बेनी नदी : द. अमेरिकेच्या बोलिव्हिया देशातील प्रमुख उत्तर वाहिनी नदी. लांबी १,६०० किमी. अँडीज पर्वताच्या रेआल या पूर्वेकडील पर्वतश्रेणीत उगम पावणाऱ्या बोपी व सांता एलेना या दोन नद्यांचा वाची येथे होणाऱ्या संगमानंतरचा प्रवाह ‘बेनी’ या नावाने ओळखला जातो. अनेक लहानलहान नद्या बेनी नदीस येऊन मिळतात. प्रथम यूंग्गास या अरण्यमय प्रदेशातून व पुढे मैदानी प्रदेशातून वाहत गेल्यानंतर रीव्हेराल्टा येथे तिला माद्रे दे द्योस ही नदी येऊन मिळते. पुढे ब्राझील-बोलिव्हिया सरहद्दीवर व्हीला वेया येथे बेनी नदीला मामोरे नदी मिळाल्यानंतर हा संयुक्त प्रवाह ‘मादेरा’ नावाने ओळखला जातो. ब्राझील-बोलिव्हिया सरहद्दीवरून उत्तरेस काही अंतर वाहत मादेरा नदी ब्राझालमध्ये प्रवेश करते व नंतर ती ॲमेझॉन नदीला मिळते.
बेनी नदीला येऊन मिळणाऱ्या बहुतेक उपनद्या पश्चिमेकडून येतात. काका, ट्वीची, माडीडी, ऑर्टोन ह्या त्यांपैकी काही प्रमुख उपनद्या होत. डिसेंबर ते मे या काळात नदीप्रवाहातील पाण्याची पातळी वाढते व काही भागात तिचा जलवाहतुकीसाठी उपयोग होतो. बेनी नदीखोऱ्यातील दाट अरण्यांत रबर व सिंकोनाची झाडे आढळतात.
चौधरी, वसंत