माकारिएन्को, आन्तोन सिमायॉनॉव्हिच : (१३ मार्च १८८८–१ एप्रिल १९३९). रशियन शिक्षणतज्ञ. युक्रेन येथे एका रेल्वेकामगाराच्या कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण झाल्यानंतर त्याची रेल्वेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नेमणूक झाली. रशिया–जपान युद्धानंतर (१९०४–०५) झालेल्या क्रांतीमध्ये भाग घेऊन तो साम्यवादी बनला. मॅक्झिम गॉर्कीचे लेखन त्याला भावी आयुष्यात प्रेरक व मार्गदर्शक ठरले. डॉलिन्सकाया येथील शाळेत लष्करी शिक्षण (१९११) व पोल्टाव्हा येथील सैनिक संस्थेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण (१९१४) होऊन त्याने लष्करी सेवा पतकरली. दृष्टिदोषामुळे लष्करी सेवेतून तो १९१७ मध्ये मुक्त झाला. पुढे त्याने प्राथमिक शिक्षक (१९१९), पोल्टाव्हा येथील बोर्स्टल शाळाप्रमुख (१९२०), खार्कॉव्ह येथील बालगुन्हेगारीच्या निवासी शाळेचा प्रमुख (१९२४–३६) तसेच कीव्ह येथील मध्यवर्ती कचेरीत बालगुन्हेगारांचा शिक्षणतज्ञ इ. अशा विविध पदांवर काम केले. त्याचे लेखनही दरम्यान प्रकाशित होत राहिले व त्याच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानास निश्चितता येऊ लागली. पुढे तो मॉस्को येथे स्थायिक झाला (१९३७). स्टालिन पक्षप्रमुख झाल्यानंतर माकारिएन्कोच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानास रशियात महत्त्व प्राप्त झाले व त्यास सरकारने थोर शिक्षणतज्ञ म्हणून पुरस्कार दिला (१९३९). त्याचे लेखन सात खंडांत प्रसिद्ध होऊन अठरा भाषांमध्ये त्यांचे भाषांतर झाले.
माकारिएन्को हा रशियन वाङ्मयाचा भोक्ता होता. जुन्या अभिजात रशियन वाङ्मयाचा तो पुरस्कर्ता होता. लेनिन आणि स्टालिन यांना तो गुरुस्थानी मानत असे.
मानवाच्या चारित्र्याची आणि व्यक्तिमत्त्वाची परिपूर्णता हे शिक्षणाचे उद्दिष्ट असावे, असे माकारिएन्को याचे मत होते. टॉलस्टॉयने त्यापूर्वी मुक्त शिक्षणाची कल्पना विशद केली होती. त्या दृष्टीने माकारिएन्को याचे विचार टॉलस्टॉयच्या शिक्षणविषयक विचारांशी पूर्णपणे विरोधी होते. शिस्त ही शिक्षणक्रियेचा परिपाक असावा. शिक्षा हा शिस्तीचाच एक भाग मानण्यात यावा. अचूकपणे दिलेली शिक्षा ही केवळ कायदेशीरच नव्हे, तर आवश्यक मानण्यात यावी, असे माकारिएन्कोचे मत होते.
लष्करीकरण ही सर्वांत चांगली परंपरा असून अशा परंपरा निर्माण करणे व त्यांचे जतन करणे हे शिक्षणाचे काम आहे, असेही माकारिएन्कोचे मत होते. कार्ल मार्क्स आणि एंगेल्स यांनी शिक्षणामध्ये लष्करीकरणाचा पुरस्कार केला असल्याने माकारिएन्को याने त्याबद्दल आग्रह धरला. सामूहिक शिक्षण पद्धतीमध्ये त्याने लष्करी शब्द आणि लष्करी शिस्त यांचा पुरस्कार केला. लष्करीशिक्षणातील सौंदर्य, शिस्त आणि अचूकपणा या गोष्टी जीवनाला मदत करतात, असे त्याला वाटत असे.
सामूहिक जीवन हे उपयुक्त कामाचा पाया आहे, शिक्षणामध्ये सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक काम असावे, असे माकारिएन्कोचे मत होते. मुलांनी एकत्र काम करावे आणि आपण समाजाकरिता काम करतो, याबद्दल त्यांना जाणीव असावी. हे काम शाळेपासून दूर करण्यात यावे तसेच शाळकरी मुलांना कारखाने आणि शेती यांसारख्या बाहेरील क्षेत्रातील उत्पादक कामात सहभागी करून घेण्यात यावे.
माकारिएन्कोचे शिक्षणविषयक विचार रशियन शासनाला मान्य होण्यास जवळजवळ १९५८ साल उजाडले. युक्रेनमधील त्याचा एकेकाळचा सहकारी ख्रुश्चॉव्ह हा रशियाचा पंतप्रधान झाल्यानंतर १९५९ साली रशियातील शैक्षणिक कायद्यांमध्ये माकारिएन्कोच्या विचारांचा अंतर्भाव झाला. मॉस्को येते हृदयविकाराचा झटका येऊन तो मरण पावला.
संदर्भ : Matthews, Mervyn, Education in the Soviet Union, London, 1932.
गोगटे, श्री. ब.