मानसोत्तजके : (सायकिक एनर्जायझर्स अँटिडिप्रेसंट ड्रग्ज) विषण्णता किंवा अवसाद [→उद्दीपन-अवसाद चित्तविकृति ] या मानसिक विकाराच्या उपचारासाठी आणि दीर्घकालीन व अपंगता निर्माण करणाऱ्या आजारात उद्‌भवणाऱ्या विषण्णतेवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांना मानसोत्तेजके म्हणतात. या औषधांना विषण्णतारोधी किंवा अवसादनाशके किंवा मनोदशाउत्तेजके असेही म्हणतात. १९५७ च्या सुमारास ही औषधे वापरात आल्यापासून विषण्णताग्रस्त रुग्णांवरील उपचारात या औषधांचे महत्त्व लक्षणीय इतके वाढले आहे. मानसोत्तेजक औषधांच्या क्रियेचा परिणाम रुग्णात सुरू होण्यास विलंब (चार आठवड्यांपर्यंत) लागतो हा त्यांचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे.

वर्गीकरण : मानसोत्तेजकांचे चार गटांत वर्गीकरण करण्यात येते. (अ) मोनोअमाइन ऑक्सिडेज प्रतिबंधके : (१) हायड्रॅझीन : उदा., आयसोकार्बॉक्साझीड, इप्रोनिॲझीड, निॲलमाइड, फेनेलझाइन (२) नॉन्हायड्रॅझीन : उदा., ट्रॅनिलसायप्रोमीन.

(आ) सायक्लिक (वलयी) संयुगे : (१) मोनोसायक्लिक : उदा., टोफेनॅसीन (२) बायसायक्लिक : उदा., व्हिलोक्साझीन (३) ट्रायसायक्लिक : उदा., इमिप्रामीन, डेसीप्रामीन, ॲमिट्रिप्टीलीन, नॉरट्रिप्टीलीन, नायट्रोक्साझेपीन. या गटातील ट्रायसायक्लिक संयुगेच अधिक प्रमाणात वापरली जातात.

(इ) लिथियम संयुगे.

(उ) मानसप्रेरक उत्तेजके : उदा., कॅफीन, ॲम्फेटामीन, मिथिलफेनिडेट, पिप्रॅडॉल.

मोनोअमाइन ऑक्सिडेज प्रतिबंधके : क्षयरोगावरील उपचारासाठी संश्लेषित करण्यात आलेल्या (घटक द्रव्ये एकत्र आणून कृत्रिम रीतीने तयार करण्यात आलेल्या) निकोटिनिक अम्लाच्या हायड्राझाइडांपैकी इप्रोनिॲझीड हे रुग्णांना कमी मात्रेत दिल्यास त्यांची मनोदशा सुधारते, वजन व क्रियाशीलता वाढते आणि एकंदरीत प्रकृती चांगली राहत असल्याचा १९५५ मध्ये अनुभव आला. वर्षभरातच इप्रोनिॲझीड विषण्णताग्रस्त रुग्णांची मनोस्थिती सुधारण्यासाठी वापरण्यात येऊ लागले. या औषधाचा अमाइन ऑक्सिडेजासारख्या एंझाइमांना (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांना) प्रतिबंध होतो असे लक्षात आल्यावर त्यासारख्या प्रतिबंधक पण निरनिराळ्या रासायनिक संरचना असलेली औषधे विकसित करण्यात आली. ही औषधे घेतल्यामुळे रुग्णास उत्साही व ताजेतवाने वाटू लागते, झोप कमी होते व आत्महत्या प्रवृत्ती कमी होते. या औषधांचा परिणाम काही दिवस ते ३-४ आठवड्यांच्या सुप्त अवधीनंतर दिसू लागतो. या औषधांचे जठरात सुलभतेने अभिशोषण होत असल्याने ती तोंडावाटे दिली जातात. ही औषधे जरी थोडा काळच शरीरात राहत असली, तरी ती मोनोअमाइन ऑक्सिडेजाच्या क्रियेला एक ते दोन आठवडे किंवा मोनोअमाइन ऑक्सिडेज एंझाइमाचे नवे रेणू तयार होईपर्यंत प्रतिबंध करू शकतात.

