मॉर्गन घराणे : जगप्रसिद्ध अमेरिकन भांडवलदार घराणे. मॉर्गन कुटुंबातील तीन कर्तबगार पिढ्या त्याच्या शिल्पकार होत.
ज्यूनियस स्पेन्सर (१४ एप्रिल १८१३–८ एप्रिल १८९०) हा मॉर्गन घराण्याचा संस्थापक. जन्म वेस्ट स्प्रिंगफील्ड (मॅसॅचूसेट्स राज्य) या गावी. हार्टफर्ड शहरात (कनेक्टिकट राज्य) त्याच्या वडिलांची व्यापारी पेढी होती. ज्यूनियसने न्यूयॉर्क येथे बँकिंग व्यवसायाचे शिक्षण घेतले. १८५३ साली लंडनमध्ये जॉर्ज पीबॉडी या अमेरिकन बँकव्यवसायीशी भेट. पीबॉडीच्या आमंत्रणावरून ज्यूनियस ‘जॉर्ज पीबॉडी आणि कंपनी’ या बँकिंग कंपनीचा भागीदार बनला. पीबॉडीच्या निवृत्तीनंतर (१८६४) ज्यूनियस या कंपनीचा संचालक बनला कंपनीचे नावही ‘जे. एस्. मॉर्गन आणि कंपनी’ असे बदलण्यात आले. अमेरिकेच्या यादवी युद्धात (१८६१–६५) या बँकेने उत्तरेकडील राज्यांना साहाय्य केले. अँड्रू कार्नेगी (१८३५–१९१९) या अमेरिकन उद्योगपतीला १८७३ मधील व्यवसायांबाबत ज्यूनियसने सहकार्य दिले होते. फ्रान्स रशिया युद्धातील पराभवानंतर फ्रान्सला युद्ध पुढे चालू ठेवण्याकरिता त्याने पाच कोटी डॉलर रक्कम कर्जाऊ दिल्याने आर्थिक जगतात प्रचंड खळबळ उडाली होती. १८८०–८५ दरम्यान ज्यूनियसने सेसिल रोड्झ (१८५३–१९०२) या ब्रिटिश वित्तप्रबंधकाला हिऱ्यांच्या व्यापारपेठेवर नियंत्रण ठेवण्याकरिता भरपूर आर्थिक साहाय्य दिले. हार्टफर्डचे ट्रिनिटी महाविद्यालय, अनाथालय, न्यूयॉर्कचे मेट्रोपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट, न्यू हेवनचे (कनेक्टिकट) येल महाविद्यालय इ. संस्थांना ज्यूनियसने मोठ्या देणग्या दिल्या. माँटी कार्लो येथे त्याचे निधन झाले.
पहिला जॉन पिअरपाँट मॉर्गन हा ज्यूनियसचा मुलगा (१७ एप्रिल १८३७–३१ मार्च १९१३). हार्टफर्डमध्ये जन्म. शालेय शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये व उच्च शिक्षण प. जर्मनीच्या गटिंगेन विद्यापीठात. १८५७ मध्ये पीबॉडी कंपनीच्या न्यूयार्कस्थित ‘डंकन, शेर्मन आणि कंपनी’च्या शाखेत हिशेबनीस म्हणून नियुक्ती. पीबॉडीच्या निवृत्तीनंतर या पितापुत्रांनी डॅब्नीच्या भागीदारीत ‘डॅब्नी, मॉर्गन आणि कंपनी’ स्थापन केली. १८७१ मध्ये डॅब्नीच्या निवृत्तीनंतर मॉर्गन कंपनीने फिलाडेल्फियाच्या फ्रॅन्सिस मार्टिन ड्रेक्सेल (१७९२–१८६३) या बँक व्यवसायीच्या भागीदारीत ‘ड्रेक्सेल, मॉर्गन आणि कंपनी’ स्थापिली. ज्यूनियस (१८९०) व ड्रेक्सेल (१८९३) निवर्तल्यानंतर कंपनीने ‘जे. पी. मॉर्गन आणि कंपनी’ हे नवे नाव धारण केले.
