारे भुयारी मार्ग यांचा समावेश होतो.
जलवाहतूक बोगदे : यांमध्ये जलविद्युत् योजनांमधील बोगदे, पर्यायी मार्गांचे बोगदे व पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारे बोगदे येतात. एकोणिसाव्या शतकातील पुष्कळशा जलविद्युत् योजनांमध्ये तलावातील पाणी उघड्या पटातून व जमिनीवरून नेलेल्या नळांमधून विद्युत् केंद्राकडे नेले जात असे. जेथे मोठे डोंगर आडवे येतात तेथे बोगदे खणण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. उदा., मुळशी-भिरा योजना, खोपोली येथील टाटा जलविद्युत् प्रकल्प. अलीकडे जलविद्युत् योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगद्यांचा वापर होत आहे याचे कारण भूपृष्ठांतर्गत आखणीमुळे बोगद्यांची लांबी ही जमिनीवरील कालवे किंवा नळ यांपेक्षा पुष्कळच कमी होते आणि त्यामुळे बोगद्याचा उपयोग करून योजनेचा खर्च कमी होऊ शकतो. नदीच्या प्रवाहात धरणाचे काम चालू असताना पाण्याचा प्रवाह योग्य अशा पर्यायी मार्गाचा बोगदा काढून वळविला जातो. उदा., भाक्रा-नानगल येथील धरण. पाणीपुरवठा योजनेत पाण्याच्या वाहतुकीसाठी बोगद्यांचा वापर करण्याची प्रथा आहे. उदा., मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा योजनेतील बोगदा.
दळणवळणाचे बोगदे : कित्येकदा रस्ते किंवा रेल्वे यांची आखणी करताना मधे येणारे डोंगर बोगद्यांच्या साहाय्याने पार करणे आवश्यक असते अन्यथा रस्त्याची लांबी वाढते आणि आखणी अतिशय दुर्गम व खर्चिक होते. पादचारी लोकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी केलेले बोगदेही या प्रकारात येतात. रहदारीसाठी नदीवर पूल बांधण्याऐवजी कित्येकदा नदीखालून दळणवळणासाठी बोगदा खणला जातो. नव्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अशा प्रकारचे अनेक बोगदे बांधावयाची योजना आहे. स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतातून जाणारा नवा सेंट गॉथर्ड हा बोगदा मोटारवाहतुकीचा जगातील सर्वांत जास्त लांबीचा (१७ किमी.) असून त्याचे बांधकाम ११ वर्षे चालू होते व १९७७ मध्ये ते पूर्ण झाले आणि त्याला ६.५ अब्ज फ्रँक (सु. ३२.५ अब्ज रु.) खर्च आला.
वायुवीजन बोगदे : भूमिगत विद्युत् केंद्रे वा तत्सम योजनांमध्ये शुद्ध व मोकळ्या हवेचा पुरवठा करण्यासाठी या बोगद्यांचा उपयोग होतो.
इतर भूमिगत योजनांतर्गत येणारे बोगदे : यामध्ये युद्धकार्यासाठी बांधण्यात येणारी भूमिगत कोठारे, विमानगृहे, तसेच भूमिगत विद्युत् केंद्रे इत्यादीकरिता बोगद्यांचा उपयोग करतात. या प्रकारात एक अभिगमन बोगदा असून त्याच्या दुसऱ्या टोकास आवश्यकतेनुसार कमीजास्त लांबीरुंदीची दालने बांधता येतात.
क्षेत्रफळ व आकार : बोगद्याचा आकार व क्षेत्रफळ ठरविताना मुख्यतः बोगद्याचा वापर आणि बोगद्याभोवतालचा खडक व जमीन यांचा विचार करावा लागतो. बोगद्याचे विविध आकार प्रचलित असून त्यांमध्ये वर्तुळाकृती, नालाकृती, कमानीचा, अंडाकृती इ. प्रकार आढळून येतात (आ.१). बोगदा हा जमिनीत खणून काढावयाचा असल्याने कामाच्या सोयीसाठी त्याचा व्यास अथवा समतुल्य व्यास हा कमीतकमी २ मी. एवढा असावा लागतो. आतापर्यंत बांधलेल्या सर्वांत मोठ्या क्षेत्रफळाच्या बोगद्याचा व्यास २५.५ मी. एवढा असून तो अमेरिकेमध्ये सॅन फ्रॅन्सिस्को येथे आहे. बोगद्याची लांबी १०० मी. पासून कित्येक किमी. असते (न्युयार्कमधील डेलावेअर जलवाहक बोगदा १३६ किमी. लांबीचा आहे).
बोगद्यातून पाणी वाहत असल्यास बोगद्याच्या भिंतीच्या आतील बाजूने पाण्याचा दाब असतो. भुसभुशीत जमिनीतून जाणाऱ्या बोगद्यावर बाहेरील बाजूने सर्व भागांवर दाब येतो. हा दाब घेण्यास वर्तुळाकृती बोगदा जास्त सोयीचा असतो. तसेच वर्तुळाकृती बोगद्यात कमीतकमी परिमितीमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रफळ मिळू शकते आणि घर्षणामुळे होणारा शक्तिक्षय कमी होतो. चांगल्या खडकातून जाणाऱ्या बोगद्याच्या बाजूंवर व तळावर बाहेरून फारसा दाब येत नाही म्हणून अशा बोगद्यांचा तळ सपाट ठेवून बाजू उभ्या ठेवतात व फक्त वरच्या बाजूस कमान (वर्तुळखंडी किंवा अर्धवर्तुळाकार) ठेवली जाते. या बोगद्यांना कमानीचे बोगदे म्हणतात. अशा तऱ्हेचे बोगदे रहदारीसाठी सोयीचे असतात. खडक चांगला नसल्यास बाजूने व तळातून येणारा दाब घेण्यासाठी सर्व बाजुंनी वक्र आकार ठेवणे जरुर असते. पूर्ण वर्तुळाकार बोगद्यात रचनात्मक अडचणी असल्याने त्याऐवजी नालाकृती बोगदा जास्त सोयीचा असतो.
आखणी : बोगद्याचे काम भूपृष्ठांतर्गत असल्याने, तसेच खोदाईचे काम लवकर संपविण्यासाठी दोन अथवा अधिक ठिकाणांहून बोगद्याच्या कामास सुरुवात करतात. त्यामुळे त्याची मार्गरेषा अत्यंत अचूक आखावी लागते.
