बॅबिट्स मिहालय : (२६ नोव्हेंबर १८८३–४ ऑगस्ट १९४१). हंगेरियन कवी, कादंबरीकार आणि निबंधकार. सेकसार्ड, हंगेरी येथे जन्मला. बूडापेस्ट विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. तेथे हंगेरियन साहित्याचा, तसेच ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यकृतींचा त्याने अभ्यास केला. काही काळ त्याने माध्यमिक शिक्षकाची नोकरी केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात शांततावादी विचारांचा पुरस्कार केल्यामुळे त्याला नोकरी सोडावी लागली. त्यानंतरचे उर्वरित आयुष्य त्याने केवळ साहित्यसेवेलाच वाहून टाकले. Levelek Irisz koszorujabol (१९०९), Recitative (१९१६) आणि Sziget es tenger (१९२५) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय काव्यकृती. विख्यात हंगेरियन भावकवी ⇨एन्ड्रे ऑडी (१८७७–१९१९) ह्याच्या नंतरचा श्रेष्ठ कवी म्हणून बॅबिट्सला मान्यता मिळाली. तथापि बॅबिट्सच्या कवितेत भावनेपेक्षा बौद्धिकतेचा प्रत्यय विशेषत्वाने येतो ती काहीशा दुर्बोधही आहे. आपल्या कादंबऱ्‍यांतून बॅबिट्सने मनोविश्लेषणवादी तंत्राचा उपयोग केला. Halalfiai (१९२७, इं. शी. द चिल्ड्रन ऑफ डेथ) ह्या कादंबरीत त्याने ऱ्‍हासाला लागलेल्या मध्यम वर्गीयांचे सहानुभूतीपूर्ण चित्रण केले आहे. त्याने यूरोपीय साहित्याचा इतिहासही लिहिला. यूरोपिय संस्कृतीच्या एकात्मतेवर त्याची श्रद्धा होती. दान्तेकृत दिव्हीना कोम्मेदीआ (इं. शी. डिव्हाइन कॉमेडी), सॉफोक्लीझची नाटके, शेक्सपिअरचे टेंपेस्ट अशा श्रेष्ठ कलादृष्टीची प्रचीती येते. द वेस्ट ह्या हंगेरियन साहित्यविश्वातील महत्त्वपूर्ण नियतकालिकाचे संपादनही बॅबिट्सने काही काळ केले.

बूडापेस्ट येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.