गुंतवणूक बँकिंग व व्यापारी बँकिंग या दोन्ही क्षेत्रांत जॉनने उपक्रम केले. त्याच्या काळात अमेरिकेत मोठ्या कंपन्या एकसारख्या वाढत असल्याने त्यांना दीर्घमुदती भांडवलाची अतिशय गरज होती. मॉर्गन कंपनीचे इंग्लंडमध्ये विशेष आर्थिक संबंध असल्याने व त्याकाळी लंडन हे आर्थिक समृद्धीचे केंद्र असल्याने तिला इंग्लंडमध्ये कर्जरोख्यांच्या व्यवहारांतून पैसा उभारावयास अजिबात प्रयास घडत नसत. याचा मोठा फायदा मॉर्गन कंपनीला आर्थिक व औद्योगिक क्षेत्रांत होऊ शकला.
अनेक रेल्वेकंपन्यांचा मालक असलेल्या विल्यम हेन्री व्हँडरबिल्टची (१८२१–८५) ‘न्यूयॉर्क सेंट्रल रेलरोड’ व इतर न्यूयॉर्क रेल्वेकंपन्या यांचे जॉनने विलीनकरण केले १८८५–८८ यांदरम्यान पेनसिल्व्हेनिया व ओहायओ राज्यांतील रेल्वेकंपन्यांच्या एकत्रीकरणाकडे त्याने लक्ष दिले. १८९३ च्या आर्थिक अरिष्टानंतर ‘सदर्न रेल्वे’, ‘एअरी’, ‘नॉर्दन पॅसिफिक’ यांसारख्या दिवाळे निघालेल्या अनेक मोठ्या रेल्वेकंपन्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्याला बोलावण्यात आले. अशा प्रकारे दिवाळखोर रेल्वेकंपन्यांचे पुनर्वसन, रेल्वेकंपन्यांच्या विविध दरांमध्ये स्थैर्य आणि विघातक स्पर्धेला आळा असे तिहेरी कार्य जॉनने यशस्वीपणे पार पाडले. याशिवाय जॉनने विविध रेल्वेकंपन्यांच्या संचालक मंडळांवर आपली माणसे नेमली. १८९५ च्या मंदीच्या काळात जॉनने अमेरिकन सरकारला आवश्यक असे साडेसहा कोटी डॉलर किंमतीचे सोने पुरवून देशाची प्रतिष्ठा राखली. १९०१ मध्ये मॉर्गनने अँड्रू कार्नेगी व इतर यांच्यासह ‘युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन-यू एस् स्टील’ ही दहा कोटी डॉलरची कंपनी, तसेच ‘इंटरनॅशनल हार्वेस्टर कंपनी’ स्थापन केली अनेक अटलांटिक महासागरगामी जहाजकंपन्यांचे एकत्रीकरण करून ‘इंटरनॅशनल मर्चंट मरीन’ ही मोठी जहाजकंपनी उभारली.
अमेरिकेत त्या काळात वाढणाऱ्या व्यापारी बँका, न्यास, आयुर्विमा कंपन्या यांसारख्या भांडवलसंस्थांवरील आपले गुंतवणूक कंपनी म्हणून असलेले नियंत्रण हे मॉर्गन-पद्धतीचे वैशिष्ट्य होते. १९०७ मध्ये वॉल स्ट्रीटवरील एका मोठ्या बँकेचे दिवाळे वाजले त्यावेळी जॉनने न्यूयॉर्कच्या बँकांचे यशस्वीपणे संयोजन करून गंडांतर निवारिले. परंतु या यशामुळे मॉर्गन आर्थिक सत्तेचा वापर केवढ्या मोठ्या प्रमाणावर करू शकतो, हे दिसून आल्याने अमेरिकन शासनाने त्याच्याविरुद्ध चौकशी करण्यासाठी ‘बँकिंग व चलन समिती’ (१९११–१३) नेमली. समितीचा अध्यक्ष आर्सेअन पॉलँ प्यूझो (१८६१–१९३९) याच्या अहवालानुसार मॉर्गन घराण्याने जवळजवळ सबंध अमेरिकन अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवले होते. या अहवालानंतर अमेरिकेची ‘फेडरल रिझर्व्ह सिस्टिम’ ही मध्यवर्ती बँकयंत्रणा स्थापण्यात आली (१९१३).