आखणीमध्ये दोन गोष्टींचा समावेश असतो. प्रथमतः मार्गरेषेवरील निरनिराळ्या बिंदूंची पातळी व एकमेकांपासूनचे अंतर यांचे समतलन करणे (एका पातळीत आणणे) व थिओडोलाईट या उपकरणाद्वारा जमिनीवर मांडणी करणे [⟶ सर्वेक्षण] आणि त्यानंतरचा मुख्य भाग म्हणजे जमिनीखालील बोगद्याच्या खोदाईकरिता मार्गरेषेचे यथावकाश स्थानांतर करणे हा होय. मार्गरेषेचे स्थानांतर करण्यासाठी स्तंभ बोगद्याचा उपयोग होतो.
भूवैज्ञानिक समन्वेषण : बोगद्याची मार्गरेषा निश्चित करण्यासाठी व खोदाईच्या कामात येणाऱ्या अडचणींची कल्पना येण्यासाठी बोगद्याच्या मार्गरेषेजवळील स्तरांचे भूवैज्ञानिक समन्वेषण (पाहणी) करणे जरुर असते. अशा प्रकारच्या समन्वेषणाद्वारा बोगद्याच्या मार्गरेषेवर येणाऱ्या विविध स्तरांची माहिती मिळते. यामध्ये स्तरांचे प्रकार व त्यांमध्ये असणारा साधा, कमकुवत स्तर, मूलभूत विकृती, भूजलाची शक्यता आणि त्याचा दाब व साठा, यांशिवाय अंतर्गत वायू व उष्णता यांची माहिती मिळते. अशा प्रकारच्या समन्वेषणासाठी भूसर्वेक्षण, जमिनीतील स्तरांचा अभ्यास करण्यासाठी जमिनीत घेतलेल्या छिद्रणांची क्रमवार नोंद, भूभौतिकीय तंत्र [⟶ खनिज पूर्वेक्षण], हवाई छायाचित्रण इ. पद्धतींचा उपयोग करतात.
खोदाई : बोगद्याच्या कामाकरिता लागणाऱ्या खोदाईच्या पद्धती व तदनुषंगिक कामेही मुख्यतः ज्या स्तरामधून बोगदा न्यावयाचा असतो त्याच्या मऊ-घट्टपणावर, तसेच खोदकामात लागणाऱ्या भूजलाच्या अथवा भूपृष्ठजलाच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. यामुळे बोगद्याकरिता लागणाऱ्या खोदाईसाठी कोरड्या अथवा पाणी असणाऱ्या परिस्थितीत, तसेच घट्ट स्तरामधील किंवा मृदू स्तरामधील खोदाईकरिता लागणाऱ्या अनेक विविध पद्धतींचा विचार करावा लागतो. बोगद्याची खोदाई ही मोठ्या खर्चाची व जोखमीची बाब असल्यामुळे तिच्या पद्धतीची निवड, तिच्यात समाविष्ट असणाऱ्या विविध क्रियांचे नियोजन आणि या क्रियांकरिता लागणारी यंत्रसामग्री या सर्वांचा मोठ्या काळजीपूर्वक विचार करणे जरुर असते.
कठीण स्तरामधील खोदाई : विविध क्रिया : कठीण खडकात बोगदे खणण्याच्या अनेक पद्धती असल्या, तरी या सर्वांमध्ये साधारणपणे पुढील पाच क्रिया असतात : (१) छिद्रण, (२) उत्स्फोटन, (३) स्फोटवायूचे उत्स्त्रवण व वायुवीजन, (४) फोडलेला खडक वाहून नेणे आणि (५) इतर आनुषंगिक कामे. वरील सर्व कामे चक्रीय पद्धतीने करावयाची असून ती एकाच ठिकाणी कमीत कमी जागेत व धोकादायक परिस्थितीत करावयाची असल्याने त्यांचे नियमन जर व्यवस्थित झाले नाही, तर खोदाईच्या कामाचा खर्च व वेळ वाढतो आणि मनुष्यहानीही संभवते.
(१) छिद्रण : बोगद्याच्या कामासाठी प्रथम आवश्यक तेवढ्या खोलीची (१ ते ४ मी.) व व्यासाची (३० ते ४० मिमी.) भोके ही संपीडित हवेच्या शक्तीवर चालणाऱ्या यांत्रिक पहारींच्या साहाय्याने घेतात. खडकास भोके पाडताना उडणाऱ्या सूक्ष्म धूलिकाकणांमुळे कामगारांना अपाय होऊ नये म्हणून पाण्याचा उपयोग करतात. दाबयुक्त पाणी पहारीमध्ये असलेल्या सूक्ष्म छिद्रांवाटे पहारीच्या टोकास पुरविले जाते (आ. २). अशा यांत्रिक पहारींच्या साहाय्याने वरुन खाली भोके पाडावयाची असल्यास या पहारी तोलण्यासाठी संपीडित हवेच्या शक्तीवर चालणारे उभे किंवा आडवे आधार द्यावे लागतात. एकाच वेळी निरनिराळ्या पातळ्यावर अनेक यांत्रिक पहारी चालविण्यासाठी छिद्रण गाड्याचा (जंबोचा) उपयोग होतो (आ.३). भोके पाडण्याचे काम संपल्यावर हा गाडा दूर नेता येत असल्याने यांत्रिक पहारी व त्यासाठी लागणारे हवेचे व पाण्याचे नळ, तसेच इतर साधनसामग्री उभारण्यासाठी आणि काम संपल्यावर ती दूर नेऊन ठेवण्यासाठी लागणाऱ्या वेळात बचत होते.
एका पाळीत स्फोट करून तीतील फुटलेला दगड बाहेर काढणे सहजसाध्य होईल, अशा बेताने भोकांची लांबी ठरवितात. भोकांची रचना व मांडणी तसेच त्यामध्ये ठासावयाच्या दारूचा प्रकार आणि परिणाम हे खडकाच्या प्रकारावर व इतर अनेक गोष्टीवर अवलंबून असते. सामान्यतः बोगदा खणण्यासाठी बोगद्याच्या केंद्रबिंदूंच्या आसपास जास्त लांबीची व तिरपी भोके पाडतात. निरनिराळ्या रचना पद्धतीत या तिरप्या भोकांची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. या भोकांत भरलेल्या दारूचा स्फोट प्रथम करतात म्हणून यांना अग्रस्फोटित भोके असे म्हणता येईल. स्फोट झाल्यावर खडकातून शंकूच्या अथवा पाचरीच्या आकाराचा भाग तुटून पोकळी तयार होते.
