मॅन्सन, सर पॅट्रिक : (३ ऑक्टोबर १८४४–९ एप्रिल १९२२). ब्रिटिश जीवोपजीवनवैज्ञानिक (इतर जीवांवर उपजीविका करणाऱ्या जीवांमुळे उद्भवणाऱ्या रोगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेतील तज्ञ). उष्णकटिबंधी वैद्यकाच्या [⟶ उष्णकटिबंधी रोग] क्षेत्रातील ते पहिले महत्त्वाचे आधुनिक व्यवसायी, शिक्षक व संशोधक म्हणून गणले जातात.
मॅन्सन यांचा जन्म स्कॉटलंडमधील ओल्ड मेलड्रम येथे झाला. त्यांनी ॲबर्डीन मेडिकल स्कूलमध्ये शिक्षण घेऊन १८६६ मध्ये एम्. डी. पदवी मिळविली. त्यानंतर फॉर्मोसातील ताकाऊ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८७१ मध्ये अमॉय (चीन) येथील मिशन रुग्णालयाचे ते प्रमुख झाले. त्यानंतर त्यांनी हाँगकाँग येथे मेडिकल स्कूल ऑफ हाँगकाँग या संस्थेची स्थापना केली व ते तिचे पहिले अधिष्ठाते झाले. याच संस्थेचे पुढे १९११ मध्ये हाँगकाँग विद्यापीठात रूपांतर झाले. १८९० मध्ये ते लंडनला गेले व तेथे वैद्यकीय व्यवसाय करण्याबरोबरच त्यांनी सीमेन्स (नाविक) रुग्णालयात वैद्य म्हणून काम केले आणि तेथे त्यांना उष्णकटिबंधी रोगांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा अभ्यासही करता आला. १८९७ मध्ये ब्रिटिश वसाहत कार्यालयाचे वैद्यकीय सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली व या पदावर त्यांनी २० वर्षे काम केले. त्यांनी ब्रिटिश वसाहतींतील वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच १८९९ मध्ये लंडन स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन ही संस्था स्थापन करण्यात महत्त्वाचा भाग घेतला. या संस्थेचेच पुढे स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीन असे नामांतरण झाले. या संस्थेत मॅन्सन यांनी १९१४ मध्ये निवृत्त होईपर्यंत अध्यापन केले.
ॲमॉय येथे असताना त्यांनी उष्णकटिबंधी रोगांच्या अभ्यासास सुरुवात केली. प्रथमतः त्यांनी त्यांच्या अनेक चिनी रुग्णांमध्ये आढळणारा ⇨ हत्ती रोग व त्यांच्या रक्तात आढळणारे फायलेरीया कृमी यांतील संबंध आणि फायलेरीयाचे संक्रमण होण्यातील डासांचा सहभाग यांविषयी संशोधन केले. यांवरून काही कीटक मानवी रोगाला कारणीभूत होणाऱ्या जीवोपजीवींच्या विकासाच्या मधल्या अवस्थेत आश्रयी म्हणून कार्य करतात. हा महत्त्वाचा शोध त्यांनी लावला. लंडनला गेल्यावर तेथे त्यानी हिवतापासंबंधीचे संशोधन हाती घेतले. फायलेरीयासंबंधीच्या अनुभवाच्या आधारे मॅन्सन यांनी हिवतापाच्या जीवोपजीवीच्या जीवनक्रमातील एका अवस्थेत डास हा आश्रयी म्हणून कार्य करतो, असे सुचविले. मॅन्सन यांचा हा सिद्धांत आणि सी. एल्. ए. लाव्हरां यांचा हिवतापाच्या जीवोपजीवीचा शोध यांमुळे पुढे ⇨ सर रॉनल्ड रॉस यांना डासाद्वारे हिवतापाचा प्रसार कसा होतो, याचे विवरण करणे सुलभ झाले. [⟶ डास हिवताप].
रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९०० मध्ये मॅन्सन यांची निवड झाली व १९०३ मध्ये त्यांना ‘नाईट’ या किताबाचा बहुमान मिळाला. रॉयल सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेचे ते एक संस्थापक व पहिले अध्यक्ष होते. त्यांनी लिहिलेला ट्रॉपिकल डिसिझेस : ए मॅन्युअल ऑफ द डिसिझेस ऑफ वॉर्म क्लायमेट्स हा १८९८ मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा ग्रंथ अनेक वर्षे प्रमाणभूत मानण्यात येत होता व त्याच्या कित्येक आवृत्त्या निघाल्या. ते लंडन येथे मृत्यू पावले.
भालेराव, य. त्र्यं.