बेकायदा जमाव:(अन्लॉफुल ॲसेंब्ली). सामान्यपणे सार्वजनिक शांततेचा भंग होईल या हेतूने कृती करण्यास उद्युक्त झालेला पाच अगर अधिक व्य‌क्तींचा जमाव म्हणजे ‘बेकायदा जमाव’ होय. बेकायदा जमावासंबंधीची कायदेशीर तरतूद भारतीय दंड संहितेच्या आठव्या प्रकरणातील १४१ ते १५८ या कलमांन्वये केलेली आहे. कलम १४१ अन्वये पाच अगर जास्त व्यक्तींचा जमाव असला व त्यांचा उद्देश खालीलपैकी कोणताही असला, तर तो बेकायदा जमाव होय : (१) बळजोरीचा उपयोग करून किंवा तसे करणार असे भासवून केंद्र सरकार, घटक राज्य सरकार, लोकसभा, विधानसभा वा विधान परिषद अथवा आपले कर्तव्य बजावीत असलेला लोकसेवक यांवर दडपण आणणे अगर त्यांच्या कार्यात अटकाव करणे. (२) कायद्याच्या अंमलबजावणीस प्रतिबंध करणे. (३) मालमत्ततेची नासधूस, अनाधिकाराने अतिक्रमण अथवा इतर कोणताही गुन्हा. (४) दडपशाहीने मालमत्ता बळकावणे किंवा ताब्यात घेणे किंवा एखाद्या व्यक्तीचा जाण्यायेण्याचा हक्क अथवा पाणी मिळविण्याचा अमूर्त हक्क अथवा अशा तऱ्हेचे हक्क हिरावून घेणे. (५) दडपशाहीने एखाद्या माणसास कोणतेही कृत्य करावयास अथवा न करावयास भाग पाडणे.

चांगल्या उद्देशाने जमलेला जमाव नंतर बेकायदा जमाव होऊ शकतो. ज्या क्षणी वरील पाच बाबींपैकी कोणताही उद्देश जमाव आत्मसात करील, त्या क्षणी तो बेकायदा जमाव होईल. बेकायदा जमाव आहे, हे समजून त्या जमावाचा घटक बनणे अगर जमाव बेकायदा झाल्यावर त्या जमावात राहणे हासुद्धा गुन्हा होय (कलम १४२).

बेकायदा जमावाचा घटक असणे या गुन्ह्यात कमाल ६ महिने कैद अगर दंड किंवा दोन्ही शिक्षा आहेत (कलम १४३) तसेच एखादी व्यक्ती प्राणघातक हत्यारांनी सज्ज असेल व अशा स्थितीत ती बेकायदा जमावाचा घटक असेल, तर त्यासाठी कमाल शिक्षा दोन वर्षे अगर दंड किंवा दोन्ही शिक्षा फर्माविण्याची तरतूद आहे (कलम १४४). बेकायदा जमावास हटविण्याचा कायदेशीर हुकूम दिल्याचे माहीत असूनही, जो घटक बेकायदा जमावात राहील त्याला किमान दोन वर्षे अगर/आणि दंड अशी सजा आहे (कलम १४५). बेकायदा जमावाच्या कोणत्याही घटकाने जमावाच्या उद्देशपूर्तीसाठी गुन्हा केला, तर त्याबद्दल जमावातील प्रत्येक घटक सारखाच जबाबदार राहतो (कलम १४९).

बेकायदा जमावाने अगर त्यातील एखाद्या घटकाने जमावाच्या उद्देशपूर्तीसाठी बळाचा वापर किंवा हिंसेचा अवलंब केल्यास त्यास ⇨ दंगा (रायट) असे म्हणतात (कलम १४६). या गुन्ह्यासाठी कमाल २ वर्षे कैद अथवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. (कलम १४७).

कवळेकर, सुशील.