या भोकांच्या भोवतालची इतर भोके सामान्यतः बोगद्याच्या अक्षाला समांतर असतात व त्यांत भरण्यात येणाऱ्या दारूचे प्रमाण कमी असते. या भोकांना विमोचक भोके म्हणतात. या भोकांचा स्फोट अग्रस्फोटीत भोकानंतर होतो. सर्वांत शेवटी बोगद्याच्या परिमितीजवळ असलेल्या भोकांतील दारूचा स्फोट होतो. अशा तऱ्हेने निरनिराळ्या भोकांतील दारूचा स्फोट वेगवेगळ्या वेळी होण्यासाठी विलंबित अधिस्फोटक (उच्च स्फोटक द्रव्याचा स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणारी संवेदनशील प्राथमिक स्फोटक द्रव्ययुक्त प्रयुक्ती) वापरतात. आ. ४ मध्ये बोगद्याच्या खोदाई कामात सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या छिद्रण रचना पद्धती (आकृतीबंध) दाखविल्या आहेत.
(२) उत्स्फोटन : खडकाला भोके पाडल्यावर त्यांमध्ये योग्य प्रकारची स्फोटक द्रव्ये भरुन मग त्यांचे जरुरीप्रमाणे स्फोट घडवून आणणे या क्रियांचा उत्स्फोटनामध्ये समावेश होतो. प्रथम भोकांमधील धूळ व पाणी जास्त दाबाच्या हवेने स्वच्छ करतात. सर्वसाधारणपणे डायनामाइट हे स्फोटक द्रव्य वापरतात. डायनामाइटामध्ये नायट्रोग्लिसरीन हा अत्यंत स्फोटक पदार्थ असतो. डायनामाइट हे कांड्यांच्या (३ सेंमी. व्यास व २० सेंमी. लांब) आकारात मिळते [⟶ स्फोटक द्रव्ये]. प्रत्येक भोकात किती प्रमाणात डायनामाइट किंवा इतर दारू ठासावयाची हे त्या खडकाच्या प्रकारावर व भोकांच्या रचना पद्धतीवर अवलंबून असते. प्रथम भोकाच्या टोकाशी एक अथवा अधिक कांड्या घालून उरलेला भाग मातीने भरुन ठासतात. ठासणी करताना स्फोटकामधील तार तुटणार नाही याची दक्षता घेतात. सर्व भोकांमधून आलेल्या अधिस्फोटकाच्या तारा योग्य पद्धतीने एकत्र जुळवून मग ते विद्युत् मंडल⇨ गॅल्व्हानोमीटराने तपासून त्यानंतर छोट्या विद्युत् जनित्राच्या साहाय्याने किंवा नेहमीच्या विद्युत् पुरवठ्याच्या तारा जोडून स्फोट करतात. सुरुंगाची दारू ठासणे व स्फोट करणे ही कामे फार जोखमीची असल्याने त्यांसाठी तज्ञ व जबाबदार कार्यदेशक नेमणे जरुर असते. डायनामाइटाच्या कांड्या व अधिस्फोटक यांचा साठा, वाहतूक इत्यादींच्या बाबत अत्यंत दक्षता बाळगावी लागते. तसेच भोकामध्ये भरलेल्या कांड्या उडतात किंवा नाही, उडाली नसल्यास ती काढून घेणे किंवा परत उडवण्याची व्यवस्था करणे यासाठी काळजी घ्यावी लागते.
(३) स्फोटवायूचे उत्स्त्रवण व वायुवीजन : बोगद्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना शुद्ध व मोकळ्या हवेचा पुरवठा करणे व स्फोटामुळे तसेच बोगद्यामध्ये वापरात येणाऱ्या यंत्रांच्या आणि वाहनांच्या इंधनज्वलनामुळे निर्माण झालेले अपायकारक वायू बाहेर फेकणे हा वायुवीजनाचा उद्देश असतो. यासाठी प्रत्येक कामगारामागे कमीत कमी दर मिनिटास ७ ते ८ घ. मी. शुद्ध हवेचा पुरवठा करावा लागतो. हवेच्या पुरवठ्याचे प्रमाण हे बोगद्याचा आकार व लांबी, सुरुंगाची दारू व तिचे प्रमाण, स्थानिक तापमान व आर्द्रता इ. अनेक गोष्टीवर अवलंबून असते. वायुवीजनाकरिता बोगद्याच्या द्वारापाशी हवा पुरवठा करणारे अथवा हवा बाहेर काढणारे पंखे बसवून हे काम नळाच्या साहाय्याने करतात.
(४) फोडलेला खडक वाहून नेणे : सुरुंगामुळे उडालेले व सर्वत्र विखुरलेले लहानमोठे दगड वाहनामध्ये भरण्याचे काम लहानशा बोगद्यामध्ये हाताने किंवा सरकत्या वाहक पट्ट्याच्या साहाय्याने करतात. मोठ्या बोगद्यात यांत्रिक फावड्यांचा उपयोग करतात. फोडलेला दगड रेल्वेमार्गाने अथवा राशिपातक मालवाहू मोटारीच्या (डंपरच्या) साहाय्याने बोगद्याच्या बाहेर आणून नंतर मोटारीचा मागील भाग कलंडवून त्यातील दगड बाहेर फेकले जातात. सुरुंगाच्या स्फोटानंतर खडकांचे काही दगड किंवा पापुद्रे निखळून खाली पडण्याच्या अवस्थेत असतात. स्फोटानंतर इतर कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी असे धोकादायक अवस्थेतील दगड वा पापुद्रे पहारीच्या साहाय्याने काढून टाकणे आवश्यक असते.
