बॉइल, रॉबर्ट : (२५ जानेवारी १६२७ – ३० डिसेंबर १६९१). ब्रिटिश भौतिकीविज्ञ व रसायनशास्त्रज्ञ. वायूंच्या गुणधर्मांसंबंधीच्या आद्य प्रयोगांकरिता व रासायनिक मूलद्रव्यांच्या आधुनिक सिद्धांताचे पूर्वरूप म्हणून समजण्यात येणाऱ्या द्रव्याचा कणपुंजरुप दृष्टिकोन मांडल्याबद्दल ते विशेष प्रसिद्ध आहेत. आधुनिक रसायनशास्त्राचे एक जनक म्हणूनही कित्येक जण त्यांना मानतात.

बॉइल यांचा जन्म आयर्लंडमधील लिझमॉर येथे झाला. १६३५ मध्ये त्यांना ईटन येथे शिक्षणासाठी पाठविण्यात आले परंतु नंतर १६३९ – ४४ या काळात त्यांनी युरोपात जिनीव्हा व फ्लॉरेन्स येथे खाजगी रीत्या शिक्षण घेतले. त्या वेळी गॅलिलिओ यांच्या कार्याच्या वाचनाद्वारे नवीन विज्ञानाचा त्यांना परिचय झाला. १६४४ मध्ये त्यांचे वडील निवर्तल्यामुळे ते इंग्लंडमध्ये परत आले. १६४५ – ५५ या काळात बहुंतांशी डॉरसेट येथे राहिले व तेथे त्यांनी लिहिलेले काही निबंध ऑकेजनल रिफ्लेक्शन्स अपॉन सेव्हरल सबजेक्ट्‌स या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध झाले. नंतर १६५६ – ६८ या काळात त्यांनी ऑक्सफर्ड येथे वास्तव्य केले. ओटो फोन गेरिक या जर्मन भौतिकीविज्ञांच्या हवेच्या पंपासंबंधी माहिती कळल्यावर १६५९ मध्ये त्यांनी रॉबर्ट हुक यांच्या मदतीने गैरिक यांच्या पंपात सुधारणा करून हवेच्या गुणधर्मांसंबंधी अनेक मूलभूत प्रयोग केले या प्रयोगांद्वारे त्यांनी हवेचे भौतिक गुणधर्म तसेच ज्वलनाला, सजीवांच्या श्वसनक्रियेला व ध्वनीच्या प्रेषणाला हवेची आवश्यकता असते, असे दाखवून दिले. या प्रयोगासंबंधीची माहिती त्यांनी १६६० मध्ये ग्रंथरुपाने प्रसिद्ध केली. या ग्रंथावरील टीकेला उत्तर देण्यासाठी या ग्रंथाच्या १६६२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी ‘वायूचे तापमान व द्रव्यमान कायम असताना वायूचे घनफळ त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते’, हा त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा सुप्रसिद्ध नियम मांडला. या नियमाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी हवेचे कण सूक्ष्म वेटोळ्याच्या स्प्रिंगांप्रमाणे वागतात, अशी कल्पना मांडली होती. हा नियम एद्म मॉऱ्यॉत या फ्रेंच शास्त्रज्ञांनीही १६७६ मध्ये शोधून काढला व त्यामूळे यूरोपात तो ‘मॉऱ्यॉत नियम’ या नावाने ओळखला जातो. बॉइल यांनी गोठणाऱ्या पाण्याची प्रसरणशक्ती, विशिष्ट गुरुत्व, स्फटिक, विद्युत्‌, रंग इ. भौतिकीतील विषयांवरही संशोधन केले होते.

