बॉलॉशशॉ, बालिंत : (२० ऑक्टोबर १५५४ – ३० मे १५९४). सोळाव्या शतकातील श्रेष्ठ हंगेरियन भावकवी. झॉलेम (हंगेरी) येथे एका श्रीमंत कुटुंबात जन्मला. काव्यलेखन तर त्याने केलेच, परंतु शूर वीराचे साहसी, आक्रमक जीवन तो जगला.
आरंभी त्याची कविता सांकेतिक स्वरूपाची होती तथापि लवकरच त्याचा स्वतंत्र सूर त्याला गवसला. प्रेम, निसर्ग आणि लढाया हे त्याच्या कवितांचे प्रमुख विषय. आरंभी प्रॉटेस्टंट असलेला हा कवी. पुढे कॅथलिक झाल्यानंतर उत्कट आध्यात्मिकतेने भारलेली धार्मिक कविताही त्याने लिहिली. कवितेचे नवे छंदही त्याने निर्माण केले व पुढील कवींनी त्यांचा वापर केला. एस्टेरगॉम येथे झालेल्या एका लढाईत तो निधन पावला.