(५) इतर आनुषंगिक कामे : बोगद्याच्या सर्व भागांत विशेषतः खोदाईच्या ठिकाणी आवश्यक तेवढी प्रकाशयोजना विद्युत् तारांच्या साहाय्याने करणे जरुर असते. तसेच बोगद्यातील निरनिराळी ठिकाणे आणि बाहेरील बाजू यांमध्ये दूरध्वनीच्या साहाय्याने दळणवळण चालू ठेवून बोगद्यातील निरनिराळ्या क्रियांचा समन्वय साधणे आवश्यक असते. बोगद्याच्या आकाराबाहेरील निखळलेला दगडाचा भाग वा स्तर पडू नये म्हणून तो काढून टाकणे अथवा पक्क्या खडकास जोडणे जरुर असते. हे काम कमी खर्चात व लवकर करण्यासाठी शैलबंध वापरतात. शैलबंधामध्ये साधारण ३-४ मी. लांबीचा व २५ ते ३० मिमी. व्यासाचा पोलादी दंड असून त्याचे एक टोक फुलवून खडकात घट्ट बसेल अशी व्यवस्था करतात. काही प्रकारच्या शैलबंधाच्या टोकांना आटे असलेले दुभंगलेले नट असतात. शैलबंधाच्या दंडाचे आटे फिरवून तो या नटात बसविला म्हणजे ते नटाचे भाग दूर होऊन खडकाला घट्ट पकडतात. दुसऱ्या प्रकारात दंडाचे एक टोक दुभागलेले असून त्यात एक पोलादी पाचर बसविलेली असते. खडकामध्ये ३ ते ४ मी. लांबीचे भोक पाडून त्यात हे दुभागलेले टोक घालतात व बाहेरुन ठोकतात त्यामुळे दुभागलेले टोक पाचरीमुळे फुलते व खडकात घट्ट रोवून बसते. शैलबंधाच्या दुसऱ्या टोकास आटे असून त्यावर एक पोलादी पट्ट ठेवून त्यावर एक नट घट्ट आवळून बसवितात. शैलबंध व खडक यांच्यामधली जागा सिमेंट काँक्रीटने भरतात. अशा प्रकारचे शैलबंध बोगद्याच्या पृष्ठभागावर १ ते २ मी. अंतरावर बसवल्यास त्यांच्याद्वारा सैल झालेले दगड घट्ट बसतात व ते पडण्याची भिती राहत नाही. काही वेळा शैलबंधाच्या ऐवजी प्रबलित (पोलादी सळ्या अथवा जाळ्या घालून अधिक बलवान केलेल्या) सिमेंट काँक्रीटचे अटकाव वापरतात. यांमध्ये खडकामध्ये भोके पाडून त्यात सलोह काँक्रीट भरतात.
खोदाईच्या पद्धती : बोगद्याकरिता कठीण स्तरामधील खोदाईच्या मुख्यतः चार पद्धती आहेत : (१) पूर्णमुखी पद्धत, (२) टप्प्याची पद्धत, (३) ऊर्ध्व अग्रेसर पद्धत, (४) मार्गदर्शी बोगदा पद्धत. जरुरीनुसार यांपैकी योग्य त्या पद्धतीची निवड करतात.
(१) पूर्णमुखी पद्धत : या पद्धतीत बोगद्याच्या मुखाच्या संपूर्ण क्षेत्रफळात एकाच वेळी भोके पाडून तेथील खोदाई करतात. (आ. ४).
(२) टप्प्याची पद्धत : बोगद्याची उंची जास्त असल्यास त्याचे दोन भाग करून वरील अर्ध्या भागात ३ ते ४ मीटरची खोदाई प्रथम करतात. नंतर बोगद्याच्या खालील व वरील भागांत योग्य त्या प्रमाणात भोके घेऊन ही सर्व भोके एकाच वेळी उडवितात. अशा तऱ्हेने टप्प्याच्या अथवा पायरीच्या आकारात काम पुढे सरकते. जर वरच्या भागात उत्स्फोटन क्रिया व्यवस्थित झाली, तर त्यामुळे फुटलेला खडक पायरीच्या खाली येऊन पडतो. या पद्धतीत एकाच वेळी भोके पाडण्याचे आणि फुटलेला दगड हलविण्याचे काम चालू राहत असल्याने बोगद्याचे काम लवकर पूर्ण होते (आ. ६).
(३) ऊर्ध्व अग्रेसर पद्धत : साधारण ठिसूळ खडकातून जाणाऱ्या बोगद्यासाठी ही पद्धत सोयीस्कर असून यामध्ये बोगद्याच्या (वरच्या) अर्ध्या भागाची खोदाई २० ते २५ मी. प्रथम करून मग छताला आवश्यक लागणारे तात्पुरते आधार देतात. त्यानंतर दोन्ही भागांत काम चालू राहते. खालील भागातील काम जसजसे पुढे सरकते तसतसे वरील भागातील आधार तळापर्यंत नेतात (आ. ७).
(४) मार्गदर्शी बोगदा पद्धत : या पद्धतीत मूळ बोगद्यास समांतर असा एक लहान बोगदा प्रथम खणतात त्यामुळे बोगद्याच्या कामात येणाऱ्या अडचणींची कल्पना येते. यालाच मार्गदर्शी बोगदा म्हणतात. मूळ बोगदा खणताना मार्गदर्शी बोगद्याचा रहदारीसाठी, फोडलेला खडक वाहून नेण्यासाठी व इतर कामांसाठी उपयोग होतो.
मऊ किंवा भुसभुशीत स्तरामधील खोदाई : विविध प्रकारच्या मातीमधून अथवा भुसभुशीत दगडातून बोगदा नेताना खोदाई केल्यावर अथवा करावयाच्या पूर्वी आधार देऊन मग ढासळणारी माती थोपवणे आणि जसजशी खोदाई होत जाईल तसतसे कायम स्वरुपाचे अस्तर बांधणे आवश्यक असते. त्यामुळे या प्रकारच्या कामामधील क्रिया व पद्धती ह्या कठीण स्तरातील पद्धतीपेक्षा भिन्न असतात.
आधार पद्धतीचा वापर हा बोगद्याची खोदाई चालू असताना तेथे लागणाऱ्या (असणाऱ्या) पाण्यावर अवलंबून असतो. त्यामुळे कोरड्या जागेतील बोगद्याचे काम आणि पाणी असलेल्या जागेतील बोगद्याचे काम अशा दोन पद्धती पडतात.
कोरड्या व मऊ स्तरातील खोदाई : या पद्धतीत खोदाई करताना ढासळणाऱ्या मातीला आधार देण्याचे काम दोन पद्धतींनी करता येते. पहिल्या पद्धतीत खोदाई करताना काम जसजसे पुढे सरकेल तसतसे लाकडाचे किंवा लोखंडी तुळ्यांचे उभे व आडवे आधार देऊन त्यांमध्ये लाकडी फळ्या किंवा पोलादी पत्रे टाकून तात्पुरते आधार निर्माण करतात. या प्रकारच्या आधार पद्धतीच्या मांडणीमध्ये बेल्जियन, कॅनडियन, इटालियन व अमेरिकन असे उपप्रकार आहेत.
