मॉस्को विद्यापीठ: (मॉस्को मिखईल व्हस्यील्येव्ह्यिच लमनॉसॉव्ह स्टेट युनिव्हर्सिटी). सोव्हिएट रशियातील जुने व प्रख्यात विद्यापीठ. २६ एप्रिल १७५५ रोजी मॉस्को येथे स्थापना. प्रख्यात रशियन रसायनशास्त्रज्ञ ⇨ मि. व्ह. लमनॉसॉव्ह (१७११–६५) हे या विद्यापीठाचे संस्थापक असून त्यांचेच नाव विद्यापीठास दिलेले आहे. प्रसिद्ध रशियन साहित्यिक अलिक्सांद्र सिर्गेयेविच पुश्किन यांच्या शब्दात ‘लमनॉसॉव्ह स्वतःच एक विद्यापीठ होते.’
प्रारंभी विद्यापीठात तत्त्वज्ञान, विधी आणि वैद्यक हे केवळ तीनच विभाग होते. ३ जुलै १७५६ रोजी ग्रंथालय सुरू करण्यात आले. दहा प्राध्यापक व तीस विद्यार्थी एवढाच विद्यापीठाचा सुरुवातीचा पसारा होता. १८१२ च्या सप्टेंबरमधील प्रचंड आगीत विद्यापीठाची भयंकर हानी झाली प्रयोगशाळा, ग्रंथालयवादी इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. पुढे लवकरच विद्यापीठाची पुन्हा उभारणी करण्यात आली. १९४० मध्ये विद्यापीठास भरीव प्रगतीबद्दल ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ हा सेव्हिएट युनियनमधील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १५ मार्च १९४८ रोजी मॉस्को विद्यापीठ इमारतीसाठी लेनिन टेकडीवरील मोठी जागा देण्याचा सरकारने निर्णय घेतला. १९५२ मध्ये विद्यापीठाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. १ सप्टेंबर १९५३ रोजी विद्यापीठाचे नवीन वास्तूत स्थलांतर करण्यात आले. विद्यापीठाच्या विज्ञान शाखेची गगनचुंबी इमारत सदतीस मजली आहे.
यामिकी (मेकॅनिक्स) व गणित संगणन-गणित आणि संक्रातिविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान व भूविज्ञान, भूगोल, भूगर्भशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, विधी, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, वृत्तपत्रविद्या, प्राच्यविद्या व भाषा अध्यापन, अध्यापक-प्रशिक्षण इ. विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. तिसांहून अधिक भाषा विद्यापीठात शिकविल्या जातात. त्यांत संस्कृत, हिंदी, पंजाबी आदी भारतीय भाषांचाही अंतर्भाव होतो. भाषाशास्त्र विभागाला जोडूनच लोकसाहित्य विभाग आहे. विद्यापीठात पत्रद्वारा शिक्षण, विदेशी विद्यार्थ्यांसाठी पूर्वाध्ययन शाळा आणि शारीरिक शिक्षण आदींच्या सुविधा आहेत. १९८०–८१ मध्ये विद्यापीठात एकूण ८,००० अध्यापक आणि २८,००० विद्यार्थी होते. विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे ए. एम्. गॉर्की ग्रंथालय असे नाव असून त्यात ६६,२९,००० ग्रंथ (नियतकालिके अंतर्भूत) होते.
सावरकर, ज्योती