मागसायसाय, रामॉन : (३१ ऑगस्ट १९०७–१७ मार्च १९५७). फिलिपीन्सचा तिसरा राष्ट्राध्यक्ष आणि एक थोर मुत्सद्दी. त्याचा जन्म सामान्य मलई कारागिराच्या कुटुंबात ईबा (सांबालेस प्रांत-लूझॉन) येथे झाला. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ईबा येथे झाले. रिसाल होसे कॉलेज (मानिला) मधून त्याने वाणिज्य विषयात पदवी घेतली (१९३३). सुरुवातीस वाहनचालकासारख्या किरकोळ नोकऱ्या करून तो मानिला वाहतूक कंपनीचा मुख्य व्यवस्थापक झाला (१९३३–३७). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रथम तो लूझॉन येथे सैन्यात सामील झाला व १९४२ साली जपानच्या ताब्यात देश गेल्यावर त्याने गनिमी लष्करी पथकाचे नेतृत्व केले आणि अमेरिकन सैन्यास जपानविरुद्ध सहकार्य दिले. जपानच्या पराभवानंतर अमेरिकेच्या ज. डग्लस मॅकआर्थरने त्याची सांबालेस प्रांताचा लष्करी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली. १९४६–५० दरम्यान तो फिलिपीन्सच्या संसदेवर (काँग्रेस) लिबरल पक्षातर्फे दोनदा निवडून आला व राजकारणाकडे आकृष्ट झाला. या काळात देशात शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने हूक बंड सुरू झाले होते. या बंडखोरांशी कम्युनिस्ट पक्षाने आघाडी केली. हूक व कम्युनिस्ट यांच्या बंडाचा बंदोबस्त करण्याची एक योजना व कार्यक्रम त्याने संसदेत सादर केला. यावेळी या हूक बंडवाल्यांनी देशात उच्छेद मांडून पाच प्रांतात सत्ता स्थापन केली होती. मागसायसायची योजना मान्य करून राष्ट्राध्यक्ष एल्-पीद्यो कीरीनो (कार. १९४९–५४) याने त्याची राष्ट्रीय संरक्षण समितीच्या सचिवपदी नियुक्ती केली (सप्टेंबर १९५०). त्याने आधुनिक तंत्राचा वापर करून अमेरिकेच्या मदतीने लष्करात आमूलाग्र सुधारणा आणि बदल केले. सामान्य लोकांच्या आश्रयाशिवाय मुक्तिसेना टिकू शकत नाही, हे हेरून त्याने शेतकऱ्यांना आवाहन केले आणि जे शरण येतील त्यांना जमिनी, अवजारे व चांगली वागणूक देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उठावातील अनेक शेतकरी शासनास येऊन मिळाले. त्याने गनिमांविरुद्धच्या लष्करी मोहिमांत चपळाई आणि आधुनिकता आणली. त्याच्या आर्थिक धोरणांमुळे देशाचे अमेरिकेशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले. देशांतर्गत बंडाळी मोडण्यासाठी त्याने लोकांच्या काही मूलभूत अधिकारांवर बंदी आणली. त्याच्या कडक व शिस्तबद्ध यंत्रणेमुळे अंतर्गत राजकारणात त्यास अनेक शत्रू निर्माण झाले. परिणामतः ८ फेब्रुवारी १९५३ मध्ये त्याने आपल्या सचिवपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्राध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली. त्याला नॅशनल व डेमोक्रटिक पक्षांनी पाठिंबा दिला व तो मताधिक्याने निवडूनही आला (१० नोव्हेंबर १९५३). स्वच्छ, प्रामाणिक व कार्यक्षम प्रशासनव्यवस्थेमुळे अल्पावधीत त्याची लोकप्रियता वाढली तथापि त्याच्या प्रागतिक कार्यक्रमास संसदेत म्हणावा तसा प्रतिसाद मिळेना तेव्हा त्याने फेरनिवडणुका जाहीर केल्या आणि राष्ट्राध्यक्षपदासाठी तो पुन्हा उभा राहिला. निवडणूक प्रचाराच्या मोहिमेवर असताना सेबू येथे विमान अपघातात तो मरण पावला.
मागसायसायने आपल्या राष्ट्राध्यक्षीय कारकीर्दीत (१९५३–५७) अंतर्गत धोरणात लष्करापासून मुलकी खात्यापर्यंतच्या सर्व प्रशासनव्यवस्थेत आमूलाग्र बदल करून अनेक मौलिक सुधारणा केल्या. त्यांपैकी शेतकऱ्यांचे पुनर्वसन, काही नागरी हक्कांचे संरक्षण आणि जमीनविषयक सुधारणा महत्त्वाच्या होत. परराष्ट्रीय धोरणात त्याचा कम्युनिस्टविरोधी दृष्टिकोण स्पष्ट दिसतो. त्याने पाश्चात्त्य देशांशी विशेषतः अमेरिकेशी मित्रत्वाचे संबंध ठेवले होते आणि शीतयुद्धात अमेरिकेचा एक प्रमुख प्रवक्ता म्हणून काम केले. ⇨ सीटो या लष्करी करारासाठी त्याने पुढाकार घेऊन ही संघटना मानिला येथे स्थापन केली (८ सप्टेंबर १९५४).
मागसायसायला फिलिपीन्सच्या आधुनिक इतिहासात महत्वाचे स्थान आहे. त्याने जही काही लोकशाही हक्कांचा संकोच केला, तरी फिलिपीन्सला कम्युनिस्टांच्या कच्छपी जाऊ दिले नाही आणि हुकसारख्या कम्युनिस्ट प्रणीत उठावांचा बंदोबस्त करून शांतता व सुव्यवस्था स्थापन केली. त्याबद्दल अमेरिकेने त्याला लिजन ऑफ मेरिट हा दुर्मिळ पुरस्कार दिला (१९५२). फिलिपीन्सचे हित अमेरिकेशी सामाजिक, आर्थिक व राजकीय संबंध प्रस्थापित करण्यात आहे, हे त्याने ओळखले. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या ध्येयधोरणांचा पुरस्कार करणाऱ्या संस्था व व्यक्ती तसेच त्याची तत्त्वप्रणाली यांचा पाठपुरावा करणाऱ्यांसाठी ‘रामॉन मागसायसाय’ हा पुरस्कार देणारे प्रतिष्ठान त्याच्या स्मरणार्थ मानिला येथे स्थापनात आले.
संदर्भ : 1. Abaya, H.J. The Untold Philippine Story, London, 1967.
2. Gagelonia, P.A. Presidents All, New York, 1967.
3. Gray, M. M. Raman R. Magsaysay, New York, 1965.
4. Merritt, J. V. Our Presidents : Profiles in History, New York, 1962.
5. Quirino, Carlon, Romon R. Magsaysay, Chicago, 1964.
शेख, रुक्साना
“