या काळात अमेरिकन अर्थव्यवस्थेची अफाट वाढ होत गेली या वाढीला कारण असणाऱ्या अत्यल्प व्यक्तींमध्ये मॉर्गन आघाडीवर होता. स्पर्धेऐवजी केंद्रीकरणावर भर दिल्या जाणाऱ्या अर्थव्यवस्थेत तो अत्यंत कुशल संघटक मानला जाई. त्याने कार्यक्षम व कुशल सहकारी निवडले, तथापि अगदी महत्त्वाचे निर्णय स्वतःच घेतले. भांडवलदार व भांडवलाचे गरजू उद्योजक यांची सांगड घालून त्याचा आर्थिक व लौकिक फायदा त्याने मिळविला. तो एपिस्कोपल मतानुयायी आणि अत्यंत धर्मशील व दानशूर होता. दवाखाने, शाळा यांना त्याने मोठ्या देणग्या दिल्या. कला व कलावस्तू यांचा तो निःसीम भोक्ता व रसिक होता. न्यूयॉर्कचे ‘मॉर्गन ग्रंथालय’ म्हणजे प्रख्यात सचित्र हस्तलिखिते व ग्रंथ यांचा खजिनाच बनले होते. न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन आर्ट म्यूझीयम’चा तो अध्यक्षही होता. रोम येथे त्याचे निधन झाले.
दुसरा जॉन पिअरपाँट मॉर्गन (७ सप्टेंबर १८६७–१३ मार्च १९४३) हा जॉन पिअरपाँटचा एकमेव मुलगा. सेंट पॉल विद्यालय व हार्व्हर्ड विद्यापीठ यांमधून शिक्षण. नंतर न्यूयॉर्कच्या मॉर्गन आणि कंपनीचा भागीदार बनला. त्याची सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे पहिल्या महायुद्धात अमेरिका सहभागी होण्याअगोदर अमेरिकेत दोस्तराष्ट्रांच्या शस्त्रास्त्र खरेदीकरिता त्याने पुरविलेली पंधरा कोटी डॉलरची रक्कम, ही होय. ऑक्टोबर १९२९ मध्य शेअरबाजार कोसळल्यानंतर मॉर्गनने शेअरांच्या किंमतींमध्य स्थैर्य आणण्यासाठी अनेक बँकांद्वारे २५ कोटी डॉलर निधी गोळा केला.
दुसऱ्या जॉन पिअरपाँट मॉर्गनच्या कर्तृत्वाला प्रतिकूल परिस्थितीमुळे मर्यादा पडली. पहिल्या महायुद्धसमाप्तीनंतर नफा प्रचंड प्रमाणावर साठल्याने मोठ्या कंपन्यांना व निगमांना मॉर्गन कंपनीसारख्या प्रचंड बँकांवर फारसे विसंबावे लागत नसे. पहिल्या जॉन मॉर्गनने अमाप संपत्ती मिळविल्याने एकाच व्यक्तीकडे झालेल्या या प्रचंड संपत्तीच्या केंद्रीकरणाबद्दल जनमत जागृत होऊन अमेरिकन शासनाला तद्विरोधी कायदे व आर्थिक नियंत्रणे अंमलात आणावी लागली. आपल्या वडिलांप्रमाणे हाही धर्मशील व दानशूर होता. ललित कला, दानधर्म यांबाबत त्याने वडिलांचेच कार्य पुढे चालविले. मॉर्गन बँकिंग कंपनीचा तो अखेरचा प्रमुख होय. तो न्यूयॉर्क येथे मरण पावला. ॲनी मॉर्गन (१८७३–१९५२) ही त्याची धाकटी बहीण. तीदेखील अनेक दानशूर संघटना व नागरी संस्था यांच्या कार्यांत रस घेत असे. अमेरिकन महिलांच्या हक्कांकरिता तिने आवाज उठविला होता.
संदर्भ : 1. Corey, L. House of Morgan : A Social Biography of the Masters of Money, New York, 1969.
2. Wheeler, George, Pierpont Morgan and Friends : The Anatomy of a Myth, Englewood Cliffs, 1973.
गद्रे, वि. रा.
“