मागधी भाषा : प्राकृत भाषा हा शब्द उच्चारताच संस्कृतनंतरच्या, संस्कृत भाषेतच परिवर्तन होऊन आलेल्या अनेक भाषांचा बोध होतो. पण याबरोबर हेदेखील लक्षात घेतले पाहिजे, की त्या सर्व एका विस्तीर्ण कालखंडातील भाषा असून त्यांच्यात एक विशिष्ट कालक्रमही आहे. पण हा कालक्रमही अनुमाननिष्ठच आहे. याला अपवाद एकच प्राकृत. ती म्हणजे अशोकाच्या शिलालेखांची.
मागधीचे नाते शौरसेनीशी जोडले जाते. हेमचंद्राच्या प्राकृत व्याकरणातील २८७ ते ३०२ ही सूत्रे मागधीबद्दलची आहेत. त्यातले शेवटचे आहे ‘शेषं शौरसेनीवत्’.
प्राकृत भाषांच्या विवेचनात दाखवून दिल्याप्रमाणे माहाराष्ट्री ही निश्चितपणे शौरसेनीची उत्तरावस्था मानता येते. याच नियमाने पाहिले, तर मागधी ही शौरसेनीची समकालीन ठरते. संस्कृतच्या तुलनेने या दोन भाषांची ध्वनिप्रक्रिया फारशी वेगळी नाही.
मागधीचा विचार करताना अर्धमागधीची आठवण (त्यांच्यातल्या नामसादृश्यामुळे) होणे स्वाभाविक आहे. हेमचंद्राच्या म्हणण्याप्रमाणे जैनांची प्राचीन धर्मविषयक सूत्रे अर्धमागधीत आहेत. या भाषेचे मागधीशी एका बाबतीत साधर्म्य आहे. इतर प्राकृतांत संस्कृत अकारान्त पुल्लिंगी नामांचे एकवचन ओकारान्त असते. मागधीत आणि अर्धमागधीत ते एकारान्त असते. शौर, नरो, मा. नले, अर्धमा. नरे. मागधीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य हे, की संस्कृत र-लच्या जागी तिच्यात सर्वत्र ल आढळतो, तर श–ष–स च्या जागी जवळजवळ सर्वत्र शच आढळतो : सं. पुरुष: मा. पुलिशे सं. हंस:, मा. हंशे इत्यादी.
मागधीची लक्षणे : मागधीची लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे आहेत.
(१) मागधीचे सर्वसाधारण स्वरूप शौरसेनीच्या स्वरूपाप्रमाणे आहे.
(२) सचा श व रचा ल होतो.
(३) प्रथमेचे एकवचन – ए आणि षष्ठीचे एकवचन व अनेकवचन वैकल्पिकपणे – आह आहे.
सं. पुरुष:, नर:, हंस: – मा. पुलिशे, नले, हंशे
सं. रामस्य – मा. लामश्श, लामाह
सं. रामाणां – मा. लामाणं, लामाण, लामाह
(४) आद्यस्थानाहून इतरत्र असलेल्या च्छचा श्च होतो : सं. वत्सल शौर. वच्छलो, मा. वश्चले.
(५) आद्यस्थानाहून इतरत्र असलेल्या क्षचा विसर्ग + क होतो : सं. यक्ष:, मा. य = के.
(६) आद्यस्थानी नसलेले, पण संयुक्त व्यंजनात असणारे स, श, ष यांचा स होतो : सं. हस्त:, मा. हस्ते, सं. शुष्क:, मा. शुस्के. पण अपवाद सं. ग्रीष्म:, मा. गिंहे.
(७) न्य, ण्य, ज्ञ, ब्ज यांचा ञ्ञ होतो. सं. धन्य:, गण्य:, प्रज्ञ:, धनंञ्जय: – मा. धन्जे, गन्जे, पन्जे, धणन्जए.
(८) ज, य, द्य यांचा य् होतो : सं. समाज:, जय:, हृद्य: – मा. समाये, यये, हिय्ये.
(९) ष्ट व ट्ट यांचा स्थ होतो : सुष्ठु, भट्ट: – मा. सुस्थु, भस्थे.
(१०) स्थ व र्थ यांचा स्त होतो. सं. उपस्थित:, अर्थ: – मा. उपस्तिदे, अस्ते.
(११) अहम् व वयम् यांचे हगे हे रूप होते.
(१२) स्थाच्या जागी चिट्ट हे रूप येते : सं. तिष्ठति, मा. चिट्टदि/दे.
काही रूपांच्या बाबतीत व्याकरणकारांत मतभेद आहेत.
मागधीचे स्थान : मुळात कदाचित प्रादेशिक असलेल्या प्राकृत भाषा पुढे केवळ परंपरागत संदर्भात वापरल्या जाऊ लागल्या. संस्कृत नाटकांत ठोकळमानाने शौरसेनी गद्य प्रयोगात व माहाराष्ट्री काव्यात वापरली जाते पण या झाल्या प्रतिष्ठित प्राकृत बोली. मागधी-पैशाचीसारख्या बोली या हलक्या दर्जाच्या ठरवून हलक्या पात्रांच्या तोंडी घातल्या जाव्यात, असा नाट्यशास्त्राचा दंडक आहे. मागधी प्राकृतातल्या खालील काही ओळी अभिज्ञानशाकुंतलमधल्या धीवराच्या प्रवेशातल्या (अंक ६, प्रवेशक) आहेत.
रक्षिणौ (पुरुषं ताडयित्वा) – हण्डे कुम्भीलआ कधे हि कहिं तए एशे महालदणभशुले उक्किणंणामक्खले लाअकीए अङगुलीअए शमाशादिए |
पुरुष : (भीतिनाटितकेन) – पशीदन्तु भावमिश्शा ण हगे| ईदिशश्श अकय्यश्श कालके |
प्रथम : किं णुक्खु शोहणे बम्हणे शि त्ति कदुअ लज्जा दे पलिग्गेहे दिण्णे |
पुरुष : शुणुध दाव हगेक्खु शक्कावदालवाशी धीवले |
द्वितीय : हण्डे पाडच्चला किं तुमं अम्हेहिं यादिं वशदिंच पुश्चिदे | …
भाषांतर– दोन रक्षक (पुरुषाला मारून) : काय रे चोरट्या, सांग, कुठून तू ही मौल्यवान रत्नं जडवलेली ज्याच्यावरचा नामाक्षरं काढून टाकली आहेत अशी राजाची अंगठी मिळवलीस?
पुरुष (भीतीचा अभिनय करून) : स्वामींनी कृपा करावी. मी अशी अयोग्य गोष्ट करणारा नाही.
पहिला : तर मग काय तुला सत्पात्र ब्राह्मण समजून राजानं ही भेट दिली ?
पुरुष : ऐका तर. मी शक्रावतारी राहणारा धीवर आहे.
दुसरा : अरे भामट्या, तुला काय आम्ही तुझी जात आणि रहायचं ठिकाण विचारलं?
संदर्भ : 1. Pischel. R. Ed. Siddhahemashabdanushasan of Hemchandra, Bombay, 1878, 1880.
2. Trivedi, K. P. Ed. The Shadbhashachandrika of Lakshmidhara, Bombay 1916.
3.Woolner, A. C. Introduction to Prakrit, Calcutta, 1917.
कालेलकर, ना. गो.