दुसऱ्या पद्धतीत लोखंडी कवचाच उपयोग करतात. यामध्ये एक पोलादी दंडगोलाकृती कवच असते (आ. ८). दंडगोलाच्या परिमितीवर बसविलेल्या अनेक उत्थापकांच्या (जॅकच्या) साहाय्याने हे कवच जमिनीमध्ये घुसवितात. जमीन फार भुसभुसीत, रेताड किंवा गाळयुक्त असल्यास कवचाची मुखाकडील बाजूसुद्धा पोलादी पट्ट्यांनी बंद करून तीत झडपा ठेवतात. कवचाच्या तोंडाशी वरील बाजू छताप्रमाणे पुढे काढलेली असते. टोकाला मातीमध्ये घुसण्यासाठी पाचरीच्या आकाराचे पात्याचे कडे लावलेले असते. मधल्या भागात पोलादी कड्याला आधार म्हणून तुळईची कडी आणि उभे व आडवे दार जोडलेले असते. सर्वांत मागील कड्यावर उत्थापकांना आधार मिळतो. उत्थापकाच्या साहाय्याने जेव्हा कवच पुढे ढकलले जाते तेव्हा कवचाने सारलेल्या मातीपैकी काही भाग तेवढा झडपांमधून कवचाच्या आत घेतात. कवच पुढे ढकलले गेले की, मागे मोकळ्या झालेल्या जागेत पोलादी किंवा बिडाचे किंवा पूर्वरचित काँक्रीटचे कमान-खंड वापरुन पक्के अस्तर बांधतात. कवचाच्या मागील बाजूची लांबी एवढी ठेवलेली असते की, उत्थापकाच्या साहाय्याने कवच पुढे ढकलले गेल्यावर सुद्धा कवचाचे पोलादी कडे अगोदर अस्तर कड्याच्या मागेच राहते. कवच जसजसे पुढे ढकलले जाते तसतसे आवरणाच्या मागील पोलादी कडे पुढे सरकते व त्यामुळे निर्माण झालेली पोकळी सिमेंट व पाणी यांच्या मिश्रणाने अथवा रेतीने भरुन काढावी लागते. कवच व अस्तर पद्धतीने बांधलेल्या बोगद्याला नंतर आतील बाजूने दुसरे काँक्रीटचे अस्तर दिले जाते. अशा प्रकारच्या बांधकामाच्या पद्धतीचा उपयोग कलकत्ता येथील जमिनीखालील नलिका रेल्वे बांधणीच्या काही भागात केला आहे.
पाणी असलेल्या व मऊ स्तरातील खोदाई : पाणी असलेल्या स्तरामधून बोगदा खणण्यासाठी संपीडित हवा पद्धतीचे कवच वापरावे लागते. जमिनीच्या स्तरामध्ये अथवा जमिनीवर असणाऱ्या पाण्याच्या पातळीपासून बोगद्याच्या तळावर पाण्याचा जेवढा दाब असेल त्यापेक्षा जास्त दाब असलेली हवा बोगद्यात सोडल्यास ती हवा त्या पाण्यास बोगद्यामधून दूर करु शकते, या तत्त्वाचा या पद्धतीत उपयोग करतात. सामान्यतः संपीडित हवा पद्धतीने खणावयाच्या बोगद्यात एक पोलादी कवचाची कामाची खोली असते (आ. ९). या खोलीचे बाहेरील दार बंद करून तिच्यामधील हवेचा दाब वाढविला असता बोगद्याच्या मुखाकडील टोकामधून पाणी निघून जाते. अशा रीतीने कोरड्या ठिकाणी काम करता येते. कामाच्या खोलीमधून माणसे अथवा खोदलेला माल बाहेर नेण्यासाठी तिच्यामागे आणखी एक स्वतंत्र खोली व दार असते. या खोलीला हवाबंद कोठी म्हणतात. कामाच्या खोलीची दारे बंद करून तिच्यामध्ये पुरेसा हवेचा दाब ठेवून माणसे आणि खोदलेला माल हवाबंद कोठीत आणतात. नंतर हवाबंद कोठीमधील दाब कमी करून कामगारांना बाहेर काढतात. अशा प्रकारची पद्धत वायवीय विहिरीतही वापरतात [⟶ पाया]. कामगार व खोदलेला माल बाहेर स्वतंत्रपणे नेण्याची व्यवस्था करावी लागते.
बोगदे बांधण्याच्या काही आधुनिक पद्धती : बोगद्याचा वापर अनेक कारणांसाठी होत असल्याने त्यामधील बांधकाम तंत्रात पुष्कळ सुधारणा होत असून नवनवीन तंत्रे वापरात येत आहेत. १९५० सालानंतर खाली दिलेल्या बोगदे बांधकामाच्या तंत्रांचा वापर अनेक ठिकाणी यशस्वी रीत्या केला गेला आहे.
परिभ्रमी खोदाई यंत्र : या प्रकारची यंत्रे १९६० पासून प्रचारात आहेत. मध्यम प्रतीच्या घट्ट दगडाच्या अथवा मातीच्या स्तरातून बोगदा घेण्यासाठी यांचा उपयोग होतो. यांतील तीक्ष्ण दात असलेले परिभ्रमी कर्तक एका शीर्षावर बसवून त्यांच्याद्वारा ६ ते ११ मी. व्यासाच्या बोगद्याची खोदाई एकाच वेळी होऊ शकते. आ.१० मध्ये अशा एका खोदाई यंत्राचे परिभ्रमी कर्तक शीर्ष दाखविले आहे. बोगद्याच्या तोंडाशी हे शीर्ष दाब देऊन बसवितात व मग यांत्रिक शक्तीवर काम करणाऱ्या परिभ्रमी कर्तकांद्वारा खोदाई केली जाते.
दाब देऊन नळ घुसविण्याची पद्धत : या पद्धतीत १.५ ते २.५ मी. अथवा अधिक व्यासाचे नळ त्यांच्या एका टोकास दाब देऊन मातीच्या स्तरामध्ये उत्थापकाद्वारा घुसवितात व नंतर त्यांमधील माती काढून घेतात अथवा नळाच्या तोंडाशी परिभ्रमी खोदाई यंत्र बसवून जसजशी खोदाई होईल तसतसे पूर्वनिर्मित काँक्रीटच्या नळाचे भाग (घटक) घुसवून बसवितात. अशा प्रकारची पद्धत शिकागो येथील मलवाहिन्यांकरिता वापरली होती (आ.११).