काही रुग्णांत या औषधांमुळे चवताळणे, बडबड करणे, अस्वस्थपणा इ. लक्षणे उद्भवतात. ही औषधे दिलेल्या सशाला किंवा उंदराला रेसरपीन हे शामक व रक्तदाब वाढू नये याकरिता वापरण्यात येणारे औषध दिले असता त्याच्या नेहमीच्या कार्याविरुद्ध कार्य होताना आढळून येते (नुसते रेसरपीन दिल्यास हे प्राणी निष्क्रिय,उदासीन व सभोवतालच्या घडामोडींत रस न घेणारे असे होतात) म्हणजे हे प्राणी चिडून चवताळतात. ही रेसरपीन व्युत्क्रमण क्रिया माणसात क्वचितच दिसून येते. ही औषधे एफेड्रीन व ॲम्फेटामीन यांच्या कार्याची वृद्धी करतात. तसेच ही औषधे यकृतातील अमाइन ऑक्सिडेजाचा प्रतिबंध करीत असल्याने ती इतर कित्येक औषधांच्या यकृतात होणाऱ्या अपघटनात (रेणूचे तुकडे होण्याच्या क्रियेत) व्यत्यय आणतात. यामुळे या इतर औषधांचे अनिष्ट विषकारक परिणाम ओढवतात. ही औषधे वापरत असताना डोकेदुखी, निद्रानाश, उत्तेजन, संताप, हातापायात कंप, ताप, झटके, बद्धकोष्ठ, तोंडास कोरड पडणे, दृष्टीदोष, क्वचित कावीळ इ. अनिष्ट आनुंषगिक परिणाम उद्भवतात. या औषधांमुळे होणारा सर्वांत तीव्र आनुषंगिक परिणाम म्हणजे यकृताला होणारा अपाय होय. यामुळेच इप्रोनिॲझीड हे औषध आता वापरण्यात येत नाही.

मोनोअमाइन ऑक्सिडेज प्रतिबंधक औषधांच्या वापरानंतर तंत्रिका कोशिकांतील (मज्जा पेशीतील) सिरोटोनीन, नॉरॲड्रेनॅलीन व इतर कॅटेचोल अमाइनांचा संचय वाढतो. या द्रव्यांचे अपघटन होण्याची क्रिया थांबते. त्यामुळे ही द्रव्ये एकदम मुक्त होऊन एकाएकी रक्तदाब वाढण्याची शक्यता उद्भवते. अशा रीतीने एकदम रक्तदाब वाढण्याच्या प्रकारास ‘अतिरक्तदाबाचा झटका’ असे म्हणतात. अशा झटक्यात रुग्ण एकदम मृत्युमुखीही पडू शकतो म्हणूनच ही औषधे डॉक्टरांच्या औषधादेशाशिवाय (प्रिस्क्रिप्शनशिवाय) स्वतः होऊन घेऊ नयेत. अनुकंपी-अनुकारक [अनुकंपी तंत्रिका तंत्राच्या क्रियेमुळे उद्भवणाऱ्या बदलांसारखे शरीरक्रियात्मक बदल निर्माण करू शकणाऱ्या → तंत्रिका तंत्र] पदार्थ सेवनात आल्यास असा झटका येण्याचे प्रमाण वाढते. खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधी मिश्रणांत, तसेच चीजसारख्या खाद्यपदार्थांत अनुकंपी-अनुकारके मोठ्या प्रमाणात असतात. चीजमध्ये टायरामीन हे अनुकंपी-अनुकारक अधिक प्रमाणात असल्याने ही औषधे घेणाऱ्या रुग्णाने खूप चीज खाल्ले असता त्याचा रक्तदाब एकदम वाढून त्याला अर्धांगवायू, हृद् निष्फलता (हृदयक्रिया बंद पडणे) किंवा तीव्र डोकेदुखी यांचा उपद्रव होण्याची शक्यता असते. ज्या अन्नपदार्थांत जंतुजन्य अपघटन होत असते त्यांत (उदा., दही, ताक, चीज, इडली, डोसा, खारवलेले मासे, मद्य वगैरे) अनुकंपी-अनुकारकांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे असे सर्वच अन्नपदार्थ हे औषधोपचार घेणाऱ्या रुग्णाने सावधगिरीने वापरणे व औषधादेश देणाऱ्या डॉक्टरांनी याबाबत योग्य सूचना देणे आवश्यक आहे.

