बार्क्ला, चार्ल्स ग्लव्हर : (७ जून १८७७–२३ ऑक्टोबर १९४४). इंग्रज भौतिकीविज्ञ. मूलद्रव्यांच्या वैशिष्ट्यदर्शक राँटगेन प्रारणाच्या (क्ष-प्रारणाच्या-तरंगरूपी ऊर्जेच्या) शोधाबद्दल बार्क्ला यांना १९१७ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

त्यांचा जन्म वाइडनेस (लँकाशर) येथे झाला. त्यांचे शिक्षण लिव्हरपूल येथील युनिव्हर्सिटी कॉलेज आणि केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेज व किंग्ज कॉलेज येथे झाले. १८९८ मध्ये भौतिकीची बी. एस्.सी. व पुढील वर्षी एम्. एस्.सी. पदवी त्यांनी मिळविली. १९०४ मध्ये त्यांनी  लिव्हरपूल विद्यापीठाची डी. एस् सी ही पदवीही मिळविली. १९०५ -०९ या काळात त्याच विद्यापीठात त्यांनी क्रमाक्रमाने प्रयोग निर्देशक, भौतिकीचे साहाय्यक प्राध्यापक व प्रगत विद्युत् शास्त्राचे विशेष अध्यापक म्हणून काम केले. १९०९ साली ते लंडन विद्यापीठात भौतिकीचे व्हीट्स्टन प्राध्यापक झाले. नंतर १९१३ मध्ये त्यांनी एडिंबरो विद्यापीठातील भौतिकीचे अध्यापन स्वीकारले आणि तेथेच मृत्यूपावेतो काम केले.

 प्रथमतः त्यांनी तारेतील विद्युत् तरंगांच्या वेगासंबंधी संशोधन केले पण १९०२ साली त्यांनी क्ष-प्रारणासंबंधी संशोधन करण्यास प्रारंभ केला व त्यानंतरचे त्यांचे बहुतांश आयुष्य या संशोधनानेच व्यापले. मूलद्रव्यांच्या एकजिनसी प्रारण वैशिष्ट्याच्या त्यांच्या शोधामुळे या मूलद्रव्यांचे वैशिष्ट्यदर्शक क्ष-किरण रेषीय वर्णपट असतात, असे दिसून आले. क्ष-किरण एखाद्या पदार्थावर पडले असता त्यातील आणवीय इलेक्ट्रॉनांमुळे या किरणांचे विचलन होते व यामुळे होणारे द्वितीयक उत्सर्जन दोन प्रकारचे असते, असे त्यांनीच प्रथम दाखविले. यांपैकी एक म्हणजे न बदलता प्रकीर्णित होणारे (विखुरले जाणारे) क्ष-किरण आणि दुसरे म्हणजे विवक्षित पदार्थाचे वैशिष्ट्य असलेले असे अनुस्फुरक प्रारण (मूळ विद्युत् चुंबकीय प्रारण-येथे क्ष-किरण पदार्थावर पडत असेपर्यंत त्या पदार्थापासून उत्सर्जित होणारे व सामान्यतःदृश्य प्रकाशाच्या स्वरूपात असणारे प्रारण) होय. हवा व विविध वायूंवर प्रयोग करून प्रकीर्णित प्रारणाची तीव्रता वायूच्या अणुभारावर अवलंबून असते, असे त्यांनी दाखविले. क्ष-किरण प्रकीर्णनाचे तंत्र त्यानंतर आणवीय संरचनेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरले. १९०६ मध्ये बार्क्ला व सी. ए. सॅडलर यांनी कार्बनाच्या अणूतील इलेक्ट्रॉनांची संख्या अचूकपणे निश्चित करण्यासाठी क्ष-किरणांचा उपयोग केला व ही संख्या सहा आहे, असे दाखविले. याच सुमारास प्राथमिक क्ष-किरण शलाकेला लंब दिशेत प्रकीर्णित होणारे क्ष-किरण ध्रुवित झालेले (एकाच विशिष्ट प्रतलात कंपने होणारे) असतात. असा प्रयोगाद्वारे त्यांनी महत्वाचा शोध लावला. या शोधावरून क्ष-किरण हे सामान्य प्रकाशाशी मूलभूत लक्षणांच्या बाबतीत समरूप असून ते अवतरंग (ज्यांतील कंपने तरंग प्रसारणाच्या दिशेला लंब दिशेने होतात असे तरंग) आहेत व म्हणून दृश्य प्रकाशाप्रमाणेच विद्युत् चुंबकीय स्वरूपाचे असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला. क्ष-किरणांचे शोषण व त्यांची छायाचित्रण क्रिया यांविषयीच्या आजच्या ज्ञानात बार्क्ला यांचा महत्वाचा वाटा आहे. वैशिष्ट्यदर्शक क्ष-प्रारण व त्याबरोबरच उत्सर्जित होणारे कणरूप प्रारण यांतील संबंध त्यंनी आपल्या संशोधनाद्वारे निदर्शनास आणून दिला. क्ष-प्रारणाच्या संदर्भातील ⇨पुंज सिद्धांताची उपयुक्तता व त्याच्या मर्यादा त्यांनी दाखवून दिल्या.

 रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९१२ मध्ये त्यांची निवड झाली. १९१६ मध्ये सोसायटीचे बेकरीयन व्याख्याते म्हणून त्यांची नेमणूक झाली व पुढील वर्षी त्यांना सोसायटीच्या ह्यूझ पदकाचा बहुमान मिळाला. ते एडिंबरो येथे मृत्यू पावले.

पहा :  क्ष-किरण.

 भदे,व. ग.