खोदाई-भराई पद्धत : विशेषतः शहरातील रस्त्याखालून रेल्वेच्या अथवा इतर वाहतुकीसाठी भुयारी मार्ग काढावयाचा असतो, त्यावेळी भुयारी मार्ग हा जमिनीखाली कमी खोलीवर असल्याने त्याच्या बांधकामासाठी प्रथम भुयारी मार्गाच्या आकारमानाप्रमाणे खुली खोदाई करतात. मग त्यामध्ये पूर्वनिर्मित अथवा बांधकामाच्या जागेवरच तयार केलेल्या घटकांचे बांधकाम करून त्यावर भराई करून रस्ता पूर्ववत करतात. कलकत्ता येथील नलिका रेल्वेसाठी व इंग्लंडमधील भुयारी मार्गासाठी या पद्धतीचा वापर केलेला आहे.
पाण्याखालील बोगदे : ज्या ठिकाणी पुष्कळ पाणी आहे अशा नदी अथवा समुद्राखालून बोगदा काढणे हे अतिशय कठीण काम आहे कारण अशा ठिकाणी बोगद्याच्या कामात पाणी झिरपून येत असल्याने काम करणे अवघड असते. अशा प्रकारच्या बोगद्याच्या बांधकामासाठी संपीडित हवायुक्त कवच वापरुन काम करणे शक्य असते. तसेच पुष्कळ वेळा पूर्वनिर्मित प्रबलित सिमेंट काँक्रीटचे बोगद्याचे खंड (तुकडे) तयार करून ते पाण्यावर तरंगवत ज्या ठिकाणी पाण्याखाली बोगदा बांधावयाचा असतो तेथपर्यंत नेतात. नंतर हे खंड हळूहळू पाण्याखाली उतरवितात व त्या ठिकाणी खोदाई करून योग्य तेथे बसवितात. (आ.१२).
बोगद्याचे अस्तर : बोगदा खणल्यावर आतील बाजूस कायमचा आधार देण्यासाठी मजबूत पदार्थाचे अस्तर बांधणे आवश्यक असते. भूपृष्ठांतर्गत दाबाचा समतोल बोगदा खणल्यामुळे बिघडतो व तो कायम ठेवण्यासाठी अस्तराची जरुरी असते. कठीण खडकात बोगदा पाडल्यामुळे येणारा दाब घेण्यास खडक समर्थ असतो परंतु खडकाचे हवा, पाणी इत्यादींच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी अस्तर आवश्यक असते. जलवाहक बोगद्याला आतून गुळगुळीत अस्तर दिल्यास घर्षणामुळे होणारा व्यय कमी होऊन पाणी नेण्यासाठी लागणारा बोगद्याचा आकार कमी होतो. अस्तरासाठी पूर्वी वीटकाम, दगडकाम, लोखंडी तुळ्या इत्यादींचा वापर होत असे. हल्ली बहुधा बांधकामाच्या जागेवरच तयार केलेले अथवा पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीटचे अस्तर वापरतात.
अस्तराची जाडी ठरविताना त्यावर येणाऱ्या भारप्रणालीचा विचार करावा लागतो. यामध्ये तीन प्रकारचे भार असतात : (अ) अधोगामी भार : यामध्ये बोगद्याच्या वर असलेल्या मातीचा अथवा खडकाचा आणि पाण्याचा अचल भार, बोगद्यावरील जमिनीवर आणि बोगद्यामधील वाहनांचा चल भार इत्यादींचा विचार होतो. (आ) आडवा भार : यात बोगद्याच्या बाजूजवळ असणाऱ्या मातीचा क्रियाशील व प्रतिसारी दाब, तसेच पाण्याचा दाब इ. भार येतात. पाण्याचा आडवा भार येऊ नये म्हणून पाण्याचा निचरा करण्यासाठी अस्तरात काही अंतरावर भोके ठेवतात. (इ) ऊर्ध्वगामी भार : यात अधोगामी भाराचा प्रतिक्रियात्मक भार, तसेच पाण्याचा भार इ. गोष्टींचा विचार करावा लागतो. या सर्व भारप्रणालींचे योग्य ते विश्लेषण करून बोगद्याच्या अस्तराची जाडी व त्यामध्ये लागणाऱ्या पोलादाची मांडणी ठरवितात.
चांगल्या खडकातील बोगद्यास सिमेंट, रेती व पाणी यांच्या मिश्रणाचा पातळसा थर (२० ते २५ मिमी. जाडीचा) देऊन बाह्य वातावरणाचा खडकावर होणारा अनिष्ट परिणाम टाळता येतो. हे मिश्रण संपीडित वायूवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने खडकाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने फेकले जाते व त्यामुळे ते खडकाला चिकटून बसते. स्वयं-आधारित खडकाच्या बाबतीत बोगदा खणल्यावर अस्तर हे काही कालानंतर केले तरी चालते परंतु ठिसूळ अथवा भुसभुशीत जमिनीच्या बाबतीत खोदाईनंतर ताबडतोब अस्तर करणे आवश्यक असते.
