मॉसबावर, रूडोल्फ लूटव्हिख : (३१ जानेवारी १९२९ –). जर्मन भौतिकीविज्ञ. गॅमा किरणांच्या अनुस्पंदनी शोषणासंबंधीचे संशोधन व त्याद्वारे त्यांनी त्यांच्याच नावाने आता ओळखण्यात येणाऱ्या परिणामाचा [→ मॉसबावर परिणाम] लावलेला शोध याबद्दल त्यांना ⇨ रॉबर्ट होफस्टाटर यांच्याबरोबर १९६१ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला.
मॉसबावर यांचा जन्म म्यूनिक येथे झाला. त्यांनी म्यूनिक येथील तांत्रिक विद्यापीठातून १९५३ मध्ये पदवी, १९५५ मध्ये मास्टर पदवी व १९५८ मध्ये पीएच्. डी. पदवी संपादन केली. १९५५–५७ या काळात त्यांनी हायडल्बर्ग येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूमध्ये संशोधन साहाय्यक व १९५८–६० मध्ये म्यूनिक येथील तांत्रिक विद्यापीठात संशोधन अधिछात्र म्हणून काम केले. १९६० मध्ये ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन अधिछात्र म्हणून गेले आणि तेथेच १९६१ मध्ये वरिष्ठ संशोधन अधिछात्र व डिसेंबर १९६१ मध्ये भौतिकीचे प्राध्यापक झाले. पुढे १९६४ मध्ये ते म्यूनिकच्या तांत्रिक विद्यापीठात प्रायोगिक भौतिकीचे प्राध्यापक झाले आणि नंतर १९७२ मध्ये फ्रान्समधील ग्रनॉबल येथील इन्स्टिट्यूट माक्स फोन लौए या संस्थेचे व फ्रेंच जर्मन ब्रिटिश उच्च अभिवाह अणुकेंद्रीय विक्रियकाचे (अणुभट्टीचे) संचालक झाले.
मॉसबावर यांनी १९५३ पासून मुख्यत्वे गॅमा किरणांचे द्रव्यातील शोषण व विशेषतः अणुकेंद्रीय अनुस्पंदनी शोषण यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. घन स्फटिकांच्या जालकात बद्ध केलेली काही विशिष्ट अणुकेंद्रे गॅमा किरणांचे प्रत्यागतिविरहित उत्सर्जन व शोषण करू शकतात, असे त्यांना आढळून आले. अशा विशिष्ट स्थितीत गॅमा किरणांच्या उत्सर्जकाला शोषकासापेक्ष जरी थोडाही वेग दिला, तरी किरणांचे अनुस्पंदनी शोषण नष्ट होते. याकरिता त्यांनी नीच तापमानाला व इरिडियम (१९१) या समस्थानिकाचा (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराचा) उपयोग केला. पुढे लोह (५७) हा समस्थानिक अधिक प्रमाणात हा परिणाम दर्शवित असल्याने अधिक उपयुक्त ठरला. मॉसबावर यांनी पीएच्. डी. साठी सादर केलेल्या प्रबंधातच हा शोध समाविष्ट होता. या शोधामुळे उत्सर्जक व शोषक अणुकेंद्रांच्या अवस्थांमधील अगदी सूक्ष्म फरक मोजण्याची एक अत्यंत संवेदनाशील व प्रभावी पद्धत उपलब्ध झाली. त्यामुळे व्यापक ⇨ सापेक्षता सिद्धांतातील व ⇨ घन अवस्था भौतिकीतील काही प्रश्नांची (उदा., प्रकाश किंवा इतर विद्युत् चुंबकीय प्रारणात-तरंगरूपी ऊर्जेत-गुरुत्वाकर्षणामुळे तरंगलांबी बदलून विकृती निर्माण होते, हे आइनन्स्टाइन यांचे भाकित) प्रयोगशाळेतच चाचणी करणे शक्य झाले. मॉसबावर परिणामासंबंधी पुढे हार्व्हर्ड, हारवेल, आर्गॉन वगैरे ठिकाणच्या प्रयोगशाळांत मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले व त्याच्या उपयोगाचे क्षेत्र रसायनशास्त्र, जीवविज्ञान, चांद्रविज्ञान इ. विविध शास्त्रांतही विस्तार पावले.
नोबेल पारितोषिकाशिवाय त्यांना रिसर्च कॉर्पोरेशनचा पुरस्कार (१९६०), गीसेन विद्यापीठाचे राँटगेन पारितोषिक (१९६१), फ्रँकलिन इन्स्टिट्यूटचे एलियट क्रिसन पदक (१९६१) आणि ऑक्सफर्ड, लेस्टर व ग्रनॉबल येथील विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या इ. बहुमान मिळाले. अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन फिजिकल सोसायटी, यूरोपीयन फिजिकल सोसायटी, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस वगैरे विविध वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य आहेत.प्रत्यागतिविरहित अणुकेंद्रीय अनुस्पंदनी शोषण या विषयावर त्यांचे कित्येक संशोधनपर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
भदे, व. ग.