मांडी : पायाच्या श्रोणि-संधीपासून (धडाच्या तळाजवळील हाडांच्या संरचनेशी असलेल्या जोडापासून) गुडघ्यापर्यंतच्या भागाला साधारणपणे मांडी असे संबोधले जाते. शरीराचे वजन तोलून धरणारे ऊर्वस्थी हे हाड मानवी शरीरातील सर्वांत लांब व बळकट असून मांडीचा मुख्य आधार असते. मांडीत ऊर्वस्थी स्नायूंच्या चार गटांनी वेढलेली असते. हे स्नायू मांडी, पाय व एकूण शरीर यांच्या हालाचालींशी संबंधित असतात. प्रत्येक गटास कटित्रिकास्थीय तंत्रिका जालातून (मज्जातंतूंच्या जाळ्यातून) निघणाऱ्या विशिष्ट तंत्रिकांद्वारा तंत्रिक पुरवठा होतो. जमिनीवर रांगणाऱ्या चतुष्पाद अवस्थेतून उभ्या राहणाऱ्या द्विपाद अवस्थेत क्रमविकास होत असताना माणसाची मांडी अभिमध्य दिशेने फिरते. त्यामुळे मूळचे पृष्ठीय असलेले विस्तारण स्नायू पुढे अग्रभागी येतात, तर पुढे असलेले अंतर्नमन करणारे (आत वाकणारे) स्नायू मागे जातात. मांडीच्या स्नायूंभोवती संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकाचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहाचे) वेष्टन असून या वेष्टनापासून मांडी श्रोणी-संधीस व जानुसंधीस (गुढघ्याच्या सांध्याला) जोडणारे बंध तयार होतात. मांडीच्या मध्यातून जाणाऱ्या ऊरुरोहिणीद्वारे मांडीतील स्नायूंना व ऊर्वस्थीला रक्तपुरवठा होतो, तर मांडीतील व पायाकडील रक्त ऊरुनीलेस मिळाणाऱ्या पृष्ठस्थ व खोल नीलांवाटे वाहून नेले जाते. वंक्षबंधापासून (जांघेशी संबंधित असलेल्या बंधापासून) पुढे ऊरुनीलेचे रूपांतर बाह्य श्रोणिनीलेत होते. स्नायूंच्या वर अधस्त्वचीय (त्वचेच्या तीन थरांपैकी आतील थराचे) ऊतक व त्वचा यांचे वेष्टन असते.
मांडी शरीराला आधार देते व उभ्या स्थितीत शरीर तोलून धरते. मांडीचे स्नायू चालणे, धावणे, उठून बसणे, वळणे इ. क्रियांत भाग घेतात.
अस्थिरचना : मांडीतील ऊर्वस्थी नलिकाकार असून उर्ध्व (वरच्या) बाजूस असलेले तिचे शीर्ष श्रोणि-अस्थीशी जोडलेले असते. (उखळीची सांधा), तर खालचे टोक जान्वस्थी (गुडघ्याची वाटी) व अंतर्जंघास्थी [⟶ पाय] यांना जोडलेले असते (बिजागरीचा सांधा). ऊर्वस्थीच्या ऊर्ध्व टोकाचे शीर्ष, ग्रीवा (मानेसारखा भाग) व दोन ऊरुकूट (गाठीसारख्या वाढी) असे भाग असतात. इतर सर्व अस्थींपेक्षा ऊर्वस्थीचा आकार वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असतो. ग्रीवा व शीर्ष यांचा अक्ष ऊर्वस्थीच्या कायेच्या (दंडा सारख्या भागाच्या) लांब अक्षाशी विशिष्ट कोन (सु. १२०० ) करतो. यामुळे श्रोणिसंधीद्वारे अधिक हालचाल करणे शक्य होते परंतु या कोनामुळेच ग्रीवेवर शरीराचे वजन वक्र मार्गाने प्रेषित होत असल्याने अधिक ताण पडतो. ऊर्वस्थीच्या ऊर्ध्व टोकाच्या अंतर्रचनेचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आलेला आहे. त्याच्या अंतरंगात अभियांत्रिकी तत्त्वांना अनुसरून ताणाच्या अपेक्षित ठिकाणी अस्थिजालिका वक्र रचनेत असल्याचे आढळून येते. ऊर्वस्थीचे शीर्ष चेंडूच्या आकाराचे