बोगद्यातील काँक्रीटचे अस्तर करण्यासाठी सामान्यत : अगोदर तळातील काँक्रीट करतात. मग त्यावर वरील भागाचा साचा उभारून बाजूचे व शेवटी छताचे काँक्रीटकाम करतात. बाजूचे व छताचे काँक्रीट घालण्यासाठी सामान्यतः रुळावर ढकलता येणारे साचे वापरतात. या साच्याचे भाग काँक्रीटकाम झाल्यावर दूर करण्यासाठी जरूर तेथे ताण व बिजागऱ्या आणि उच्चालक लावतात. बोगद्यातील काँक्रीटकाम अव्याहत चालू ठेवण्याच्या दृष्टीने नुकत्याच केलेल्या काँक्रीटच्या साच्यातून मागील बाजूचा साचा नेऊन पुढे बसवता आला, तर फार सोयीचे होते. यासाठी एकमेकांत सरकणारे साचे वापरतात. बोगद्यातील काँक्रीटकाम संपीडित वायू पद्धतीने काँक्रीट प्रस्थापक वापरून किंवा पंपाच्या साहाय्याने करतात. बोगद्यामधील जागा मर्यादित असल्याने काँक्रीट बाहेर तयार करून ते मालमोटारीतून किंवा रुळावरील गाड्यातून नेणे सोयीचे असते. अस्तरामध्ये कोठेही पोकळी राहू नये यासाठी काँक्रीट कंपित्राच्या (कंप पावणाऱ्या साधनाच्या) साहाय्याने ठासले जाते [⟶ काँक्रीट]. काँक्रीटची पहाणी करण्यासाठी साच्यामध्ये जरूरीप्रमाणे लहान दरवाजे ठेवलेले असतात. आ. १३ मध्ये बोगद्यासाठी काँक्रीट अस्तर घालताना वापरण्यात येत असलेली यंत्रणा दाखविली आहे. काँक्रीटचे अस्तर व खडकाचा पृष्ठभाग यांमधील पोकळी, तसेच पोलादी कवच व काँक्रीट यांमधील पोकळी बुजविण्यासाठी अस्तरात योग्य त्या ठिकाणी भोके पाडून त्यांमधून सिमेंट व पाणी यांच्या मिश्रणाची पंपाच्या साहाय्याने आवश्यक त्या दाबाखाली गाराभराई करतात. खडकात भोके खोलवर नेऊन त्यामधील भेगा बुजविण्यासाठीही याचा उपयोग होतो.
महत्त्वाचे बोगदे : बोगद्यांचा उपयोग विविध कारणांसाठी होत असल्याने त्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील काही महत्त्वाच्या व विविध कारणांकरिता वापरात असलेल्या बोगद्यांची माहिती खालील कोष्टकात दिली आहे.
जगातील काही महत्त्वाचे बोगदे
बोगद्याचे नाव देश लांबी (किमी.)
———————————————————————
रेल्वेकरिता
सीकान जपान ५४.१
चॅनल ब्रिटन-फ्रान्स ५१.५
सिंप्लॉन स्वित्झर्लंड-इटली १९.२
कानमोन जपान १८.६
ॲपेनाइन्स इटली १८.५
सेंट गॉथर्ड स्वित्झर्लंड १५.०
लचबेर्ख स्वित्झर्लंड १४.५
होकूरिकू जपान १३.९
माँ सनी फ्रान्स-इटली १३.७
शिन-शिमीझन जपान १३.५
कॅस्केड अमेरिका १२.६
————————————————————————————–
बोगद्याचे नाव देश लांबी (किमी.)
———————————————————————————————
रस्त्याकरिता
सेंट गॉथर्ड स्वित्झर्लंड १७.०
फ्रेझ्यूस फ्रान्स-इटली १२.७
माँ ब्लाँ फ्रान्स-इटली ११.७
सान बेर्नार्दिनो स्वित्झर्लंड ६.६
ग्रेट सेंट बर्नार्ड स्वित्झर्लंड ५.८
ट्रान्सबे अमेरिका ५.८
फेल्बर-टाउअर्न ऑस्ट्रिया ५.१
कानमोन जपान ३.४
मर्सी ब्रिटन (इंग्लंड) ३.२
हँबर्ग जर्मनी ३.२
पाणीपुरवठा
डेलावेअर अमेरिका (न्यूयार्क) १३६.०
पेस्क्येरिआ इटली ७८.४
कोस्ट रेंज अमेरिका (कॅलिफोर्निया) ४०.०
बोलँड फॉरेस्ट ब्रिटन (इंग्लंड) १६.३२
लर्मा मेक्सिको १४.४
मालवाहक
वेस्ट साइड इंटरसेप्टर सी अमेरिका (शिकागो) ३२.९६
मिनीॲपोलिस इंटरसेप्टर अमेरिका २४.३२
साउथ साइड इंटरसेप्टर अमेरिका (शिकागो) २१.४४
डिट्रॉइट स्यूअर अमेरिका १६.००
फिलाडेल्फिया इंटरसेप्टर अमेरिका १४.४
जलविद्युत् प्रकल्प
बेन नेव्हिस ब्रिटन (स्कॉटलंड) २५.६
व्हिन्स्ट्रा नॉर्वे २४.०
एनक्युम्बेन-स्नोई ऑस्ट्रेलिया २४.०
वॉर्ड (फ्लोरेन्स सरोवर) अमेरिका (कॅलिफोर्निया) १८.६
सुन्डालसरा नॉर्वे १६.०
————————————————————————————
भारतातील महत्त्वाचे बोगदे : बोगद्याचे बांधकाम अतिशय खर्चाचे असल्याने सर्वसाधारणपणे अतिशय आवश्यकता असल्याखेरीज बोगद्याची कामे भारतात आतापर्यंत कमी प्रमाणात झालेली आहेत. मुख्यतः भारतातील अनेक जलविद्युत् प्रकल्पांवर जरूरीनुसार कमी अधिक लांबीचे एक अथवा अधिक बोगदे बांधून त्यांद्वारा धरणामधील पाणी विद्युत् निर्मिती केंद्राकडे अथवा इतर ठिकाणी नेल्याचे आढळते. यांमध्ये महाराष्ट्रातील कोयना प्रकल्प, पेंच प्रकल्प व उत्तर भारतातील बियास व सतलज या नद्यांवरील प्रकल्प हे मुख्य होत. भारतातील रेल्वेमार्गावर लहानमोठ्या प्रमाणात बोगदे बांधून त्यांद्वारा रेल्वे वाहतुकीतील अंतर कमी करणे व ती अधिक सुरक्षित व कार्यक्षम करणे हे उद्देश त्यामध्ये आहेत. मुंबई-पुणे या मार्गावरील बोरघाटामध्ये साधारण २५ लहानमोठे बोगदे असून ते सु. १०० वर्षापूर्वी बांधले आहेत. या सर्व बोगद्यांची मिळून लांबी सु.१,२०० मी. असून त्यातील सर्वांत लांब बोगद्याची लांबी १३१ मी. आहे. बोर घाटामधील बांधण्यात येत असलेल्या तिसऱ्या रेल्वेमार्गावर १९८२ मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या बोगद्याची लांबी २,१५५ मी. असून तो भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वांत जास्त लांबीचा आहे. १९१३-१६ या काळात कल्याण व मुंबई यांच्या दरम्यान रेल्वेमार्गावर बांधलेल्या पारसीक बोगद्याची लांबी १,३७४ मी. आहे. याशिवाय राजस्थान व गुजरात या राज्यांमध्ये उदयपूर व हिंमतनगर या गावांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गावरसुद्धा काही बोगदे बांधलेले आहेत.