स्केप्टिकल केमिस्ट (१६६१) या आपल्या ग्रंथात त्यांनी ॲरिस्टॉटल यांचा चार मूलतत्त्वांचा (पृथ्वी, हवा, अग्नी व पाणी) सिद्धांत व पॅरासेल्सस यांचा तीन तत्त्वांचा (मीठ, गंधक प पारा) सिद्धांत यांचे खंडन केले. त्यांऐवजी त्यांनी प्राथमिक कण व त्यांच्या संयोगातून तयार होणारे कणपुंज (कॉरप्युस्कल) ही संकल्पना मांडली. प्राथमिक द्रव्यांची (कणांची) संख्या, स्थान व गती यांमुळे निरनिराळे पदार्थ तयार होतात, असे त्यांनी प्रतिपादन केले. सर्व नैसर्गिक आविष्कारांचे ॲरिस्टॉटल यांच्या मूलतत्त्वांच्या व गुणधर्मांच्या संकल्पनांच्या रूपात स्पष्टीकरण करता येत नाही तर प्राथमिक कणांची गती व त्यांचे संघनन यांच्या द्वारे करता येते, असे बॉइल यांचे मत होते. अशा प्रकारे त्यांनी पुढील एकोणिसाव्या शतकातील दृष्टिकोनाप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या प्राथमिक मूलद्रव्यांचे अस्तित्व गृहीत धरलेले नव्हते पण त्यांच्या संकल्पना काही विशिष्ट मर्यादेपर्यंत सत्य आहेत, असे दिसून येते. १६६८ पासून ते लंडन येथे आपल्या बहिणीकडे राहू लागले व तेथेही खाजगी प्रयोगशाळा स्थापन करून आपले संशोधन कार्य निरनिराळ्या साहाय्यकांच्या मदतीने त्यांनी चालू ठेवले. त्यांनी धातूंच्या भस्मीकरणाचा अभ्यास केला तसेच अम्ले व क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारे पदार्थ) यांतील फरक शोधून काढण्यासाठी साध्या वनस्पतिजन्य रसांचा उपयोग केला आणि यातूनच पुढे रासायनिक ⇨ दर्शकांचा या कामी होणारा उपयोग प्रचारात आला.

बॉइल यांची ख्रिस्ती धर्मावर नितांत श्रद्धा होती व ख्रिस्ती धर्ममतांचा परदेशी प्रसार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतातील ख्रिस्ती मिशनांना त्यांनी सढळ आर्थिक मदत केली. प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हिब्रू, ग्रीक व सिरियाक या भाषा आत्मसात केल्या होत्या. नव्या कराराचे आयरिश व तुर्की या भाषांत भाषांतर करण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. निसर्ग हा ईश्वराने निर्माण केलेल्या व गती दिलेल्या एखाद्या घड्याळ यंत्रणेप्रमाणे असून तो आता दुय्यम नियमांनुसार कार्य करीत आहे आणि त्याचा अभ्यास विज्ञानाद्वारेच करता येईल, असा त्यांचा विश्वास होता. ‘ख्रिस्ती धर्म व वैज्ञानिक संशोधन यांतील सुसंगतता’ या विषयावर वार्षिक व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी त्यांनी आपल्या मृत्युपत्रात तरतूद करून ठेवली होती. निसर्गाचा वैज्ञानिक अभ्यास हे एक धार्मिक कर्तव्य म्हणून करावे असे मत त्यांनी १६९० मध्ये प्रसिद्ध झालेल्या व ख्रिश्चन व्हर्च्युओसो या ग्रंथाद्वारे मांडले. ऑक्सफर्ड येथे असताना ते तेथील एका अनौपचारिक वैज्ञानिक व तत्त्वज्ञानी गटाचे सदस्य होते आणि हा गट पुढे लंडन येथे १६६३ मध्ये स्थापन झालेल्या रॉयल सोसायटी या सुप्रसिद्ध संस्थेचा केंद्रबिंदू ठरला. १६८० मध्ये बॉइल यांना या संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते परंतु शपथ घेण्याच्या प्रश्नावरून त्यांनी हा बहुमान नाकारला. त्यांचे शास्त्रीय कार्य टॉमस बर्च यांनी ५ खंडात १७४४ मध्ये प्रसिद्ध केले. ते लंडन येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.