ट्रायसायक्लिक संयुगे : या संयुगांचा मानसोत्तेजक गुणधर्म फिनोथायाझीन औषधांसारखी रासायनिक संरचना व कार्य (छिन्न मानसविरोधी शांतके) असणारी औषधे म्हणून त्यांचा वापर करताना आढळला. इमिप्रामीन हे मानसोत्तेजक म्हणून वापरलेले पहिले ट्रायसायक्लिक औषध होय. आज वापरात असलेल्या ज्ञात मानसोत्तेजक औषधांपैकी ट्रायसायक्लिक औषधांची सर्वांत परिणामकारक औषधांमध्ये गणना होते. इमिप्रामिनाखेरीज ॲमिट्रिप्टिलीन, डेसमिथिलइमिप्रामीन व नॉरट्रिप्टीलीन यांचाही उपयोग करण्यात येतो.

इमिप्रामीन मुक्त झालेल्या नॉरॲड्रेलिनाच्या कोशिकेकडून होणाऱ्या पुनर्ग्रहणास प्रतिबंध करते. त्यामुळे अंतःक्षेपित (इंजेक्शनाद्वारे शरीरात सोडलेल्या) ॲड्रेनॅलिनाची किंवा नॉरॲड्रेनॅलिनाची कार्यक्षमता वाढते. रक्तदाब खाली आणणाऱ्या औषधांना यामुळे प्रतिरोध होतो. विषण्णताग्रस्त नसलेल्या व्यक्तींत ट्रायसायक्लिक औषधांमुळे सुस्ती व शामक परिणाम उद्भवतो. विषण्णतेवरील ट्रायसायक्लिक औषधांच्या उपचारामुळे सु. ७०% रुग्णांतील लक्षणे कमी होतात, आनुषंगिक परिणाम कमी प्रमाणात उद्भवतात आणि विशिष्ट अन्नपदार्थ टाळण्याचीही आवश्यकता नसते. यामुळे सामान्यतः मोनोअमाइन ऑक्सिडेज प्रतिबंधक औषधांपेक्षा ट्रायसायक्लिक औषधे वापरणे अधिक पसंत केले जाते. मोनोअमाइन ऑक्सिडेज प्रतिबंधक औषधांप्रमाणेच ट्रायसायक्लिक औषधांची विषण्णतारोधी क्रिया दोन ते चार आठवड्यांपर्यत व्यक्त होत नाही.ट्रायसायक्लिक औषधांमुळे तोंड कोरडे पडणे, दृष्टीमांद्य, बद्धकोष्ठता, भोवळ, लघवीला त्रास होणे, चिडचिड, कंप, अंगस्थितिजन्य रक्तदाबन्यूनत्व, भ्रम, कावीळ वगैरे अनिष्ट आनुषंगिक परिणाम उद्‌भवतात.


लिथियम संयुगे: १९४० नंतरच्या दशकात लिथियम क्लोराइड मिठाऐवजी म्हणून रक्तदाब आधिक्य, हृद् निष्फलता इ. विकारांत वापरले गेले. यांपैकी काही रुग्ण लिथियमाच्या विषबाधेमुळे मृत्यू पावले. १९४९ मध्ये ते उंदरांत व गिनीपिगांमध्ये शामक असल्याचे आढळून आले. उद्दीपन-अवसाद चित्तविकृतीच्या उद्दीपक व विषण्ण अवस्थांत ते प्रतिबंधक म्हणून उपयुक्त ठरले आहे. त्याची कार्यक्षमता शरीरातील सोडियमाच्या रेणूंशी संबंधित आहे. औषधिक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने त्याची शरीरातील सुरक्षिततेच्या व कार्यक्षमतेच्या पातळीची कक्षा फारच अरुंद आहे व ती ओलांडताच विषबाधा होऊन दुष्परिणाम उद्भवतात. यामुळे लिथियम देत असताना रक्तातील त्याची पातळी वारंवार तपासावी लागते. लिथियमाची पातळी वाढल्यास भूक मंदावणे, उलट्या, अतिसार, तोंडास कोरड पडणे, स्नायूंचा अशक्तपणा, कंप, गुंगी येणे, रक्तदाबन्यूनता, बहुमूत्रमेह (अतितहान लागणे व पुष्कळ लघवी होणे) वगैरे अनिष्ट आनुषंगिक परिणाम उद्‌भवतात.

