बुद्धदत्त : (इ. स. चे पाचवे शतक). बौद्ध भिक्षू आणि पाली अट्ठकथाकार. हा उरगपूरचा (विद्यमान उरैयूर. हे तिरुचिरापल्लीजवळ आहे.) रहिवासी. बौद्ध भिक्षू व पाली अट्ठकथाकार बुद्धघोष ह्याचा बुद्धदत्त हा समकालीन असला, तरी त्याच्याहून वयाने मोठा होता. बुद्धघोष हा सिंहलद्वीपास जात असताना आणि बुद्धदत्त तेथून परत येत असताना वाटेत ह्या दोघांची भेट झाली, असे बुद्धघोसुप्पत्ती ह्या ग्रंथात म्हटले आहे. बुद्धवंस ह्या ग्रंथावरील मधुरत्थविलासिनी नामक अट्ठकथा बुद्धदत्ताने लिहिलेली आहे. विनय-विनिच्छय, उत्तर-विनिच्छय, अभिधम्मावतार आणि रूपारूपविभाग हे बुद्धदत्ताचे अन्य ग्रंथ होत. ह्या छोटेखानी आणि पद्यमय ग्रंथांपैकी पहिले दोन विनयपिटकावर असून नंतरचे दोन अभिधम्मपिटकावर आहेत. अभिधम्मपिटकावरील दोन ग्रंथांत मधूनमधून गद्यटीका आहे. जिनालंकार नावाचा एक ग्रंथही बुद्धदत्ताच्या नावाशी निगडित केला जातो. तथापि हा जिनालंकार आणि इ. स. च्या बाराव्या शतकात लिहिला गेलेला जिनालंकार हे दोन ग्रंथ अर्थातच वेगवेगळे आहेत.
पहा : अट्ठकथा विनयपिटक.
बापट, पु. वि.