असून काही भाग वगळता ते उपास्थीने (कूर्चेने) आच्छादलेले असते. ग्रीवेचा व्यास शीर्षापेक्षा कमी असून येथेच अस्थिभंग होण्याची जास्त शक्यता असते. मोठा ऊरुकूट काया व ग्रीवा जेथे मिळतात तेथे वरच्या बाजूस असतो. त्याच्या अभिमध्य बाजूस ऊरुकूटीय खाच असते. लहान ऊरुकूट पश्च व अभिमध्य बाजूस असतो. दोन्ही ऊरुकुटांना स्नायू जखडलेले असतात. ऊर्वस्थीच्या पश्च पृष्ठभागावर दोन्ही ऊरूकूट आंतरऊरुकूटीय शिखेने जोडलेले असतात.अग्र पृष्ठभागावर आंतरऊरुकूटीय रेषेच्या वरच्या भागात श्रोणि-संधीच्या संपुटाच्या अग्रभागाचे बंधस्थान असते. आंतरऊरुकूटीय रेषेची चांगली वाढ झालेली असल्यास ती लहान ऊरुकुटाखालून पश्च पृष्ठभागाकडे जाताना दिसते. पश्च पृष्ठभागावर साधारण लहान ऊरकुटाच्याच पातळीवर नितंब गुलिका असते व या गुलिकेवर महा नितंब स्नायू बांधलेला असतो. ऊरुकुटांच्या खालील ऊर्वस्थीचा भाग किंवा काया दंडगोलाकार असते. ती खालच्या टोकापाशी प्रसरण पावलेली असते. प्रसरण पावलेल्या या टोकास अभिमध्य व पार्श्व अशी दोन स्थूलके (जाड गाठीसारखे भाग) असतात. कायेच्या पश्च पृष्ठभागावर वरून खाली जाणारा एक कंगोरा असतो. या कंगोऱ्याच्या दोन्ही कडा खालच्या टोकापाशी एकमेंकीपासून दूर जातात. येथे दोन्ही कडांमधील भागास ‘जानुपश्च (गुडघ्याच्या मागील) पृष्ठभाग’ म्हणतात. खालच्या टोकापाशी असलेल्या दोन्ही स्थूलकांची संधिपृष्ठी अग्रभागी एकत्र होतात. या एकत्रित पृष्ठभागास ‘जान्वस्थी संधिपृष्ठी’ म्हणतात. पश्च बाजूस या दोन स्थूलकांच्या दरम्यान खोल आंतरस्थूलकीय खाच असते. स्थूलकांच्या दोन्ही बाजूंस अभिमध्य व पार्श्व असे दोन अपिस्थूलक असतात. अभिमध्य अपिस्थूलकाच्या वर अभिवर्तनी गुलिका असते व तिला महाअभिवर्तक स्नायूची (मांडी आतील बाजूस वळविण्यास मदत करणाऱ्या एका स्नायूची) कंडरा (हाडाला स्नायू घट्ट बांधणारा दोरीसारखा तंतुसमूह) बांधलेली असते.
स्नायू : ऊर्वस्थीला विविध स्नायू जोडलेले असतात. अग्र भागातील स्नायूंत उरुचतुःशिर स्नायू व दीर्घ स्नायू यांचा समावेश होतो. या स्नायूंमुळे मांडी व पाय लांब करता येतात. अग्र अभिमध्य स्नायू गटात अभिवर्तनी स्नायू येतात. दीर्घ अभिवर्तक, लघू अभिवर्तक, कृश अभिवर्तक व महा अभिवर्तक या चार स्नायूंचा या गटात समावेश होतो. यांच्यामुळे मांडी लांब करता येते, फिरविता येते व आतल्या बाजूस वळविता येते.
मांडीच्या मागील व वरच्या भागांत नितंब स्नायू असतात. यांत महा नितंब, मध्यम नितंब व लघू नितंब स्नायू यांचा समावेश होतो. हे स्नायू श्रोणि-संधीचे अपवर्तन (मध्यरेषेपासून लांब नेण्याची क्रिया) व विस्तारण घडवून आणतात. या स्नायूंच्या खाली पाय बाहेर वळविण्यास उपयोगी पडणारे पाच लहान स्नायू असतात. पश्च ऊरू स्नायूंच्या गटाला घोडस्नायू हे एकत्रित नाव असून ते मांडीच्या मागील बाजूस असतात. ते मांडीचे अंतर्नमन घडवून आणतात. या गटात ऊरू द्विशिरस्क, अर्धकंडरक आणि अर्धकलामय या स्नायूंचा समावेश होतो.