मानसप्रेरक उत्तेजके:कॅफीन व ॲम्फेटामीन ही औषधे जरी केंद्रीय तंत्रिका तंत्राचे [→ तंत्रिका तंत्र] उत्तेजन करीत असली व मनोदशा-उत्तेजक म्हणून कार्य करू शकत असली, तरी ती खरी मानसोत्तेजके नाहीत. त्यांच्यामुळे काही रुग्णांत शारीरिक ऊर्जा, सावधानता व आत्मविश्वास वाढतो परंतु त्यामुळे विषण्ण अवस्थेत सुधारणा होत नाही वा आत्महत्या प्रवृत्तीलाही प्रतिबंध होत नाही. याउलट त्यांत अधिक बिघाड होण्याची शक्यता असते. ॲम्फेटामिनामुळे त्यावरील शारीरिक अवलंबित्व उद्भवण्याचा संभव असतो. ॲम्फेटामिनामुळे नॉरॲड्रेनॅलीन व डोपमीन मुक्त होण्यास प्रेरणा मिळते आणि या अमाइनांचे पुनर्ग्रहण होण्यास ॲम्फेटामीन प्रतिबंध करते.

पिप्रॅडॉल व मिथिलफेनिडेट यांचा केंद्रीय तंत्रिका तंत्रावर ॲम्फेटामिनाप्रमाणेच उत्तेजक परिणाम होतो. त्यांचे परिणाम कॅफीन व ॲम्फेटामीन यांच्या दरम्यान असल्याचे आढळते. तथापि या औषधांमुळे परिसरीय अनुकंपी-अनुकारक क्रिया उद्भवत नाहीत, तसेच त्यांच्यामुळे भूक मंदावत नाही. कॅफीनप्रमाणेच या औषधांमुळे थकवा दूर होतो व बरे वाटत असल्याची भावना निर्माण होते. या औषधांच्या थोड्या मात्रेमुळे प्रेरक क्रियांत वाढ होते पण त्यांत वैरभाव अथवा चिडखोरपणा आढळत नाही. तथापि ही औषधे अधिकतेने पूर्वशक्ती प्राप्त करून देणाऱ्या पुष्टिकारकांसारखी असून खरी मानसोत्तेजक नाहीत. तीव्र विषण्णतेवर ही औषधे उपयुक्त नाहीत आणि त्यांच्या अतिमात्रेमुळे अस्वस्थता, निद्रानाश, चिंता, कंप, छातीत धडधडणे, स्नायूंतील परस्पर सहकार्याचा अभाव, झटके वगैरे दुष्परिणाम संभवतात. या औषधांच्या बाबतीत शारीरिक अवलंबित्व निर्माण होण्याचीही शक्यता असते. मोठ्या मात्रेमुळे झटक्यांसह व्यापक उत्तेजकतेची लक्षणे उद्‌भवतात. निद्रापस्मार (एकाएकी आणि राहून राहून अनिवार्य व अल्पकाळ टिकणारे झोपेचे झटके) या विकारात या औषधांच्या मोठ्या मात्रेचा उपयोग करण्यात आलेला आहे.

उपयुक्तता: मानसोत्तेजक औषधांच्या उपलब्धतेमुळे विषण्णतेवरील उपचारात क्रांती झाली आहे. या औषधांच्या वापरामुळे बऱ्याचशा आत्महत्या टळू शकतात. याखेरीज एकदा निदान झाल्यावर कुटुंबाचा नेहमीचा डॉक्टर घरीच रुग्णावर उपचार करू शकतो. रुग्णाला मनोरुग्णालयात ठेवण्याची गरज कमी होते. मानसोत्तेजकांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. क्वचित निरोगी व्यक्तीही दीर्घ परिश्रम सुलभ व्हावेत म्हणून त्यांचा वापर करताना आढळतात. मानसिक स्थैर्य व आरोग्य निश्चयपूर्वक टिकविण्यासाठी प्रेम, दुःख, शोक इ. भावनांचा अनुभव घेण्याचे सामर्थ्य असण्याची नितांत आवश्यकता असते. अशा मूलभूत भावनांच्या विकृत अवस्थांवर उपचार करण्यासाठी मानसोत्तेजक वापरण्याऐवजी या भावना बोथट करण्याकरिता त्यांचा वापर वाढू लागला, तर मादक पदार्थांप्रमाणेच या औषधांवरही कायद्याचे नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता निर्माण होण्याचा संभव आहे. मानसिक विषण्णतेत इतक्या सातत्याने आत्मक्रौर्य आढळून येते की, शरीराला वा मेंदूला हानिकारक न होता या प्रवृत्तीत सुधारणा घडवून आणणारी औषधे खरोखरीच अमोल महत्त्वाची ठरतील.

पहा : मानसौषधि.

संदर्भ : 1. Laurence, D. R. Bennet, P. N. Clinical Pharmacology, Edinburgh, 1980.

2. Satoskar, R. S. Bhandarkar, S. D. Pharmacology and Pharmacotherapeutics, Vol. I. Bombay, 1983.

कुलकर्णी, श्यामकांत