बेडन-पॉवेल : (२२ फेब्रुवारी १८५७-? जानेवारी १९४१). जगभर पसरलेल्या बालवीर (स्काऊट व गाइड) संघटनेचे
जनक. संपूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्सन स्मिथ बेडन-पॉवेल. जन्म लंडन येथे. वडील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. आई इंग्लंडचे दर्यासारंग डब्ल्यू. टी. स्मिथ यांची मुलगी. बेडन-पॉवेल तीन वर्षांचे असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आईनेच त्यांचा सांभाळ केला. लंडनमधील चार्टर हाऊस ह्या शाळेत शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी शिक्षण घेतले.
त्यांना १८७६ मध्ये लष्करात तेराव्या हुस्सार पलटणीत कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी भारत, अफगाणिस्तान, द. आफ्रिका अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली. त्यांपैकी दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात (१८९९-१९०२) मॅफेकिंग ह्या शहराची शत्रूच्या वेढ्यापासून केलेली मुक्तता ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी होय. त्यानंतर त्यांना मेजर जनरल म्हणून बढती मिळाली. दक्षिण आफ्रिकेतील पोलीस दलाला त्यांनी व्यवस्थित स्वरूप दिले व या दलाचे इन्स्पेक्टर जनरल म्हणून १९०३ पर्यंत कामही केले. १९०७ मध्ये ते लेफ्टनंट जनरल झाले.
सैनिकी स्काऊटकरिता त्यांनी लिहिलेले एड्सटू स्काऊटिंग (१८९९) हे पुस्तक शाळेतील मुलांसाठीही अतिशय उपयुक्त असल्याचे लक्षात येताच, त्यांनी इंग्लंडच्या ब्राउनसी बेटावर मुलांचे पहिले स्काऊट-शिक्षण शिबीर भरविले (१९०७) व अशा प्रकारे बालवीर संघटनेची चळवळ सुरू केली. थोड्याच दिवसात ही चळवळ अनेक देशांत पसरली. १९१० मध्ये आपली बहिण ॲग्नेस बेडन पॉवेल हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ (गर्ल गाइड) ही संघटना स्थापन केली. मुलांना व मुलींना जगाचे आदर्श नागरीक बनविणे, हा या दोन्ही संघटनांमागील त्यांचा प्रमुख हेतू होता. १९१० साली सातव्या एडवर्डच्या सल्ल्यानुसार ते सेवानिवृत्त झाले व पुढील सर्व आयुष्य त्यांनी बालवीर संघटनेसाठी वाहून घेतले. १९१२ मध्ये ओलेव्ह सोम्स यांच्याशी त्यांचा विवाह झाला व तेव्हापासून वीरबाला संघटनेची सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी बेडन पॉवेल (१८८९-१९७७)- स्वीकारली. १९१२-१३ पर्यंत बालवीर व वीरबाला या संघटनांची पथके बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया, हवाई बेटे इ. राष्ट्रांमध्ये सुरू झाली. जगभर पसरलेल्या ह्या संघटनांची पाहणी करण्यासाठी बेडन-पॉवेल व त्यांच्या पत्नी यांनी सर्व राष्ट्रांना वेळोवेळी भेटी दिल्या. भारतास ह्या दोघांनी १९२१ व १९३७ मध्ये भेट दिली.
लंडन येथे १९२० मध्ये भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्काऊट मेळाव्याच्या (जांबोरीच्या) वेळी ‘जगाचे प्रमुख स्काऊट’ (चिफ स्काऊट) हा बहुमान त्यांना सर्वानुमते मिळाला. १९२२ मध्ये ‘बॅरोनेट’ व १९२९ मध्ये ‘फर्स्ट बॅरन बेडन-पॉवेल ऑफ गिलवेल’ (गिलवेल हे इंग्लंडमधील बालवीर शिक्षणाचे जागतिक केंद्र आहे) होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल १९३९ मध्ये त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी सुचवले होते परंतु दुसऱ्या जागतिक युद्धामुळे ते दिले गेले नाही.
बेडन-पॉवेल यांनी आपल्या आईला लिहिलेली २,००० हून अधिक पत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. त्यांची काही चित्रे व कलाकृती इंग्लंडमध्ये ‘गिलवेल पार्क’ ह्या शिक्षण केंद्रात जतन केलेल्या आहेत. केन्यामधील न्येरी येथे त्यांचे निधन झाले.बेडन-पॉवेल यांची उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे : स्काऊटिंग फॉर बॉईज (१९०८), माय ॲडव्हेंर्चस ॲज अ स्पाय (१९१५), गर्ल गाइडिंग (१९१७), व्हॉट स्काऊट्स कॅन डू (१९२१), स्काऊटिंग अँड यूथ मुव्हमेंटस् (१९२९), लेसन्स ऑफ अ लाइफ टाइम (आत्मचरित्र – १९३३), आफ्रिकन ॲडव्हेंचर्स (१९३६), पॅडल युवर ओन कॅगो (१९३९).
संदर्भ : 1. Reynolds, E. E. Baden-Powell : A Biography of Lord Baden-Powell of Gitwell, Oxford, 1957.
2. Wade, E. K. 27 Years with Baden – Powell, London, 1957.
“