रस्त्यावरील वाहतुकीसाठी काश्मीरमध्ये जम्मू-श्रीनगर रस्त्यावर बनिहाल खिंडीत २,१५४ मी. उंचीवर बांधलेला जवाहर बोगदा प्रसिद्ध आहे. हा बोगदा दुहेरी असून त्यामुळे जम्मू-श्रीनगर हे अंतर ३५ किमी. ने कमी झाले आहे. यामुळे काश्मीरमध्ये हिवाळ्यातही वाहतूक चालू ठेवणे शक्य होते. पुणे-बंगलोर मार्गावरील कात्रज घाटातील बोगदा हाही याच प्रकारामधील होय.
मुंबईला होणारा पाणीपुरवठा हा अनेक दूरच्या ठिकाणांहून होतो. तानसा तलावातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर १८८८ साली लहान प्रमाणात बोगद्याचे काम केलेले होते. त्यानंतर १९५६ साली वैतरणा तलावातून मुंबईला केलेल्या पाणीपुरवठाच्या नळाकरीता भातसा येथे आणखी एक बोगदा बांधला आहे. भांडूप येथील जलशुद्धीकरण क्षेत्राजवळ आणखी एक बोगदा १९८० साली बांधण्यात आला.
महाराष्ट्रामधील कोयना जलविद्युत् प्रकल्पामध्ये जलसंचयातील पाणी पश्चिम घाटी वीज उत्पादनासाठी ३,६९० मी. लांबीच्या बोगद्यात सोडण्याची व्यवस्था केली आहे. हा बोगदा ६.३ मी. व्यासाचा असून त्याचा दोन्ही टोकांना काही लांबीपर्यंत तो काँक्रीटने बांधून काढलेला आहे. या बोगद्याच्या पुढे चार दिशांना चार बोगदे निघतात ते कोयनेच्या पाण्याला विद्युत् केंद्राकडे जाणाऱ्या चार मोठ्या नळांच्या मुखापर्यंत नेले आहेत. विद्युत् निर्मिती केंद्रामध्ये वापरलेले पाणी वाहून नेऊन ते वाशिष्ठी नदीला पोहोचते करण्याचे कार्य एका अर्धवर्तुळाकृती बोगद्याद्वारा केले आहे.
महाराष्ट्रातील पेंच जलविद्युत् प्रकल्पामध्ये नागपूरजवळ पेंच नदीच्या तीरावर जमिनीखाली १३० मी. खोलीवर बांधलेला बोगदा हा ८ किमी. लांबीचा आहे. जलाशयातील पाण्याने भुयारी विद्युत् केंद्रातील जनित्रात विद्युत् निर्मिती झाल्यावर ते पाणी वाहून नेऊन पुनश्च खाली नदीत सोडणे हा या बोगद्याचा मूळ उद्देश आहे. बोगद्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून त्याचे क्षेत्रफळ ६३.४७ चौ. मी असून त्यास आतून ५० सेंमी. जाडीचे काँक्रीटचे अस्तर लावले आहे. या बोगद्याची वहनक्षमता १२० घ.मी. एवढी असून या बोगद्याचा खर्च सु. १४ कोटी रु. होईल असा अंदाज आहे.
कर्नाटक राज्यात तुंगभद्रा नदीवर होस्पेट येथे बांधलेल्या धरणामधून काढलेला कालवा हा पहिल्या काही किमी. लांबीमध्ये अत्यंत खडकाळ, डोंगराळ अशा भागातून जातो व पुढे विद्युत् निर्मिती केंद्रास मिळतो. कालव्याकरिता डोंगराच्या अभेद्य भिंतीला १,०६७ मी. लांबीचा बोगदा पाडण्यात आलेला आहे, याला ‘पापैया बोगदा’ असे म्हणतात. हा बोगदा संपूर्णतया सिमेंट काँक्रीटने बांधून काढला आहे.
कर्नाटक राज्यात शरावती नदीवर लिंगनमक्की या गावाजवळ तीन ठिकाणी धरणे बांधून विद्युत् केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन बोगदे खणलेले आहेत. हे बोगदे प्रत्येकी १,००० मी. लांबीचे असून त्यांचा व्यास ६.६ मी एवढा आहे. या बोगद्यांना संपूर्णतया सिमेंट काँक्रीटचे अस्तर केलेले असून जेथे डोंगर भुसभुशीत आहे तेथे काँक्रीटची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) देऊन त्याला मजबूत बनविण्यात आले आहे.
तमिळनाडू राज्यात कुंढा व अप्पर भवानी या कावेरीच्या उपनद्यांवर बांधलेल्या प्रकल्पामध्ये अनेक धरणे व साठवणी बंधारे असून ते पाणी डोंगराच्या कुशी फोडून तयार केलेल्या अनेक बोगद्यांवाटे एकत्र करून एक मोठा जलाशय निर्माण केलेला असून त्याद्वारे जलप्रवाहाचे नियंत्रण, सिंचाई व विद्युत् निर्मिती असा उपयोग केला आहे.
पंजाब राज्यात बांधण्यात आलेल्या बियास-सतलज प्रकल्पावर बियास नदीमधून सतलज नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी दोन बोगद्यांचा वापर केला आहे. यांपैकी पोंढ बागी बोगदा हा ७.६२ मी. व्यासाचा असून त्याची लांबी १३.१७ किमी आहे व दुसरा सुंदरनगर-सतलज बोगदा ८.५३ मी. व्यासाचा असून त्याची लांबी १२.३१ किमी. आहे. वरील दोन्ही बोगद्यांना सिमेंट काँक्रीटचे अस्तर केलेले आहे.
पहा : पाया.
संदर्भ : 1. Boardman, F.W.Tunnels New York, 1960.
2. Dean, F. E. Tunnels and Tunnelling. London, 1962.
3. Hammond, R. Tunnel Engineering, New York, 1959.
4. Pequignot. C. A., Ed. Tunnels and Tunnelling, London, 1963.
5. Richardson, H. W. Mayo. R. S. Practical Tunnel Driving, New York, 1941.
6. Sandstrom, G. E. Tunnels, New York, 1963.
7. Saxena, S. Tunnelling, Delhi, 1971.
8. Szechy. K. Trans. Szechy. D. and others, The Art of Tunnelling, Budapest, 1966.कापरे, भा. श्री. पाटणकर, मा. वि.