रक्त व तंत्रिका पुरवठा : मांडीच्या अग्र भागातून ऊरुरोहिणी, ऊरुनीला व ऊरुतंत्रिका पुढून आत अशा स्नायूंच्या खालून जातात. ऊरुतंत्रिका ऊरुरोहिणीच्या पार्श्व अंगास असते. ऊरूरोहिणी वंक्षबंधाच्या मध्यबिंदूखाली मांडीत प्रवेश करते. मांडीच्या खालच्या भागात ती पश्च भागात प्रवेश करून गुडघ्यामागून पायात जाते. वंक्षबंधाच्या खाली असलेल्या जागेस ‘ऊरु-त्रिकोण’ असे नाव असून रोहिणी व नीला यांच्याभोवती असलेल्या तंतुमय आवरणास ऊरु-आवरण म्हणतात. प्रवेशस्थानी नीला रोहिणीस अभिमध्य असते. नीलेच्या अभिमध्य बाजूस ऊरुनाल असून त्यात सैल तंतू कोशिका आणि लसीका वाहिनी व एखादी लसीका ग्रंथी [⟶ लसीका तंत्र] असते. ऊरुनाल नरसाळ्याच्या आकाराचा असून तोंडापाशी तो उदर गुहेस (उदरातील पोकळीस) जोडलेला असतो. ऊरुनालाच्या वरच्या तोंडास ऊरुकंकण म्हणतात. ऊरुकंकणातूनच ऊरू-अंतर्गळ [⟶ अंतर्गळ] ऊरुनालात म्हणजेच मांडीत उतरतो.
मांडीच्या पश्च भागात नितंब स्नायूच्या खालून श्रोणितंत्रिका मांडीत प्रवेश करते आणि द्विशिरस्क व अर्धकंडरक या स्नायूंखालून जानुपश्च खाचेकडे जाते. ऊरुतंत्रिका व श्रोणितंत्रिका त्यांच्या शाखांद्वारे मांडीतील स्नायूंना व त्वचेला पुरवठा करतात व पुढे पायात जातात.
काही महत्त्वाचे विकार : गळवे, अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेला निरुपयोगी असणाऱ्या गाठी) व अस्थिभंग यांच्या व्यतिरिक्त मांडीत होणारा महत्त्वाचा विकार म्हणजे ऊरु-अंतर्गळ होय. नेहमी होणाऱ्या वंक्षण-अंतर्गळापेक्षा हा वेगळा असतो. ऊरु-अंतर्गळ वर उल्लेखिल्याप्रमाणे ऊरुनालातून खाली उतरतो. तो ऊरुरोहिणी व नीला यांच्या अभिमध्य भागी असतो. यामध्ये आतड्याचा कोथ होण्याचे (आतड्याचा भाग मृत होऊन तो सडू लागण्याचे) प्रमाण अधिक असते.
गृघ्रसी किंवा नितंबशूल या विकारात श्रोणितंत्रिकेचा दाह झाल्याने किंवा तिच्या उगमस्थानी तिच्यावर दाब आल्याने तिच्या मार्गातून तीव्र असह्य वेदना होतात.
मांडीतील आणि पायातील त्वचेखालील नीला विस्तारित होऊन ⇨ अपस्फीत-नीला हा विकार होतो. या विकारात नीला जाड, फुगीर नागमोडी व गाठाळ बनतात.
यांखेरीज श्रोणिसंधी स्थानभ्रंश ही विकृती श्रोणिसंधीतील ऊर्वस्थीचे शीर्ष निखळल्यामुळे होते. काही लहान मुलांत असा स्थानभ्रंश जन्मजात होऊ शकतो. त्यावर त्वरित उपचार करण्याची गरज असते. मार बसल्यामुळे श्रोणिसंघीचा स्थानभ्रंश सहसा होत नाही परंतु श्रोणिसंधी अभिवर्तित स्थितीत असताना गुडघ्यावर जोराचा आघात झाल्यास श्रोणिसंधीचा स्थानभ्रंश होऊ शकतो. अशा वेळी ऊर्वस्थीचे शीर्ष मागील बाजूस स्थानभ्रष्ट होते. लहान बालकांत ऊर्वस्थी शीर्षाचा अपूयित (पूरहित) ऊतकमृत्यू (काही भागातील कोशिकांचा नाश झाल्याने होणारा ऊतकाचा मृत्यू) ही विकृती आढळते. वृद्धात साध्या पडण्यामुळे किंवा किरकोळ दुखापतीने ऊर्वस्थीच्या ग्रीवेचा अस्थिभंग सहजगत्या होतो. हा अस्थिभंग भरून येण्यास अवघड असून त्यासाठी बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. वार्धक्यात अशा अस्थिभंगामुळे व त्यावरील शस्त्रक्रियेमुळे दीर्घकाळ अंथरुणात झोपून राहावे लागल्याने न्यूमोनिया, फुप्फुस-अंतर्कीलन (फुप्फुसातील एखाद्या रोहिणीत रक्ताच्या गुठळीचा तुकडा अडकून बसणे) यांसारख्या उपद्रवांमुळे रोगी दगावण्याची शक्यता असते.
पहा : पाय.
संदर्भ : 1. Hollinshead, W. H. Textbook of Anatomy, New Delhi, 1976.
2. Rains, A. J. H. Ritchie, H. D. Bailey and Love’s Short Practice of Surgery, London, 1977.
3. Warwick, R, Williams, P. L., Gray’s Anatomy, Edinburgh, 1973.
उचगांवकर, पां. व्यं. कुलकर्णी, श्यामकांत
“