मॉटेलसन, बेंजामिन रॉय (बेन आर्.) : (९ जुलै १९२६ –). डॅनिश भौतिकीविज्ञ. अणुकेंद्राची संरचना स्पष्ट करण्यासंबंधीच्या मूलभूत कार्याबद्दल त्यांना ⇨ ऑगे नील्स बोर व ⇨ लीओ जेम्स रेनवॉटर यांच्याबरोबर १९७५ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

मॉटेलसन यांचा जन्म अमेरिकेतील शिकागो येथे झाला. त्यांनी पर्ड्यू विद्यापीठातून बी. एस्‌सी. (१९४७) व हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच्. डी. (१९५०) या पदव्या संपादन केल्या. शोल्डन प्रवासी शिष्यवृत्ती मिळाल्याने १९५०–५३ या काळात त्यांनी कोपनहेगन येथील इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरेटिकल फिजिक्स (आता नील्स बोर इन्स्टिट्यूट) या संस्थेत ऑगे बोर यांच्यासमवेत संशोधन केले. त्यानंतर कोपनहोगन येथे स्थापन झालेल्या यूरोपीयन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च (सीईआरएन) या संघटनेच्या सैद्धांतिक अभ्यास गटात त्यांनी १९५३–५७ मध्ये संशोधक म्हणून काम केले. १९५७ पासून ते कोपनहेगन येथील नॉर्डिक इन्स्टिट्यूट फॉर थिऑरेटिकल ॲटॉमिक फिजिक्स (नॉर्डिटा) या संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्यांना १९७१ मध्ये डॅनिश नागरिकत्व मिळाले. 

व्यक्तिगत न्यूक्लिऑनांच्या (अणुकेंद्रातील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या) स्वतंत्र गती व संपूर्ण अणुकेंद्राचे संकलित वर्तन या पूरक संकल्पनांचे एकत्रीकरण करणे हा अणुकेंद्रीय संरचनेच्या अभ्यासातील मध्यवर्ती उद्देश असल्याचे दिसून येते. मॉटेलसन व बोर यांनी त्या वेळी प्रामुख्याने प्रचलित असलेल्या अणुकेंद्राच्या कवच व द्रवबिंदू प्रतिमानांचे [मॉडेल्सचे → अणुकेंद्रीय भौतिकी] एकत्रीकरण करून अणुकेंद्राचे एकीकृत वा संकलित प्रतिमान मांडले. द्रवबिंदू प्रतिमानानुसार अणुकेंद्र हे एखाद्या असंकोच्य (दाब देऊन संकोच करता येत नाही अशा) द्रायूप्रमाणे (द्रव वा वायूप्रमाणे) वागते आणि हे प्रतिमान आसन्न (सन्निकट) बंधन-ऊर्जा [→ अणुकेंद्रीय भौतिकी] व अणुकेंद्रीय भंजन (तुकडे होणे) यांसारख्या संकलित गुणधर्मांचे वा आविष्कारांचे स्पष्टीकरण देऊ शकते. कवच प्रतिमानाप्रमाणे प्रत्येक न्यूक्लिऑन स्वतंत्रपणे एका समान वर्चसात (ऊर्जा पातळीत) गतिमान असतो व त्याच्या अनुमत कक्षा कवचांमध्ये गटवार सामावलेल्या असतात. या प्रत्येक कवचातील कक्षांची ऊर्जा जवळजवळ समान असते. कवच प्रतिमानामुळे प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या कूट अंकांचे [→ अणुकेंद्रीय भौतिकी] तसेच अणुकेंद्रीय परिवलन परिबले, चुंबकीय परिबले [→ अणुकेंद्रीय व आणवीय परिबले] वगैरेंचे स्पष्टीकरण देता येते. तथापि मूलतः मांडलेल्या कवच प्रतिमानाच्या साहाय्याने संवृत (बंद) कवचाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर न्यूक्लिऑन असणाऱ्या ⇨ विरल मृत्तिका मूलद्रव्यांच्या बाबतीत आढळणाऱ्या मोठ्या चतुर्ध्रुवी परिबलांचे स्पष्टीकरण मिळू शकत नाही. रेनवॉटर यांनी या बाह्य न्यूक्लिऑनांमुळे संपूर्ण अणुकेंद्राच्या आकाराचे बृहदक्षीय (अंडाकार) किंवा लघु अक्षीय (बिंबाकार) गोलाभात विरूपण करणारी व त्यामुळे निरीक्षित परिबले मिळणारी यंत्रणा सुचविली. रेनवॉटर यांच्या कार्यामुळे असे निदर्शनास आले की, अणुकेंद्रीय संरचनेच्या पर्याप्त प्रतिमानात न्यूक्लिऑनांच्या संकलित गतींमुळे निर्माण होणाऱ्या कवच प्रतिमानीय वर्चसातील विरूपण व कंपने, तसेच या संकलित गतींचे व्यक्तिगत कणांच्या गतींशी होणारे युग्मन (संयोग) ही विचारात घेणे आवश्यक आहेत. असे प्रतिमान मॉटेलसन व बोर यांनी १९५०–५३ या काळात विकसित केले. त्यात अणुकेंद्राचे वर्णन व्यक्तिगत न्यूक्लिऑनांच्या सहनिर्देशकांनी (संदर्भ-व्यूहाच्या सापेक्ष असणारे स्थान दर्शविणाऱ्या राशींनी) केलेले होते आणि संकलित सहनिर्देशकांनी अणुकेंद्रीय पृष्ठभागाचे विरूपण निर्देशित केलेले होते. या पृष्ठभागाचे वर्तन द्रवबिंदू प्रतिमानांप्रमाणेच असंकोच्य द्रायूसारखे होते, असे मानलेले होते. मॉटेलसन, बोर व त्यांचे सहकारी यांनी नंतर या प्रतिमानाचा अधिक विकास व व्यापकीकरण केले आणि या प्रतिमानाच्या संकल्पना विविध मूलद्रव्यांना कशा लागू करता येतात हे दाखविले. १९६० मध्ये त्यांनी अणुकेंद्राचे तपशीलवार संकलित प्रतिमान मांडण्यात यश मिळविले. हे प्रतिमान आधुनिक अणुकेंद्रीय भौतिकीच्या प्रगतीला पायाभूत ठरले आहे.

नोबेल पारितोषिकाखेरीज मॉटेलसन यांना ‘शांततेसाठी अणू’ हा फोर्ड मोटार कंपनी निधीचा पुरस्कार (१९६९) व फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे वेदरील पदक (१९७४) हे सन्मान मिळालेले आहेत. अनेक संशोधनपर निबंध त्यांनी लिहिलेले असून ऑगे बोर यांच्यासमवेत लिहिलेला न्यूक्लिअर स्ट्रक्चर (खंड १, १९६९खंड २, १९७५) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

ठाकूर, अ. ना.